चिदंबरम यांना चौकशीसाठी घेणार ताब्यात : ईडीचा निर्णय

    दिनांक  05-Sep-2019 12:40:17


 


चौकशीसाठी अटक करणे गरजेचे : न्यायालय

 
 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया कथित गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चिदंबरम यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सीबीआयने मागितलेल्या कोठडीची मुदत गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर जामीन मिळण्यासाठी चिदंबरम यांनी अर्ज केला होता मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. हे प्रकरण साधे नाही, असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला. 

सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती व न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने ईडी प्रकरणातील निकाल २९ ऑगस्टपर्यंत राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुनावणी देताना म्हटले की, "आरोपीला अधिकार म्हणून अटकपूर्व जामीन देता येणे शक्य नाही, जामीन देण्याबाबत त्या त्या प्रकरणावरून ठरवले जाईल. ईडीने केलेल्या दाव्यानुसार, आरोपीला अटक करून चौकशी करणे गरजेचे आहे," असे मत न्यायालयाने व्यक्त केले.