पुण्यात पूरग्रस्तांना स्वयंसेवकांतर्फे मदतीचा हात

    दिनांक  30-Sep-2019 17:18:31
पुणे : पुण्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला आता रा.स्व.संघ धावून आला आहे. पुण्यात शेकडो स्वयंसेवकांनी एकत्र येत जनजीवन सुरळीत सुरू करण्यासाठी हातभार लावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने स्वयंस्फूर्तीने मदत कार्य सुरू करण्यात आले असून त्यापासून पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणेकरांसाठी दि. २५ आणि दि. २६ सप्टेंबरची ती रात्र काळरात्र ठरली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. ढगफुटी सदृश्य पावसाने आणि अंबिल ओढा व विविध ओढ्यांना आलेल्या पुण्याच्या दक्षिण भागात महापुराची स्थिती निर्माण केली.

 

दरम्यान, सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेल्या अंबिल ओढा परिसरात गुरुवारी सकाळपासून मदत कार्य सहायता केंद्र सुरू करण्यात आले. गुरुराज सोसायटी, मोरे वस्ती, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, जय मल्हार वसाहत, तावरे कॉलनी, लक्ष्मी नगर, टांगेवाले कॉलनी आदी ठिकाणी भोजन, चहा, नाश्ता वितरण केले. यासाठी पुणे शहरातून १५ हजारांहुन अधिक पोळ्यांचे संकलन करण्यात आले होते. एकूण दहा हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला.

 

फूड पॅकेटचे वितरण तसेच परिसरात हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वितरण केले. या कामात एकूण १६०हून अधिक स्वयंसेवक सकाळी सहा वाजल्यापासून सहभागी झाले होते. मध्यरात्री पूरग्रस्तांना बाहेर काढण्यातही स्वयंसेवकांनी मदत केली. यामध्ये तरुण, प्रौढ, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांचा सक्रिय सहभाग होता.

 

दांडेकर पूल, दत्तवाडी, राजेंद्रनगर या ठिकाणी रात्री पुराचे पाणी घरांमध्ये घुसले. स्वयंसेवकांनी पहाटे चार वाजेपर्यंत पाण्यात उभे राहून मदत केली. नांदेड नगरातील कोल्हेवाडी या ठिकाणी रात्री पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. साधारण ५०हून अधिक कुटुंबे आणि अंदाजे २०० नागरिक बाधित झाले होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयाने मदत कार्य उभे केले. अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली आहे.

 

पुढच्या मदतकार्यासाठी मधूबन सोसायटी, कोल्हेवाडीतात्पुरते सेवाकेंद्र सुरू केले आहे. जनकल्याण समितीच्यावतीने मदतीबरोबर जीवनावश्येक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये १ हजार मेणबत्त्यांसह १ हजार चादरी व सतरंज्या, कपड्यांचे वितरण केले आहे. परिसरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मंदीर, रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणचे चिखल व घाण काढून टाकण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य करण्यात आले. सहकारनगर पर्वती परिसरातील बाराहून अधिक चौकात वाहतूक नियमन करण्यात आले. दरम्यान, या आपत्तीनंतर पूरग्रस्त भागात जनकल्याण समितीतर्फे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहिम देखील संघातर्फे हाती घेण्यात आली आहे.