भारतच अव्वल : मनू भाकर आणि सौरभ चौधरीला 'सुवर्ण'

    दिनांक  03-Sep-2019 16:06:21


 


नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांची कामगिरी दिवसेंदिवस चांगली होताना दिसत आहे. सध्या ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आणखीन एक सुवर्ण पदक जिंकून भारतीय नेमबाजांनी दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेच्या मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरीने सुवर्ण पदक जिंकले आहे. याचसोबत भारताच्या नावावर आता एकूण ९ पदके असून सध्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे.

 

सोमवारी झालेल्या या अंतिम रोमांचक सामन्यामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माला १७-१५ ने असे मागे टाकत सुवर्णपदक कमावले. दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पंवार यांनी कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या नेमबाजांनी सहा सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके पटकावून भारताला अव्वल स्थान मिळवून दिले आहे. भारतानंतर चीन ६ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.