हिंदू संस्कृती ज्ञान आणि विज्ञान एकत्र बांधून ठेवणारी : योगी आदित्यनाथ

    दिनांक  28-Sep-2019 15:48:53मुंबई : विज्ञान आणि ज्ञान एकत्र बांधून ठेवणारी संस्कृती अशी भारतीयांची आणि पर्यायाने हिंदूंची संस्कृती असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. शुक्रवार, दि. २७ सप्टेंबरपासून मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०१९’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले
, “भारताचे जगाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान हे ३३ टक्के इतके होते. मुघल आणि इंग्रजांच्या आक्रमणानंतर हे प्रमाण ढासळत गेले. ज्यावेळी इंग्रजांनी राज्य करण्यास सुरुवात केली, तेव्हा योगदान चार टक्क्यांवर येऊन पोहोचले. हा काळ भारतीयांसाठी आत्मविश्वास खालावणारा ठरला. ज्यावेळी अर्थतज्ज्ञ याचे आकलन करतात, तेव्हा हिंदू इकॉनॉमी असा उल्लेख करतात. मात्र, त्यांनी जर आमचा इतिहास पाहिला असता, आमची संपन्नता पाहिली असती तर, तसा उल्लेख केला नसता. जेव्हा कोणताही समाज स्वतःच्या अस्तित्वाशी झगडत असतो, त्यावेळी त्याचा सन्मान परत करण्यासाठी, पुन्हा बळकट करण्यासाठी अशा मंचाची गरज असते. आम्ही ज्यावेळी धर्माच्या छताखाली एकत्र आलो, त्यावेळी धर्मनिरपेक्षता दाखविण्यात आली, ज्यावेळी एक राष्ट्राच्या नावाने एकत्र आलो पण बहुराष्ट्रीयता सांगण्यात आली, हिंदी भाषेच्या नावे एकत्र आलो तर आम्हाला बहुभाषिकता दाखविण्यात आली. मात्र, गेल्या पाच वर्षांत भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा बदलत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात आपले सण, उत्सव, संस्कृती जगासमोर पुन्हा मांडून एक नवा दृष्टिकोन जगाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रयागराज कुंभमध्ये २४ कोटी लोकांनी सहभाग नोंदवला यावेळी स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था पाळत हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. यावेळी तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र, प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्था याचा मेळ बसवत हा सोहळा साजरा झाला. जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला,” असे ते यावेळी म्हणाले.या परिषदेला वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विज्ञानंद
, अध्यक्ष सुरेश पन्सारी, सचिव आशिक भुटा, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड डिफेन्स एरोस्पेस टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल, वेलस्पूनचे अध्यक्ष बी. के. गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते. उत्पादन क्षेत्रातील बदल आणि आव्हाने, स्टार्टअप, कृषी, गुंतवणूक आदी क्षेत्रातील विविध चर्चासत्र यावेळी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या दुसर्‍या व शेवटच्या दिवशी सेवा क्षेत्र, ई कॉमर्स, पर्यटन, कौटुंबिक व्यवसाय आदी क्षेत्रांतील विषय हाताळले जाणार आहेत.कॉर्पोरेट क्षेत्रातील दिलासा स्वागतार्ह


अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कर कमी करून उद्योजकांना दिलासा दिला आहे
. कराचा बोजा कमी झाल्याने अधिकाधिक कंपन्या नव्याने विस्तार करतील, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिकच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारच्या सूचना, योजना आणि नवीन संकल्पना मांडत आहोत.

- स्वामी विज्ञानंद, संस्थापक, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम