५ ऑक्टोबर रोजी 'राजसभा' : वेळ, ठिकाण, मुद्दे गुलदस्त्यात

    दिनांक  30-Sep-2019 14:35:47


 


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, ५ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेण्याव्यतीरिक्त त्यांनी अन्य कोणत्याही गोष्टी स्पष्ट केल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक दीलीप दातार आणि मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनीही मनसेत प्रवेश केला. त्यांची घोषणा राज यांनी यावेळी केली. 

ईडीच्या चौकशीनंतर राज आज प्रथम बोलतील, अशी अपेक्षा साऱ्यांना होती. मात्र, राज यांनी कोणत्याही गोष्टीवर सविस्तर बोलणे टाळले. ५ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार असल्याचे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरूनही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्यात वेळ, ठिकाण आणि अन्य मुद्दे लवकरच जाहीर करू, असे सांगण्यात आले होते.


 


राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले होते. तसेच राज निवडणूका लढवणार की नाही, याबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये साशंकता होती. दरम्यान मनसे शंभर जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मनसेच्या नेत्यांनी यासंदर्भात आपापली मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, याबद्दल आता अधिकृत घोषणा ५ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.