भारतीय नंदनवनाचा प्रवास आणि आपले पर्यटन

    दिनांक  27-Sep-2019 10:36:02आज २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाच्या संधी आणि प्रेक्षणीय स्थळे यांचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...


'पृथ्वीवरचा स्वर्ग' असे ज्या भूमीचे वर्णन केले जाते, ते काश्मीर हे नेहमीच भारतीय जनमानसाच्या अंतःकरणाचा एक हळुवार पण दुखरा कोपरा राहिलेले आहे. ५ ऑगस्ट, २०१९ या दिवशी 'अनुच्छेद ३७०' आणि '३५ अ' रद्द झाले आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये या राज्याचे विभाजन झाले. (लेखन सोयीसाठी दोन्ही प्रदेशांचा एकत्रित 'काश्मीर' असा उल्लेख या लेखात केला आहे.) त्या दिवसापासून गेला दीड महिना या निर्णयांचे अनेक राजकीय, भूराजकीय, सामाजिक, आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर विविध प्रकारचे मूलभूत स्वरूपाचे बदल घडत आहेत. काश्मीरमध्ये सध्या राजकीय, आंतरराष्ट्रीय, प्रशासकीय, विधिज्ञ हालचाली सुरू असताना सरकारच्या या निर्णयामुळे येथील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल, अशी आशा पर्यटन व्यावसायिकांना वाटू लागली आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही ज्या पद्धतीने जम्मू-काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली, त्याचा विचार करता पर्यटन व्यावसायिकांना असा विश्वास वाटतो की, पहिला धुरळा बसल्यानंतर काश्मीर आणखी मजबूत आणि सुरक्षित होईल आणि सार्वजनिक जीवनात सामान्य स्थिती परत येईल.

 

'अनुच्छेद ३७०' काढून टाकल्यामुळे काश्मिरातील पर्यटन, कृषी इ. क्षेत्रांच्या वाढीसाठी आता मोठा वाव मिळू शकतो. कारण, जम्मू-काश्मीरच्या बाहेरचे गुंतवणूकदारही आता जम्मू-काश्मीरमध्ये 'स्थावर मालमत्तेत गुंतवणूक' करू शकणार आहेत. सरकारी धोरणेही त्या दृष्टिकोनातून व्यवसायांना पूरक अशी होतील. हा एक खूपच मोठा सुधारणात्मक आणि सकारात्मक बदल आहे. कारण, अशा अस्थिर, संवेदनशील राज्यात शेवटी स्वसंपादित भूमीवर उद्योग उभारणे आणि भाडेतत्त्वावर जमीन ग्रहण करून उद्योग करणे यात फरक असतो. त्यामुळे ही बाब मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने आपली काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची मनीषा जाहीर केली आहे. केवळ भारतीयच नाही तर पर्यटन आणि विविध व्यवसायातील परकीय गुंतवणूकदारही या संधीचा लाभ घेतील. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वांगीण पायाभूत सुविधांचा विकास अशा गुंतवणुकींमार्गे पोहोचेल. सामान्य काश्मिरी जनतेला याचा सर्वात जास्त लाभ मिळवता येणार आहे. सर्व प्रकारच्या काश्मिरी वस्तू, अन्नपदार्थ, सेवा यांची निर्यात आणि एकूणच खप मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची क्षमता या निर्णयामुळे वाढली आहे. 'काश्मिरी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वस्तूंना नवीन स्वरूपात, उत्पादनाचा अधिक चांगला दर्जा गाठून मोठ्या प्रमाणात बाजारात विकता येण्याच्या चांगल्या संधी आता उपलब्ध होऊ शकतात. समाधानाची बाब ही आहे की,या सगळ्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारे फायदा स्थानिकांनाच होणार आहे. काश्मीर हे जगातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांपैकी एक स्थळ गणले जाते. भारतात आज पर्यटनाच्या क्षेत्रांत अनेक राज्ये नवनवीन पर्यटनस्थळे, सुविधा निर्माण करत आहेत, पण काश्मीर मात्र सर्वाधिक सुंदर, नयनरम्य असूनही त्याला म्हणावा तितका प्रतिसाद अजून मिळालेला नाही. पर्यटनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, वैयक्तिक ओळखीतून लोकांना एखाद्या पर्यटनस्थळाची, सेवेची माहिती मिळाली तर तिला मिळणारा प्रतिसाद हा केव्हाही बाजारू जाहिरातींपेक्षा जास्त असतो. येथील दहशतवादामुळे, अस्थिर, अनिश्चित राजकारणामुळे काश्मीरला मात्र हा फायदा आजपर्यंत कधीही उठवता आलेला नाही. कारण, रोज इथे काहीतरी नवे कांड घडलेले असायचे. माझ्या ओळखीत कोणी आनंदाने, सुरक्षितपणे जम्मू-काश्मीरला जाऊन आले म्हणजे मी जाईन तेव्हा हा भाग सुरक्षित असेलच असे नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, आता जम्मू-काश्मीर आणि लडाखसमोर कितीतरी नव्या सुवर्णसंधी हात जोडून उभ्या राहणार आहेत, असे आशादायक चित्र दिसू लागले आहे.

 

काश्मीरमध्ये पर्यटनाच्या संधी

 

आपल्याला माहितीच आहे की, जम्मू-काश्मीरचा उत्तरेकडील भाग पाकिस्तानने जबरदस्तीने स्वतःच्या ताब्यात ठेवला आहे. यात गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि आझाद काश्मीर (पाकी टर्मिनॉलॉजी) म्हणजे पश्चिम जम्मू हे दोन भाग येतात. तसेच अक्साई चीन हा लडाखचा उत्तरेकडचा भाग चीनने १९६२ पासून पळवून आपल्या ताब्यात घेतलेला आहे. तरीही उर्वरित काश्मीरमध्ये फिरण्यासाठी, पाहण्यासाठी अत्यंत सुंदर, रमणीय पर्यटनस्थळे आहेत. येथील हवा, वातावरण अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. हिमालयाचे पश्चिमेकडील टोक असल्यामुळे वातावरण भयंकर थंड असते. निर्मळ पाण्याच्या नद्या, ओढे, उंचावर जात जाऊ तसतशी पाहायला मिळणारी भव्य, बर्फाच्छादित शिखरे, मनमोहक चिनार आणि देवदार सूचिपर्णी वृक्षांची जंगले, लालेलाल सफरचंदांनी लगडलेल्या फळबागा, केशराची शेती, तलावांमधले मोहक शिकारे, प्रतिष्ठित हाऊसबोट्स, वसंतातील रंगीबेरंगी ट्युलिप्स, नेत्रदीपक बर्फाची शुभ्र चादर लपेटलेली छोटीमोठी गावे, शहरे अशी ही न संपणारी यादी आहे. मार्च ते ऑगस्ट या महिन्यांत काश्मीरची सहल ठरवता येते. बर्फाचा आनंद घ्यायचा असेल, तर डिसेंबर-जानेवारीत जाता येते. या लेखाच्या निमित्ताने आपण काश्मिरातल्या काही पर्यटनस्थळांविषयी जाणून घेऊ.

 

श्रीनगर

 

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर हे निःसंशय सुंदर आणि टुमदार शहर आहे. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेल्या या शहराला येथील चकचकीत आणि शुद्ध तलावांमुळे 'हिमालयाचा आरसा' म्हणतात. बोटिंग, ट्रेकिंग, बर्ड वॉचिंग, वॉटर स्कीईंग इ. अनेक गोष्टी इथे करता येतील. जगप्रसिद्ध 'दल लेक' इथेच आहे. इथे आपल्याला हाऊसबोटीत राहता येते. शिकाऱ्याची सवारीही करता येते. काश्मिरी पाककृती आणि काश्मिरी संस्कृतीचा आनंददायी अनुभव इथे घेता येतो. निशात बाग, शालिमार बाग, चष्माशाही बाग इ. अत्यंत सुंदर मुघल गार्डन्सना इथे भेटी देता येतील.

 

गुलमर्ग आणि सोनमर्ग

 

'फुलोंका शहर' म्हणून प्रसिद्ध असणारी ही शहरे म्हणजे फुलवेड्यांसाठी पर्वणीच आहे. हिवाळ्यामध्ये गोंदोला राइड्स, माऊंटन बाईकिंग, ट्रेकिंग, स्कीईंग असे साहसी प्रकारात मोडणारे खेळ आपण इथे सुरक्षितपणे खेळू शकता. तसेच अत्यंत आकर्षक, रंगीबेरंगी फुलांनी वर्षभर बहरलेले सोनमर्ग हे प्रत्येक पर्यटकाने भेट द्यायलाच हवे असे ठिकाण आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेत इथे ट्रेकिंग, कॅम्पिंग करता येते. घोड्यावरून पर्वतशिखरांवर फिरायला जाणे, हेही इथले एक आकर्षण आहे.

 

कारगिल, द्रास

 

प्रत्येक भारतीयाने भेट दिलीच पाहिजे, असे हे एक ठिकाण आहे. श्रीनगरकडून लेहकडे जाणाऱ्या महामार्गावर कारगिल आहे. इथेच १९९९ साली पाकिस्तानसोबत आपले युद्ध झाले. भारतीय जवानांनी सर्व भौगोलिक परिस्थिती आपल्या विरुद्ध असतानाही प्राणपणाने लढून हे युद्ध जिंकले. निसर्गसौंदर्यात तर कारगिल अतिशय सरस आहेच, पण हा देदीप्यमान इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहायला, आपल्या मुलांना तो दाखवायला, त्यांना पराक्रमांचं, देशभक्तीचं बाळकडू पाजायला आपण इथे जायलाच हवं. 'कारगिल वॉर मेमोरियल,' 'मुलबेक गोम्पा,' 'शेरगोल,' 'उर्ग्यांन डिझॉन्ग,' 'वाख्या र्गयल' इ. जागांनाही तुम्ही भेटी देऊ शकता.

 

लेह

 

सुरक्षिततेच्या दृष्टीने लेह-लडाख काश्मीरच्या मानाने नेहमीच जास्त सुरक्षित होते. देशविघातक शक्तींनी काश्मीरचा प्रश्न अशा काही पद्धतीने 'प्रसिद्ध' केला होता की, सामान्य जनतेला काश्मीरची फुटीरतावादी चळवळ संपूर्ण राज्यात पसरलेली आहे, असे वाटावे. वास्तविक लेह-लडाख आणि जम्मूमधील जिल्हे, येथील जनजीवन बाकी भारतासारखंच शांत, स्वाभिमानी, राष्ट्रवादी विचारसरणीचंआहे. काश्मीर खोऱ्यातही काही फुटीरतावादी गट, राजकारणी आणि परकीय पैशाची लालसा असणारे काही देशद्रोही सोडता बाकी सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येत शांती आणि सुव्यवस्था, सुरक्षितता याच गोष्टींना महत्त्व देणारी आहे. असो. आता लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना उत्तम संधी प्राप्त होत आहेत. जगभरातील बायकर्ससाठी 'लेह-लडाख बाईकिंग' हा 'बकेट लिस्ट'मधील महत्त्वाचा 'आयटम' असतो. उंचच उंच पर्वत, 'अल्पाईन' म्हणजे उंचावरच्या डोंगररांगांच्या कुशीत विसावलेले प्रचंड पाण्याचे तलाव अशी विलक्षण निसर्गाची किमया लडाखमध्ये पाहावयास मिळते. येथील 'पँगाँग सो' म्हणजे खाऱ्या पाण्याचा महाप्रचंड जलाशय आहे. याचा केवळ एक तृतीयांश भाग भारतीय हद्दीत येतो, तर बाकीचा दोन तृतीयांश भाग चीनमध्ये विस्तारलेला आहे. तसेच इथे त्सोमोरिरी, हन्ले, झंजकार व्हॅली, नुब्रा व्हॅली अशी अप्रतिम निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आणि मनभरून वन्यजीवनाचा अनुभव देणारी ठिकाणे आहेत.

 

कठुआ, पहलगाम, पूंछ, पुलवामा, अनंतनाग ही सगळी काश्मिरी स्थळांची नावेही आता विविध कारणांमुळे आपल्या चांगल्याच माहितीची आणि सरावाची झाली आहेत. पण, या नावांना चिकटलेली नकारात्मक प्रसिद्धी आपल्या मनातून खोडून टाकायची असेल तर या रम्य स्थळांना भेटी देऊन तिथे सुंदर आठवणी निर्माण करणे आणि त्याच गोष्टी आपल्या मित्रांना सांगणे, हे महत्त्वाचे काम आपण करू शकतो. 'हा देश आपला आहे' हे आपल्याला जसे वाटते, तसे ते सर्व भारतीयांना वाटावे, यासाठी काहीना काही प्रयत्न आपणच करायला हवेत. काश्मीर हा भारतीय उज्ज्वल इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. काश्यप ऋषींच्या नावामुळेच या भूमीला 'काश्मीर' हे नाव पडले, हे जगजाहीर आहे. पूर्वीच्या काळी इथे 'शारदा पीठ' नावाचे विद्यापीठ, विष्णू, मार्तंड, शंकर, राघव मंदिर, सरस्वती इ. देवांची मंदिरे होती. आताही ती भग्नावस्थेत पाहायला मिळतात. तसेच बुद्ध मूर्तीही होत्या. आजही आध्यात्मिक किंवा धार्मिक पर्यटन करायचे असल्यास जम्मू भागात अतीव सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण आणि जागृत देवस्थाने आहेत. वैष्णोदेवी, बाबा अमरनाथ या यात्रा करणाऱ्यांची संख्या येथे प्रचंड आहे. मोठ्या ताणतणावानंतर आता जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख हे प्रदेश विविध स्तरांवर स्थिर होत आहेत. बाकी भारतीयांप्रमाणेच प्रगतीची, शांत, आनंदी जीवनाची स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. आपणही अधिकाधिक संख्येने इथल्या स्थानांना भेटी देऊन त्यांना त्यांच्या भारतीयत्वाची जाणीव करून दिली पाहिजे. त्यातली सुरक्षितता, स्थिरता त्यांना अनुभवास येऊ लागली की, आपोआपच त्यांच्या मनातले गैरसमज नाहीसे होतील. काश्मिरी समाज आणि पर्यायाने भारत उज्ज्वल भविष्याकडे अधिक वेगाने वाटचाल करू लागेल.

 

- अमिता आपटे