कोण म्हणतो मंदी आहे?

    दिनांक  03-Sep-2019 18:54:57   


 


सध्या अर्थविषयक अभ्यासकांव्यतिरिक्त विशिष्ट क्षेत्रात इतिहास लेखन करणारे आणि फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून चकाट्या पिटणारेही स्वतःला अर्थतज्ज्ञ समजू लागले आहेत. मंदीच्या नावावर देशाच्या अर्थमंत्री, पंतप्रधानालाही ते शिकवताना दिसतात. पण, जर खरोखरच अर्थव्यवस्था मरगळलेली असती वा तिच्यात वाढीची शक्यता नसती तर फेअरफॅक्ससारख्या कंपनीने भारतात गुंतवणुकीची घोषणा केली असती का

 

"कोण म्हणतो, भारतीय अर्थव्यवस्था मरगळली आहे?," हा सवाल विचारलाय कॅनडातील अब्जाधीश-गुंतवणूकदार प्रेम वत्स यांनी. गेल्या काही दिवसांपासून देशात 'मंदी आली, मंदी आली' चा ठणाणा विशिष्ट लोकांकडून होताना दिसतो. आपल्या वक्तव्यांतून, लेखांतून, प्रतिक्रियांतून ही सर्वच मंडळी आता देशावर महाभयानक अर्थसंकट घोंघावत असून त्यात सर्व काही उद्ध्वस्त होईल, अशी मांडणीही करत आहेत. सोबतच, आम्ही आधीच सांगत होतो, आमचे ऐकले असते तर... किंवा काही अतिबुद्धिमान लोक तर विद्यमान सरकारकडे अर्थबुद्धीच नाही, असेही म्हणताना दिसतात. त्यातून त्यांचा नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर टीका करण्याचा कंड शमतो, हे खरेच, पण आपण जी टीका करतोय, त्याला खरेच काही आधार आहे का, हे पाहण्याचे कष्ट घेताना ते दिसत नाहीत.

 

दुसरीकडे देशात सणोत्सवांचा उत्सव नागरिकांच्या वर्तणुकीतून आणि विविध माध्यमांतील जाहिरातींतूनही प्रतिबिंबित होत आहे. पारंपरिक उत्पादन पद्धती, उद्योग-व्यवसायाऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालवल्या जाणाऱ्या उद्योगधंद्यांचा परिणाम मात्र अर्थव्यवस्थेवर झालेला असू शकतो. पण, त्यातही रोजगार निर्मिती होतच असते. अशा सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेयरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सचे अध्यक्ष प्रेम वत्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. वत्स भाष्य करूनच थांबले नाही तर आगामी पाच वर्षांत भारतात पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीची शंका धुडकावून लावताना वत्स यांनी इथे शानदार संधी असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, माझ्या मतानुसार भारत जगातील क्रमांक एकचा देश असून जगाच्या जीडीपीत भारताचे योगदान ३ टक्के आहे. परंतु, एकूण वैश्विक गुंतवणुकीत भारताचा वाटा एक टक्केच आहे. यात २ टक्के इतकी जरी वाढ झाली तरी, भारतात तीन लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक वाढेल. सोबतच प्रेम वत्स यांनी आपली कंपनी भारत सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिते, असेही सांगितले. म्हणजेच वत्स यांची विधाने पाहिली असता, त्यात मंदीची झाकोळछाया कुठेही नाही, असेच दिसते. देशात जर खरेच मंदी असती तर, सध्या काही अर्थतज्ज्ञ सांगतात, त्याप्रमाणे परकीय गुंतवणूक देशाबाहेर जायला हवी होती. पण तसे होत नाही, म्हणूनच जे मंदीच्या,अर्थव्यवस्थेच्या मरगळीचा धोशा लावतात, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही.

 

प्रेम वत्स यांनी मद्रास आयआयटीतील एका कार्यक्रमात असेही सांगितले की, सरकार तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी उत्सुक आहे आणि कॅनडा या क्षेत्रातील मोठा गुंतवणूकदार आहे. आम्ही कॅनडी आणि अमेरिकन कंपन्यांना भारतात तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करू. केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या खाजगीकरणाबद्दल वक्तव्य केले होते. प्रेम वत्स यांनी याबाबत सांगितले की, "आमची कंपनी एअर इंडियातील गुंतवणुकीवरही विचार करेल. परंतु, आमच्याकडे या क्षेत्रातील अनुभव नाही," असेही ते म्हणाले. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना त्यांनी भारताला मोदींसारखा उद्योगस्नेही नेता मिळाला, हे भाग्य असल्याचे म्हटले. प्रेम वत्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे आशादायक चित्र उभे करताना अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होईल. इथल्या लोकशाही व कायदा-व्यवस्थेमुळे गुंतवणूकदार भारतात येतील, असे सांगत भारत सुमारे १० टक्के विकासदर गाठेल, असेही भाकित केले. अर्थात प्रेम वत्स यांनी वर्तविलेल्या १० टक्के विकासदराच्या अंदाजाने तत्काळ हुरळूनही जाता कामा नये. एक मात्र नक्की की, सध्या अर्थविषयक अभ्यासकांव्यतिरिक्त विशिष्ट क्षेत्रात इतिहास लेखन करणारे आणि फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून चकाट्या पिटणारेही स्वतःला अर्थतज्ज्ञ समजू लागले आहेत. मंदीच्या नावावर देशाच्या अर्थमंत्री, पंतप्रधानालाही ते शिकवताना दिसतात. पण, जर खरोखरच अर्थव्यवस्था मरगळलेली असती वा तिच्यात वाढीची शक्यता नसती तर फेअरफॅक्ससारख्या कंपनीने भारतात गुंतवणुकीची घोषणा केली असती का, यावरही त्यांनी विचार करावा.