जागतिक नेतृत्वाच्या दिशेने...

    दिनांक  29-Sep-2019 17:18:04   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपले विचार मांडले. देशाच्या पंतप्रधानांचे विचार हे त्यांचे व्यक्तिगत मत नसून ती देशाची धोरणे असतात. त्यामुळे मोदींच्या भाषणाला जागतिक स्तरावर भारताचा दृष्टिकोन म्हणून गणले जाणे स्वाभाविक आहे. यावेळी भारताने जागतिक परिप्रेक्ष्यात असणार्‍या विविध समस्यांचा ऊहापोह करताना त्यासाठी आवश्यक असणार्‍या सामूहिक प्रयत्नांची गरजदेखील अधोरेखित केली. नेतृत्व करत असताना नेतृत्व करणार्‍याने संबंधित समूहास वेळोवेळी योग्य दिशा दाखवणे आवश्यक असते. तसेच, केवळ घोषणाबाजी किंवा मी करतो, असे म्हणत सर्व काही स्वतःहून करण्याचा विडा न उचलता सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वास अनुषंगून कार्यप्रणाली निश्चित करणेही तितकेच आवश्यक असते. अशा आधारावर निर्माण होणारे किंवा झालेले नेतृत्व हे चिरकाल टिकणारे आणि सर्वमान्य असे असते. नेतृत्वाबाबत चर्चा करण्याचे कारण इतकेच की, आज भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने जात असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जगाच्या अनेक देशांतील एक देश भारत अशी ओळख असणार्‍या भारताने आज आपल्याभोवती इतर राष्ट्रांचे आकर्षण निर्माण करण्यात यश संपादित केले आहे.नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपले विचार मांडले
. देशाच्या पंतप्रधानांचे विचार हे त्यांचे व्यक्तिगत मत नसून ती देशाची धोरणे असतात. त्यामुळे मोदींच्या भाषणाला जागतिक स्तरावर भारताचा दृष्टिकोन म्हणून गणले जाणे स्वाभाविक आहे. यावेळी भारताने जागतिक परिप्रेक्ष्यात असणार्‍या विविध समस्यांचा ऊहापोह करताना त्यासाठी आवश्यक असणार्‍या सामूहिक प्रयत्नांची गरजदेखील अधोरेखित केली. जागतिक तापमानवाढ ही एक मोठी समस्या असून ती रोखण्यासाठी भारत कसा प्रयत्नशील आहे, जागतिक तापमानवाढ होत असल्याने नैसर्गिक संकटांची तीव्रता आगामी काळात कशी वाढू शकते, जागतिक तापमानात वृद्धी होऊ नये यासाठी भारत कशाप्रकारे हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी करत आहे, सौर ऊर्जा ही शाश्वत ऊर्जा असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी भारताचा पुढाकार नेमका कसा आहे, भारतासारख्या खंडप्राय देशात येणार्‍या नैसर्गिक संकटांचा सामना आपण सशक्तपणे कसा करत आहे, भारतातील कल्याणकारी योजना, तंत्रज्ञानामुळे जगाचा बदलणारा चेहरामोहरा आणि जगाची विस्कटणारी घडी आणि त्यातून आलेलं जागतिक विस्कळीतपण आणि ते कुणाच्याही फायद्याचे नसणे, अशा विविधांगी मुद्द्यांची मांडणी यावेळी संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आली.
आम्ही किती ग्रेट आहोत किंवा आम्ही किती समस्येने ग्रासले गेलो आहोत,’ असा अहं ठेऊन किंवा आपल्यावर जगाने करुणा करावी, अशी अपेक्षा बाळगत भारताने जागतिक व्यासपीठावर बाजू मांडली नाही. उलटपक्षी जागतिक समस्या लक्षात घेता जागतिक पातळीवर एक जबाबदार देश म्हणून भारत कसे कार्य करत आहे, याची मांडणी करण्यात भारताने आपला धर्म पाळला. तर, जागतिक समस्या नेमक्या काय आहेत, त्यामुळे कोणती आव्हाने उभे ठाकण्याची शक्यता आहे आणि हे करत असताना सामूहिक जबाबदारी नेमकी काय व कशी असावयास हवी, याची मांडणी भारताने केली. 
दिशा देणे, स्वतःहून पुढाकार घेणे, कार्यक्षेत्र निश्चित करत त्यानुसार मार्गक्रमण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याच्यासमोर आपण बोलत आहोत, त्यांनी आदराने आपले म्हणणे ऐकणे, ही जर नेतृत्वाची परिभाषा मानली तर, या सर्व बाबींची पूर्तता भारताने संयुक्त राष्ट्र संघातील देशांसमोर केली आहे. त्यामुळे आगामी काळात भारताचा प्रवास जागतिक नेतृत्वाच्या दिशेने होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच, याच परिषदेत भारताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि मानवतेची जोपासना करण्याकरिता जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येत सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी मोदींनी यावेळी मांडले. स्वतः दहशतवादाने सर्वात जास्त ग्रासले असताना, विश्वाची चिंता करत आणि दहशतवाद ही एक देशाची समस्या नसून संपूर्ण जगाची समस्या आहे, असा विचार करण्याची प्रगल्भता भारताने जागतिक पटलावर दाखविली आहे. त्यामुळे विकास, विकासाचा मार्ग, समस्या, समस्या निराकरणाची दिशा, भारताने जगाला दाखवत आपण सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नेतृत्वासाठी आवश्यक असणारी आकलनक्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची ताकद भारताने जागतिक पटलावर सिद्ध करताना जागतिक नेतृत्वाच्या दिशेने सक्षम पाऊल टाकत आपले अस्तित्व निर्माण केले आहे, असे वाटते.