वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे लढवणार निवडणूक

30 Sep 2019 19:26:37


 


मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अखेर वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. वरळीतील विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी त्यांच्या आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते. ठाकरे घराण्यातून आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज वरळी विधानसभेतून भरणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा केली. यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मी लोकांच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक म्हणून काम करताना आनंद होत आहे. हा ऐतिहासिक क्षण असून वरळीचा विकास करणार आहे. मला मुख्यमंत्री बनायचे आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. हा निर्णय मी स्वतः साठी किंवा मला आमदार, मुख्यमंत्री बनण्यासाठी घेतलेला नाही. मला महाराष्ट्रचे भले कारायचे आहे. सर्व भेदभाव दूर करून महाराष्ट्र एक करायचा आहे."

Powered By Sangraha 9.0