झापडबंद पूर्वग्रह : रोमिला थापर

    दिनांक  03-Sep-2019 19:55:25   कोरेगाव-भिमाच्या दंगलीनंतर, विघातक प्रवृत्तीच्या लोकांना अटक झाली. त्यावेळी अटक झालेल्यांची सुटका व्हावी म्हणून रोमिला थापर यांनी जंग जंग पछाडले. मागेही, जेएनयुमध्ये कन्हैया कुमार आणि त्याच्यासारख्या समस्त फुटीरतावाद्यांनी भारताचे तुकडे होण्याच्या वल्गना केल्या. घोषणा दिल्या. त्यावेळी त्या सगळ्यांवर कारवाई झाली. तेव्हा तिथे प्रोफेसर एमेरिटस म्हणून रोमिला कार्यरत होत्या. त्यावेळी रोमिला म्हणाल्या, "जेएनयु तुटत आहे." फुटीरतावाद्यांवर कारवाई झाली तर रोमिला यांना जेएनयु तुटत आहे, असे वाटले. याचा अर्थ काय? की जेएनयु या अशा देशविघातक वृत्तीसाठी संघटित आहे का? छे, रोमिला ज्या जेएनयुवर प्रोफेसर एमेरिटस पदावर आहेत. तिथे रोमिलांचे काम काय तर शोध प्रबंधासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, चयन करणे. पण, इथे शोध प्रबंधासाठी कोणाला निवडले जाते आणि काय मार्गदर्शन केले जाते, हे कन्हैया कुमार किंवा त्याच्या तुकडे तुकडे गँगला पाहून सगळ्या जगाला माहिती झाले. तसे पाहिले तर रोमिलासारख्यांना असली पदं या असल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिली जातात. काँग्रेसच्या कालावधीत जेएनयुमध्ये रोमिलासारख्यांची चांदी झाली. जेएनयु म्हणजे देशविघातक विचारवाद्यांचा अड्डा बनला. आता रोमिला यांचे इतिहास निष्कर्ष पाहू. रोमिला म्हणतात, "मुघलांनी कधीही कोणत्या हिंदूंचे धर्मपरिवर्तन केले नाही. हिंदूंनी स्वखुशीने धर्मांतर केले. आर्य बाहेरून आले. इथे सगळे भारतीय एक नाहीत. तसेच पूर्वी भारतात गोमांस खायचे." रोमिला यांच्या या अशा इतिहास निष्कर्षामुळे त्या समस्त डाव्या आणि तथाकथित पुरोगाम्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या. मात्र यावरूनच कळते की रोमिला यांचा इतिहासाचा अभ्यास किती असेल? असो, पुरातत्त्ववेत्ता, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचेनिदेशक असलेले के. के. मुहम्मद त्यांच्या आत्मकथेत लिहितात, "१९७७ साली बाबरी मशिदीच्या उत्खननामध्ये अयोध्येच्या मंदिराचे अवशेष आढळले. तोपर्यंत हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही माहिती होते की, बाबराने मंदिर पाडून मशीद बनविली होती. पण त्यावेळी रोमिला यांनी आपल्यासोबत २५ लोकांची टोळी बनवून अक्षरशः रान पेटवले की इथे मंदिर नव्हतेच. ही सगळी हिंदुत्ववाद्यांची थेरं आहेत." त्यानंतर सगळे चित्रच पालटले. असो. तर रोमिलांची ही विद्वत्ता म्हणावी की फुटीरता म्हणावी?

 

फुटीरतावाद्यांची थाप : थापर

 

मानव विकास संसाधन खात्याने रोमिला थापर यांच्याकडून परिचयपत्र मागितले आहे. पण त्या परिचय पत्र द्यायला तयार नाहीत. त्यांना त्यात अपमान वाटतो. नेहमीप्रमाणे त्यांच्या दादागिरीची री ओढण्यासाठी समस्त डावे, काँग्रेसी अत्यंत तळमळीने एकत्र आले आहेत. पण प्रश्न असा येतो की, जेएनयुमध्ये प्रोफेसर एमेरिटस या अत्यंत मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या रोमिला यांना आपला परिचय देताना वाईट का वाटते? त्या म्हणतात की, "मी जेएनयु प्रशासनाशी बांधिल नाही की, मी त्यांना माझे परिचय पत्र द्यावे." समस्त डाव्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी डोक्यावर बसवलेल्या रोमिला यांना जेएनयुमध्ये मानाचे, जबाबदारीचे पदही हवे आहे. मात्र, विद्यापीठाचे नियम नकोत. त्या 75 वर्षांच्या झाल्यावर विद्यापीठाने नियमानुसार त्यांच्याकडून परिचयपत्र मागितले तर त्यांना राग का आला? जगभरात अशी कोणती संस्था, विद्यापीठ, गेला बाजार खाजगी शाळा अगदी बालवाडी दाखवा, जिथे शिक्षकाचे परिचय पत्र मागितले जात नाही. रोमिला काय जगाच्या बाहेरच्या आहेत? विद्या विनयेन शोभते। रोमिला यांच्याकडे तर विद्येपेक्षा देशात फुटीरता कशी माजविता येईल, याची लबाडी जास्त आहे. बरं रोमिला यांच्या एकटीकडूनच परिचय पत्र मागविले गेले का? तर तसेही नाही. त्यांच्यासोबत वैज्ञानिक आर. राजारमन, जेएनयुचे माजी कुलपती आशिष दत्ता यांच्यासह १२ जणांकडून परिचय पत्र मागितले आहे. त्यांना बरा हा अपमान वाटत नाही. कारण त्यांच्याकडे परिचय लपवावा, असे परिचय पत्र नाही. रोमिला यांना परिचय पत्र देताना भीती का वाटते? विद्यापीठाची नियमावली धुडकावून वर स्वतःचा टेंभा मिरवणाऱ्या रोमिलांची ही झुंडशाही आहे. जर खरेच त्यांनी विद्यापीठासाठी काम केले असेल तर त्यांनी आपले परिचय पत्र द्यावे. इतकी लपवाछपवी का? पण तसे नाही. रोमिला यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. परिचय पत्र खरे दिले तरी पंचाईत आणि खोटे दिले तरी पंचाईत. कारण आज प्रशासनामध्ये दूध का दूध, पानी का पानी करणारे आले आहेत. या एकसंध देशाला फुटीच्या दुहीवर आणणाऱ्यांचा बुरखा फाडायलाच हवा.