टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग-३)

    दिनांक  28-Sep-2019 21:25:39
 आपली सामाजिक मते ‘केसरी’त मांडण्याचा प्रसंग आला आणि आगरकरांची कोंडी कशी झाली, याचे न. चि. केळकरांनी यथार्थ वर्णन केले आहे. ते म्हणतात, “पण आगरकरांची गोष्ट वेगळी होती. ते स्वतः संपादक असल्यामुळे मतभेदाची अडचण त्यांना फार भासली. आपली मते लिहावी तर न्यू स्कूलातील आपले समान अधिकारी लोक नाखूष होणार. त्यांची मते लिहावी तर ती गोष्ट स्वतःच्या विवेक बुद्धीला नापसंत. लिहून आलेला मजकूर म्हणून आपला लेख घालावा, तर आपल्याच घरात हवे तसे बसण्या उठण्याच्या चोरीची लाज वाटावी आणि स्वतःच्या सहीवर लेख प्रसिद्ध करावा तर स्वतः घरधनी असता आपण आपल्यालाच भाडेकर्‍याप्रमाणे भाडेचिठ्ठी लिहून देण्याचा प्रसंग!” पण, सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत बहुमत हे टिळकांच्या बाजूचे असल्याने आगरकरांचा नाईलाज झाला आणि ‘केसरी’ टिळकांच्या ताब्यात गेला.‘केसरी’ आणि ‘मराठा’ वर्तमानपत्रांच्या व्यवस्थेत बदल करावे लागले यासाठी केवळ सोसायटीच्या अंतर्गत व्यवस्थापनासंदर्भातील मतभेद इतकेच मर्यादित कारण नव्हते असे दिसते. भोवतालचे सामाजिक प्रश्नही या अंतर्गत मतभेदाला कारण झाले. त्यामुळे हे सामाजिक प्रश्नही जाणून घ्यायला हवेत. १८८४ या वर्षात पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी हालचाल सुरू झाली. यासाठी आगरकरांनी ‘केसरी’तून जोरदार पाठिंबा दर्शवला, तर ‘मराठा’तून मात्र, मुलींना शिक्षण द्यावे, पण ते इंग्रजीतून न देता मराठीतून देण्यात यावे, असा आग्रह धरण्यात आला. दरम्यानच्या काळातच बालविवाहाचा कायदा करावा की करू नये, याबद्दलच्या वादाला तोंड फुटले. परिणामी, ‘केसरी’ व ‘मराठा’तील मतभेद आणि वादही वाढले.हिंदू धर्मात विशेष सुधारणा घडवून आणाव्या, अशा मताचे बेहरामजी मलबारी हे ‘इंडियन स्पेक्टेटर’ या पत्राचे संपादक होते. आपली समाजसुधारणाविषयक मते मांडण्यासाठी वृत्तपत्र हे हुकुमी साधन त्यांच्याकडे होते. आपली मते समाजातील बड्या मंडळींसमोर तसेच सरकार दरबारीसुद्धा मलबारी सादर करत. हिंदू धर्मातील बालविवाह आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारे वैधव्य, त्यांचा पुनर्विवाह याबद्दल दोन टिपणे मलबारींनी १८८४ च्या मे आणि जून महिन्यात तत्कालीन व्हाईसरॉय ‘लॉर्ड रिपन’ यांच्यासमोर सादर केली. त्या प्रस्तावावर विविध प्रांतातून तसेच समाजातील मान्यवर लोकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या. बालविवाहाच्या प्रथेबद्दल कायदा करावा की करू नये या मुख्य मुद्द्यावर मते मागवली तेव्हा ६८ पैकी ४७ लोक कायदा करू नये, या मताचे होते. खरेतर बालविवाह बंद व्हावा, असे लोकांना वाटत होते. परंतु, सरकारच्यावतीने कायदा करण्याची गरज नाही, या मताचे बहुतांश लोक होते. आगरकर कायदा व्हावा, या मताचे असल्याने त्यांची मते ‘केसरी’तूनही व्यक्त होत असत. दुसरीकडे ‘मराठा’ टिळकांच्या ताब्यात असल्याने कायदा होऊ नये, सरकारने हिंदू धर्मात ढवळाढवळ करू नये, अशी मते ‘मराठा’तून व्यक्त होत. आगरकरांची ही कायद्याच्या बाजूने असलेली मते सोसायटीत इतर सभासदांना मान्य नव्हती. त्यांची कोंडी होऊ लागली. त्यामुळे आम्हाला या वादाबद्दल काहीच भूमिका घ्यायची नाही, असेही त्यांना नाईलाजाने म्हणावे लागले.‘केसरी’ व ‘मराठा’त व्यक्त केली जाणारी मते सर्वांच्या संमतीने, बहुमताने प्रसिद्ध व्हावीत, असा आजवरचा शिरस्ता असल्याने आगरकरांना प्रसंगी आपल्या मतांना मुरड घालून संदिग्ध भूमिका घ्यावी लागली. हे सर्व आगरकरांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध होते. अखेरीस दि. १६ डिसेंबर, १८८४च्या अंकात आगरकरांनी आपले नाव घालून ‘केसरी’त लेख लिहिला. आगरकर म्हणतात, “नाव घालून लेख छापण्यात काही मात्तबरी आहे, असे आगरकरांना बिलकुल वाटत नाही. पण, बालविवाहाच्या निषेध साधनाविषयी त्याचे आणि त्याच्या मित्रांचे विचार जुळत नसल्याने त्यांना या मार्गाचे अवलंबन करावे लागत आहे. माझ्या जीवलग मित्रांनी आम्ही आरंभिलेल्या सामाईक उद्योगाची जबाबदारी प्रत्येकाकडे थोडीथोडी वाटून देण्याचा ठराव करून माझ्या माथ्यावर ‘केसरी’चे प्रकाशकत्व ठेवले. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नावर ‘केसरी’त एडिटोरिअल कॉलमाखाली जे अभिप्राय द्यावयाचे ते अर्थात मला पसंत असून निदान तीतील बहुतेकांस तरी पसंत असले पाहिजेत व शेकडा ९९ पूर्णांक ३/४ बाबतीत असतात. पण, या बाबतीत माझा बाकीच्यांशी चार आण्यांचा विरोध आहे व तो आम्हा उभयतांसही फार महत्त्वाचा वाटत आहे.”‘केसरी’ व ‘मराठ्या’त प्रसिद्ध होणारे विचार बहुमताने ठरत याबद्दल आगरकरांनी दिलेली ही कबुली फार महत्त्वाची आहे. याचा सरळसरळ अर्थ असा होतो की, सामाजिक प्रश्नावर टिळक नव्हे, तर आगरकर एकटे पडले होते. त्यांची मते, इतरांपेक्षा निराळी होती. दुसरीकडे टिळकांचा ‘मराठा’ हा बिलाच्या विरुद्ध बोलत होता, याची साक्ष आगरकरांच्या पुढील वाक्यावरून पटते. ते म्हणतात, “उलटपक्षी ‘मराठ्या’सारखे रथी महारथी धनुष्ये सज्ज करून बाणावर बाण सोडत आहेत.” (लो.टि.चरित्र- खंड १ - १८५) आगरकरांनी हा लेख अर्धवट सोडला आहे. पुढे १८८५ साली महाविद्यालयाची सुरुवात झाल्यामुळे या वादावर आपोआप पडदा पडला, असे काहींचे मत आहे. पण, वाद थांबला नाही, असे उपलब्ध साधनांवरून आढळून येते. पुण्यात या वादासंदर्भात सभा भरवल्या जाऊन या विषयावर वाद प्रतिवाद होणे थांबले नव्हते. ‘केसरी’ व ‘मराठा’ यांच्यातील वितुष्टाच्या मोठ्या प्रमाणातील आरंभास हा वाद कारणीभूत होता....तर अशा स्वरूपाच्या सामाजिक प्रश्नांवरून वाद सुरू झाले होते हे खरे. सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात बहुमत आपल्या बाजूला नसल्याने बर्‍याचदा स्वतः संपादक असूनही आगरकरांना ‘लिहून आलेला मजकूर’ या सदराखाली किंवा स्वतःचे नाव छापून लेखन करावे लागले. दरम्यानच्या काळात शाळेच्यासंबंधातील सामान खरेदीबद्दल काही मतभेद झाले होते. टेबल, खुर्च्या, कपाटे, कोच यांच्या खरेदीवरून आगरकरांना प्रश्न विचारल्याने ते मतभेद निर्माण झाले. त्यातच गोळे यांनी केलेली रसायनांची खरेदी तसेच शंकर मोरो रानडे यांना दिलेली २०० रुपयांची उसनवारी याही प्रश्नाकडे आगरकरांनी लक्ष देण्यास सांगितले होते. सोसायटीतील अंतर्गत मतभेद तसेच सामाजिक प्रश्नाबद्दल प्रत्येक आजीव सभासदाची निराळी मते होती. या सगळ्या मतामतांच्या गलबल्यातसुद्धा पुढची दोन वर्षे ‘केसरी’ व ‘मराठा’ ही पत्रे डेक्कन सोसायटीची आरगने (हस्तक ) आहेत, असे केसरीकार म्हणत होते हे विशेष!१८८७च्या आरंभापासून
‘केसरी’ आणि ‘मराठ्या’चे व्यवस्थापन टिळकांकडे आले याचा वृत्तांत मागे दिला आहेच. व्यवस्थापक टिळक असले तरीही संपादक म्हणून आगरकरच काम पाहत. या काळात १८८६ मध्ये ‘दाजी विरुद्ध रखमा’ या दोघा नवरा-बायकोच्या वितुष्टाचा खटला न्यायालयापर्यंत गेला. तसेच फिमेल हायस्कूलमधील मुलींच्या अभ्यासक्रमाचा वादही गाजला. त्यात मलबारी यांनी लावून धरलेला बालविवाहाच्या कायद्याचा प्रश्नही अधूनमधून डोके वर काढत होताया सगळ्याचा परिणाम वृत्तपत्रातून दिसून आला. टिळक व्यवस्थापक असल्याच्या काळात म्हणजेच, ३१ मे १८८७च्या अंकात ‘केसरी’ने आपल्या सामाजिक धोरणाचा खुलासा करताना म्हटले, “खरोखर वाईट अशा एतद्देशीय रितीभातीस ‘केसरी’ कधीही दोष दिल्यावाचून राहिला नाही. त्या हळूहळू परंतु खास दूर केल्या पाहिजेत, असेच ‘केसरी’ने सदासर्वकाळ मत दिले आहे. परंतु, या गृहस्थांचे हळूहळू निराळे व आमचे निराळे. यांचे हळूहळू म्हणजे एकदम कायदा; व आमचे हळूहळू म्हणजे ज्ञानप्रसार. ह्यांस आम्ही काय करावे?”‘दादाजी विरुद्ध रखमा’ या वादाबद्दल ‘केसरी’चे बारा अंक वादविवादाने व्यापलेले आहेत
रखमाबाईंच्या खटल्यात अनेकांनी थेट ‘स्त्रीशिक्षणाला’ या अशा बेछुट वागण्यासाठी जबाबदार धरले, तर काहींनी त्यांची तुलना थेट आनंदीबाई जोशी यांच्याशी केली. याचा ‘केसरी’ने कडक शब्दांत विरोध केल्याचे दिसते. ‘केसरी’ हा रखमाबाईंच्या विरुद्ध आहे, पण तो स्त्रीशिक्षणाच्या विरुद्ध नाही, असे ‘केसरी’ने वेळोवेळी जाहीर केले. ‘केसरी’ला आणि केसरीकारांना आनंदीबाई जोशी यांच्यासारख्या सुशिक्षित स्त्रीविषयी अभिमान वाटत असे हे यावरून स्पष्ट झाले. रखमाबाई यांनी बरीच खटपट केली, पण अखेरीस त्यांना आपल्या पतीकडे नांदायला जावे असा निकाल ३ मार्च, १८८७ या दिवशी देण्यात आला. आगरकर संपादक असले तरी ‘केसरी’ त्यावेळी टिळकांच्या मर्जीने चालत होता, त्या निर्णयाचे स्वागत टिळकांनी केले.महिलांना इंग्रजीतून शिक्षण द्यावे की नाही
, संमतीवय आणि बालविवाह याबद्दल कायदा करावा की नाही, अशा विषयांवर आगरकरांचे टिळक आणि इतर सहकार्यांशी मतभेद झाले असले तरी या व्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्यात एकमत होते, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आगरकर आपली स्वतःची मते वेळोवेळी बाहेर मांडत असतच. ‘केसरी’त लिहिताना त्यांनी मात्र स्वतःवर काही बंधने घालून घेतली असावीत. धर्मविषयक प्रश्न वगैरेवर हातचे राखूनच आगरकर आपली मते मांडत, असे दिसते. ‘धर्माची उठाठेव करून लोकांना दुखावण्याचा आमचा इरादा नाही,’ अशा सावधपणाच्या सूचनाही सुरुवातीच्या काळात ‘केसरी’त आगरकर देत ते याचमुळे असावे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘केसरी’ आणि ‘मराठा’त छापून येणारी मते ही सर्वसंमतीने विचार करून मगच प्रसिद्ध होत. पण, जसजसे नवे सामाजिक प्रश्न उद्भवू लागले, तसतसे आपापले सामाजिक विचार, भूमिका वर्तमानपत्रातून मांडण्यास जो तो लेखणी सरसावून पुढे होऊ लागला. या बाबतीत आगरकर टिळकांच्या पुढे होते. आगरकरांची मते सुधारणेच्या बाबतीत टोकदार दिसू लागताच आगरकरांनी त्यांच्या मतांचा उच्चार वर्तमानपत्रांमध्ये करावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला असेच दिसून येते.‘सामाजिक सुधारणा पाहिजे, पण ती कायद्याने नको,’ अशी भूमिका असलेले बहुतांश लोक संस्थेत त्या काळी होते. एकटे आगरकर त्यापेक्षा निराळ्या मताचे दिसतात. टिळक व्यवस्थापन पाहायला लागल्यापासून ‘फिमेल हायस्कूलातील शिक्षणक्रम’ या विषयावरील लेखमाला त्यांनी सुरू केली होती. रा. रानडे यांच्या भूमिकांवर टिळक उघडपणे लिहीत, टीका करत. आगरकरही ‘लिहून आलेला मजकूर’ या सदरात आपली मते मांडत, त्या टीकेला उत्तर देत. ‘केसरी’चे संपादक आगरकर आहेत, अशी लोकांची समजूत होती. पण, ‘केसरी’त मात्र ‘सुधारकां’च्या विरुद्ध लिहिले जाऊ लागले होते. यामुळे आगरकर व्यथित झाले असावेत. परिणामी, त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ची कायमची व्यवस्था लावण्याचा आग्रह धरला असावा. त्यामुळे १८८७च्या सुरुवातीपासून या विश्वस्तांमधील भांडणे आणि मतभेद यांचे पडसाद ‘केसरी’तही उमटायला लागले असे म्हणावे लागेल.या सगळ्या वादांच्या वादळात आगरकर
, टिळक, आपटे सगळ्यांची मते वेगवेगळ्या रुपात समोर येऊ लागली. एकमेकांवर उघड टीका होऊ लागली. ‘केसरी’ आणि ‘मराठा’तील लेख आणि मते वाचून आता लोक मात्र बुचकळ्यात पडले. सगळ्यावर उपाय म्हणून दि. २८ जून, १८८७च्या ‘केसरी’च्या अंकात संपादकांनी खुलासा केला, “हल्लीच्या लाईफ मेंबरात ‘केसरी’ व ‘मराठ्या’शी संबंध नाही असे लोक आले. त्या दिवशीच ही दोन्ही पत्रे लाईफ मेंबरांचे ऑर्गन (मत दर्शवणारी) नाहीत असे झाले. लाईफ मेंबरांपैकी काहींचा संबंध या पत्रांशी आहे. येवढ्यावरून त्यात येणार्‍या लेखांची जबाबदारी सर्वांच्या माथ्यावर मारता येत नाही.” 
सामाजिक बाबतीतील मतभेद आणि सोसायटीचे अंतर्गत कलह यांचा मेळ बसत नाही, सूचनेवरून स्पष्टच दिसून येत होते. त्यामुळे हे वाद थांबवायचे असतील तर काहीतरी ठोस उपाय करणे गरजेचे झाले असावे. परिणामी, दि. २८ ऑक्टोबर, १८८७ रोजी ‘केसरी’च्या अंकात स्फुट छापून आले, ते असे - “आजपासून रा. बाळ गंगाधर टिळक, बी.ए. एलएलबी हे ‘केसरी’ पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम.ए. यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.” टिळक संपादक झाल्यामुळे आगरकरांचा ‘केसरी’सोबत असलेला संबंध कायमचा संपला का? आगरकरांनी ‘केसरी’त लिहिणे बंद केले का?

(क्रमश:)

-पार्थ बावस्कर
९१४६०१४९८९