दामले काकू

    दिनांक  07-Sep-2019 21:53:02गिरगावात जसे अवलिये होऊन गेले तसे हे अगदी आदर्श आयुष्य जगणारे योगीजनसुद्धा झाले. दामले काकू या त्यातल्या एक. मुलगी सासरी गेली. मुलगा अमेरिकेला. आता तसे हे दोघंच. दामले काका स. का. पाटील उद्यानात आणि काकू नेहमीच्या फडके मंदिरात असे आपापसात त्यांनी विभाग वाटून घेतले आहेत. आजही तोच दिनक्रम आचरताना त्या मला भेटल्या होत्या.कोपर्‍यावरच्या शेवपुरीवाल्याकडे बसलो होतो
. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. शेवपुरी हा माझा ’चाट’मधला आवडता पदार्थ. मग त्यात ती महाराष्ट्राची की उत्तर भारताची हा वाद मी कधी आड आणला नाही. भैय्या राजस्थानचा होता. भैय्याची ही तिसरी पिढी हा धंदा इकडे करतेय हे विशेष. मुंबापुरीने कधी कोणाला सावत्र वागणूक दिली नाही. सगळी तिचीच लेकरं. भैय्या माझ्या लांबलचक ऑर्डरचं पार्सल तयार करत असताना मी त्याच्या खुर्चीवर जरा आसरा घेतला. आतासं संध्याकाळचं गिरगाव नाक्यावर बसून मराठी माणसाचं गतवैभव रंजन करीत बसणं म्हणजे आजच्या रायगडावर जाऊन शिवरायांची राजधानी तेव्हा काय असेल याचा विचार करण्यासारखं आहे. ब्रिटिशांनी तोफगोळे मारून रायगडची शोभा घालवली आणि इथे गिरगावातकाळाच्या गरजेने. बाकी हिशोब तोच. मी विचार करत बसलेलो असतानाच समोरून ओळखीची एक व्यक्ती आली. “अंबू वहिनींचा नातू ना रे तू?” माझ्या आजीचं नाव खरं स्नेहलता, प्रेमाने म्हणा किंवा आणखी कशाने लोक तिला ‘अंबू’ म्हणत.ज्यांनी तिला
‘अंबू’ म्हटलं ते शेवटपर्यंत अर्थात तिच्या शेवटपर्यंत तिच्या जवळ राहिले. स्नेहलता म्हणणार्‍यांना तिचं खरं रुप कधी कळलं नाही. तिचे व्यक्तिचरित्र लिहायला खंड कमी पडतील. अंबूचा नातू म्हणजे ही व्यक्ती जवळची असणार. “मी तुम्हाला ओळखलं नाही ओ,” असं म्हणताचस्मितहास्य करीत “अरे, मी दामले काकू. लहानपणी यायचास आमच्याकडे खूप. साजूक तुपातला शिरा खायचास आवडीनं. विसरलास?” त्या ‘विसरलास’मध्ये प्रश्न तर होताच, पण त्याहून अंमळ जास्त आश्चर्य होतं. “अरे हो की, दामले काकू. वरच्या मजल्यावरती त्यांचं घर होतं.” वास्तविक माझी यात चूक नाही म्हणता येणार. काकू होत्याच इतक्या साध्या सरळ की गिरगावच्या चाळीत राहणार्‍या अवलियांमध्ये त्यांची विशेष अशी आठवण राहणं कठीणच. नवरा टाकसाळीत. या पोस्टात. सकाळी ८ ला घर सोडायच्या ते संध्याकाळी ५.3० ला परत. या वेळांमध्ये ऋतू कधी बदल घालू शकले नाहीत. काकांचेही तसेच. बरं पोशाख म्हणावा तर काकूंच्या ठरलेल्या साड्या. सोमवार ते शनिवार रंग अगदी ‘फिक्स.’ कधी छानछौकी नाही, हौसमौज नाही. चेहर्‍यावरही तोच व्रतस्थपणा. कार्यालयातून आल्या की त्यांच्या मुलांना अभ्यासाला बसवीत. काका येईपर्यंत घरी थांबत. काका ६ ते ६.3० ला आले की या फडके मंदिरासाठी बाहेर पडत. भाजीची पिशवी घेऊन हे विशेष. त्यातही कर्तव्य! मग त्यांच्या संथ गतीने फडके मंदिर गणपती दर्शन आणि पर्यायाने गिरगाव प्रदक्षिणा होत. त्यांच्या या गणपती दर्शनावरही एखाद्याने घड्याळ लावावं. आम्ही बर्‍याचदा ’अरे दामले काकू फडके मंदिरासाठी बाहेर पडल्या म्हणजे साडेसहा वाजले असणार’ असे तर्क केल्याचे मला आठवते.फडके मंदिरातला गणपतीहीपावला तसा त्यांना
. काकूंच्या मुलाने अभ्यासात नाव काढलं. आता अमेरिकेत चांगला गलेलठ्ठ पगार ओढतो आहे. मुलगीसुद्धा चांगल्या घरात पडली. दामले दाम्पत्याने अगदी रिटायर होईपर्यंत नोकरी केली. मला आवडणार्‍या साजूक तुपातल्या शिर्‍यासारखं देवाने दामलेंचे आयुष्यही साजूक तुपात अगदी वास सुटेपर्यंत घोळवलं होतं. तो वास बर्‍याचदा बर्‍याच लोकांच्या नाकातसुद्धा जाई. दामले दाम्पत्याने आणि खास करून दामले काकूंनी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. त्यांची बैठकच वेगळी होती. गिरगावात जसे अवलिये होऊन गेले तसे हे अगदी आदर्श आयुष्य जगणारे योगीजनसुद्धा झाले. दामले काकू या त्यातल्या एक. मुलगी सासरी गेली. मुलगा अमेरिकेला. आता तसे हे दोघंच. दामले काका स. का. पाटील उद्यानात आणि काकू नेहमीच्या फडके मंदिरात असे आपापसात त्यांनी विभाग वाटून घेतले आहेत. आजही तोच दिनक्रम आचरताना त्या मला भेटल्या होत्या. घरच्यांची विचारपूस झाली. मीही चार-दोन गोष्टी केल्या. काकूंच्या चेहर्‍यावर एखाद-दोन सुरकुत्या वगळता वार्धक्याच्या फार काही खुणा नव्हत्या. त्या नसायच्याच हो. इस्त्री मारल्यासारखे कडक आयुष्य जगत आलेल्या काकूंच्या चेहर्‍यावर त्या सुरकुत्याच दोन का असेना पण होत्या हे नवल!

 
- डॉ. अमेय प्रदीप देसाई