‘चांद्रयाना’शी अजूनही संपर्क होऊ शकतो

    दिनांक  28-Sep-2019 23:28:22मुंबई
: भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) सोडलेल्या ‘चांद्रयाना’चा प्रत्यक्ष संपर्क होत नसला, तरी हा संपर्क पुन्हा कधीही होऊ शकतो, अशा आशा ज्येष्ठ भारतीय वैज्ञानिक आणि नामवंत विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी शनिवारी जीवंत केल्या.

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवानिमित्त लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्यांनी उपस्थितांची ज्ञानलालसा वाढविली आणि ‘चांद्रयाना’ची मोहीम फसलेली नाही, तर त्याच्याशी पुन्हा कधीही संपर्क होऊ शकतो, असा विश्वास निर्माण केला. लोकमान्य जन्मशताब्दी व्याख्यानमालेसाठी सारस्वत बँक प्रायोजक, तर दै. ’मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक आहेत.

डॉ. बाळ फोंडके पुढे म्हणाले की, “चंद्रावरचा १ दिवस म्हणजे पृथ्वीवरचा १ महिना असतो. तेथे १४ दिवस अंधार, तर १४ दिवस प्रकाश असतो. त्यामुळे नजीकच्या कोणत्याही दिवशी ‘चांद्रयाना’शी संपर्क होण्याच्या आशा मावळलेल्या नाहीत.”

चंद्रापासून १०० किमी पर्यंत असताना ‘चांद्रयाना’पासून ‘विक्रम’ वेगळा झाला. त्यावेळी त्याचा वेग तशी सहा हजार किमी होता. नंतर तो २२ किमीपर्यंत मर्यादित राखण्यात इस्रोला यश आले. मात्र, चंद्रापासून २ किमी अंतरावर असताना ‘विक्रम’चे काय झालेते कळले नाही. विक्रम स्वतःभोवती फिरत राहिल्याने ते अपेक्षित ठिकाणी उतरू शकले नसावे. उतरले असल्यास छायाचित्र दिसत नाही. अलगद न उतरता ते आदळले असेल, असे गृहीत धरले तर त्याची मोडतोड दिसत नाही. उतरताना जास्त गिरकी घेतल्यामुळे ते अपेक्षित ठिकाणापासून दूर उतरले गेले. मात्र, ते तिरपे झाल्याने किंवा चुंबकीय क्षेत्रात सापडल्यामुळे त्याचा पुढे संपर्क तुटला असावा. चंद्रावरील १४ दिवस आणि १४ रात्र या खेळात अकस्मात एके दिवशी चांद्रयानाशी संपर्क साधण्याची शक्यता आहे, असा विश्वास डॉ. फोंडके यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तीन यानांचा समूह

‘चांद्रयान-२’ म्हणजे तीन यानांचा समूह आहे. यातील १) मातायान - चंद्राभोवती प्रदक्षिणा घालते. २) विक्रम अवतरण यान : चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात शिरकाव करून माहिती घेते आणि ३) प्रज्ञान संचार यान : आसपासच्या परिसराची अधिक माहिती मिळवते. यातील ‘विक्रम’चा संपर्क तुटला असला तरी ‘मातायान’ चंद्रापासून १०० किमी अंतरावर अजूनही प्रदक्षिणा घालत आहे. त्रिमिती नकाशात ‘विक्रम’चा ‘मातायाना’शी संपर्क तुटला नसल्याचे दिसत होते.

दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे कारण

-चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अजून कोणीही उतरलेले नाही.

-तेथे जास्तीत जास्त अंधार असतो.

-पाणी आणि खनिज मुबलक आहे.

-चंद्रावर ‘हेलियम-३’ वायू मुबलक प्रमाणात आहे

-अणुमिलनाच्या प्रक्रियेत त्याचा फार मोठा उपयोग होतो.

-कमीत कमी खर्चात मोठ्यात मोठी राबवलेली ही मोहीम होती.

-यश की अपयश?

-चांद्रयानाचे ९८ टक्के मार्गक्रमण निर्धारित वेळेत झाले.

-आजपर्यंत जगात १०९ प्रयत्न झाले. त्यापैकी ४७ प्रयत्न यशस्वी झाले.

-विज्ञानात प्रत्येक अभियान हा प्रयोगच असतो.

-चांद्रयानाचे तंत्रज्ञान हे स्वदेशी होते. त्याने आपण चंद्राच्या अगदी नजीक जाण्यात यशस्वी झालो आहोत.

‘चांद्रयान नुकसानकारक नाही’

“दारिद्रय नुसते आर्थिक नसते, तर ते तांत्रिक आणि वैचारिकही असते. आपली पॉवर वाढविण्यासाठी तांत्रिक दारिद्रय घालवावे लागेल. चांद्रयानामुळे ३६ हजार किमी उंचीवरून मानव संसाधन संपत्तीचा शोध घेता येऊ शकतो. वन संपत्ती, खनिज संपत्ती याचा शोध घेऊ शकतो. माहिती देऊन किंमत वसूल करू शकतो. हे तंत्रज्ञान स्वबळावरच विकसित करू शकतो,”असेही डॉ. फोंडके यांनी स्पष्ट केले. लोकमान्य सेवा संघाच्या कार्याची माहिती अध्यक्ष मुकुंदराव चितळे यांनी दिली. अमेया जाधव यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. चांद्रयानाचे कुतूहल जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.