बंगाली निर्माता, दिग्दर्शक मराठी चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त!

27 Sep 2019 14:19:39


 

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना त्यांच्या बलाढ्य संस्कृती आणि परंपरांचा वारसा आहे. येथील कला - साहित्य - संस्कृतीसह निसर्गरचनेतही कमालीचे साम्य आढळून येते. पश्चिम बंगालचं वैभव पाहण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच देणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरू झाले आहे.

'अवांछितमध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचे नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी फटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या भावविश्व, नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते. कसलेल्या मराठी कलावंतांसोबत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बंगाली कलावंतांनीही कंबर कसली आहे. मराठी प्रमुख कलावंतांसोबतच पडद्यामागील बहुतांश कलावंत बंगाली आहेत.


या चित्रपटात अष्टपैलू कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून युवा अभिनेता अभय महाजन व मृण्मयी गोडबोले या तरुण जोडगोळीसोबतच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण यांसह बंगाली अभिनेते बरून चंदा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.


यापूर्वी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोलकातामध्ये झाले आहे. मात्र
, प्रथमच संपूर्ण मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या शहरात होत आहे. हा चित्रपट मराठी असला तरी कथेचा संदर्भ कोलकाताशी निगडित आहे.

Powered By Sangraha 9.0