‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरू

    दिनांक  04-Sep-2019 18:33:28
 


मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत,कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे वन स्टॉप सेंटरआजपासून केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आले. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते या सेंटरचा प्रारंभ करण्यात आला. शासनाचा महिला आणि बालविकास विभाग, मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या एकत्रित सहभागातून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

 

लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा, मानसिक छळ अशा कोणत्याही प्रकारच्या अत्याचारास बळी पडलेल्या महिलांसाठी हे सेंटर असेल. सेंटरमध्ये वैद्यकीय सल्लागार कक्ष, तात्पुरता निवारा कक्ष, वैद्यकीय तपासणी कक्ष, समुपदेशन कक्ष असे विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी,मानसोपचार तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, समुपदेशक, कायदाविषयक सल्लागार आदी कार्यरत असतील. त्यांच्यामार्फत अत्याचारग्रस्त महिलेला तातडीने उपचार,मानसिक बळ आणि कायदेविषयक मदत उपलब्ध करुन दिली जाईल. पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे किंवा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदविणे आदींची सुविधाही सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागामार्फत पुरावे मिळविण्यासाठीची मदतही याठिकाणी उपलब्ध असेल.