‘हाऊडी मोदी’च्या यशामागील मराठी चेहरा

    दिनांक  27-Sep-2019 22:50:11   
'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीयांना एकत्र आणणे, मोदींच्या स्वागताचा एक शानदार सोहळा आयोजित करणे हे सर्व शक्य करण्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राने महत्त्वाची भूमिका बजावली. हे सुपुत्र आहेत डॉ. विजय चौथाईवाले.प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा
, अशी घटना नुकतीच घडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम जगभरात गाजला. आजवर ज्या भूमीला जगातील गौरवाचा मानबिंदू समजले गेले, त्याच भूमीवर भारतमातेचा जयजयकार होताना पाहून प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे. या सगळ्याची क्षणचित्रे आपण दूरदर्शनवरून पाहिली. भारतापासून हजारो किमी दूर असलेल्या अमेरिकेत भारतीयांना एकत्र आणणे, मोदींच्या स्वागताचा एक शानदार सोहळा आयोजित करणे हे सर्व शक्य करण्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राने महत्त्वाची भूमिका बजावली. हे सुपुत्र आहेत डॉ. विजय चौथाईवाले.विजय चौथाईवाले हे
 'हाऊडी मोदी’ असे मोठ्या आपुलकीने विचारू इच्छिणार्‍या अमेरिकेतील हजारो भारतीयांच्या अभिव्यक्तीसाठी माध्यम झाले. ‘हाऊडी मोदी’ हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून शक्य झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय राजकारणदेखील प्रभावित केले आहे. डॉ. विजय चौथाईवाले मूळ नागपूरचे आहेतडॉ. विजय यांचे वडील रा. स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते व तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निकटवर्तीय होते. डॉ. विजय यांचे बालपण संघकार्याला आयुष्य वाहून घेतलेल्या महापुरुषांच्या सान्निध्यात गेले. डॉ. विजय चौथाईवाले शिक्षणाने व पेशाने जैवतंत्रज्ञआहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर विजय यांना परदेशातून नोकरीची संधी चालून आली. बालपणापासून सामाजिक बांधिलकी जपणार्‍या वातावरणात वाढल्यामुळे विजय चौथाईवाले यांना सामाजिकतेची वाट खुणावत असे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा गुजरातसाठी काही योजना आखण्यात विजय चौथाईवाले यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. विजय चौथाईवाले मोदींच्या सोबत काम करण्यासाठी परदेशातील नोकरी सोडून गुजरातमध्ये आले आणि अहमदाबादमध्ये स्थायिक झाले. नरेंद्र मोदींसह गुजरातच्या विकासाची स्वप्ने रंगवताना काही योजनांमध्ये गुंतले ते कायमचेच. विजय चौथाईवाले यांची बुद्धी व कल्पकता कधीही छोट्या-मोठ्या अपयशाने कोमेजली नाही. सदैव नव्या संकल्पना, कार्यक्रम, अनोखे उपक्रम यांनी विजय चौथाईवाले यांच्या विचारांना व्यापून टाकले. अशा सृजनशक्तीतूनच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नवे पदर उलगडू लागले, असे म्हणायला हरकत नाही.


डॉ
. विजय चौथाईवाले यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाने चौथाईवाले यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय जबाबदारी दिली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विजय चौथाईवाले ज्या पक्षाच्या यंत्रणेत काम करतात, तिथे सर्वच ’राष्ट्रीय’ आहेत. जगभरात सीमोल्लंघन करीत असताना स्वराष्ट्रहिताची काळजी घेण्याची सवय डॉ. विजय चौथाईवाले यांच्यासारख्या व्यक्तींना पक्षसंघटनेतील वातावरणानेच लावली असावी. विजय चौथाईवाले यांनी विदेश विभागाची जबाबदारी स्वीकारल्यावरओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजप,’ ’फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ अशा अनेक आघाड्यांवर आक्रमकतेपणाने काम करण्यास सुरुवात केली. परदेश दौरे, प्रतिनिधी मंडळ, नेत्यांच्या भेटीगाठी या सगळ्यापलीकडे विदेश नीतीच्या कक्षा विस्तारत नेण्यात डॉ. विजय चौथाईवाले यांचे योगदान आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विश्लेषणात्मक अभ्यास करताना त्यांची दखल घ्यावीच लागते. मोदींसाठी परदेशातील मार्ग प्रशस्त करण्यात जे प्रमुख अदृश्य हात सक्रिय असतात, त्यात डॉ. विजय चौथाईवाले यांचे नाव प्रामुख्यानेच घ्यावे लागेल. व्यक्तीची महती शेवटी त्याच्या प्रत्यक्ष व्यवहारातून प्रतीत होत असते. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाविषयी एका हिंदी वृत्तवाहिनीला काही माहिती मिळाली असावी. या कार्यक्रमासाठी डॉ. विजय चौथाईवाले दोन महिन्यांपासून अमेरिकेत आहेत, ही बातमी या हिंदी वृत्तवाहिनीपर्यंत पोहोचली.

 

डॉ
. विजय यांची त्यांनी अमेरिकेतून लाईव्ह मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या वृत्तवाहिनेचा भ्रमनिरास झाला असावा. डॉ. विजय यांनी विनम्रपणे मुलाखत दिली. कॅमेर्‍यासमोर येत असताना मात्र ते अत्यंत साध्या वेशात, एखाद्या जवळच्या मित्राला भेटावे अशा आविर्भावात होते. वृत्तनिवेदकाने मोठ्या आवाजात विजय चौथाईवाले यांचा परिचय ‘मोदीके सिक्रेट सुपरस्टार’ असा करून दिला. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमामागे हेच आहेत, असे तो निवेदक मोठ्या उत्साहाने सांगू लागला. डॉ. विजय यांनी दिलेल्या प्रत्युत्तराने मात्र त्यांच्या यशाचे ‘सिक्रेट’ जगजाहीर केले. “मी केवळ एकटाच नाही, तर गेले अनेक दिवस असंख्य स्वयंसेवक ’हाऊडी मोदी’ कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या यशाचे हे फलित आहे.” तेव्हा ‘हाऊडी मोदी’साठी ५० हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. संबंधित मुलाखत ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी झाली. डॉ. विजय चौथाईवाले यांनी दिलेल्या उत्तरातून ’हाऊडी मोदी’सारखे कार्यक्रम व प्रत्यक्षात मोदी का यशस्वी ठरतात, याचे गुपित सामावले आहे. भाजपचेखासदार किती, आमदार किती, यापेक्षा त्यांच्याकडे विजय चौथाईवालांसारखे असंख्य कार्यकर्ते असतात, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.