एक मत, शक्ती अफाट

    दिनांक  26-Sep-2019 19:42:22   निवडणुका एक संदेश देतात की
, आज जे सत्तेवर आहेत, ते मरेपर्यंत सत्तेवर राहणारे नाहीत, त्यांचे सत्तेवर राहणे किंवा न राहणे याचा निर्णय त्यांनी करायचा नसून, किंवा त्यांच्या पक्षाने करायचा नसून तो जनतेने करायचा आहे.सापची एक कथा आहे. एका तळ्यातील बेडकांच्या मनात असा विचार आला की, पक्ष्यांना राजा आहे, माणसांना राजा आहे, प्राण्यांना राजा आहे, माशांना राजा आहे, आपल्यालाच कुणी राजा नाही. त्यांनी देवाला विनंती केली की, “आम्हालाही एक राजा दे.” देवाने आकाशातून एक लाकडाचा ओंडका टाकला. त्याचा भलामोठा आकार बघून प्रथम सर्व बेडूक घाबरले. हळूहळू ते त्याच्या जवळ गेले. तो काही करत नाही, हे पाहिल्यानंतर ओंडक्यावर चढून बसले. तरीही त्या राजाने काही केले नाही. असे अनेक महिने चालले. सगळे बेडूक वैतागले. हा कसला राजा, हा काही करीत नाही. त्यांनी देवाकडे काही करणारा राजा मागितला. देवाने मोठा साप पाठविला. तळ्यात येताच त्या सापाने प्रथम दोन-तीन बेडूक खाऊन टाकले. या राजाची बेडकांना भीती वाटू लागली. ते त्याच्यापासून दूर राहू लागले. तरीही दोन-तीन बेडूक तो खातच होता. राजा असा असतो. निष्क्रिय राजा काही कामाचा नसतो आणि जुलमी राजा दहशत निर्माण करतो. मनुष्यजातीने या दोन्ही प्रकारच्या राजांचा अनुभव घेतला. या अनुभवातून राज्यक्रांत्या घडल्या. राजघराणे कापली गेली. हळूहळू लोकशाहीचा उदय झाला. लोकशाहीचे मूलतत्त्व म्हणजे प्रजेनेच आपले राज्य कसे असावे, हे ठरवायचे असते. राज्यसंस्थेला आपल्यावर जुलूम करता येणार नाही, अशी बंधने घालावी लागतात. लोकशाहीत ‘प्रजा’ ‘राजा’ असते आणि तीच राज्यसंस्थेच्या राज्यशक्तीवर वेगवेगळ्या प्रकारची बंधने घालते. या बंधनांना आपण आपले मौलिक अधिकार म्हणतो. हे मौलिक अधिकार दुसरे-तिसरे काही नसून या अधिकाराच्या क्षेत्रात राज्यसंस्थेला प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करण्यास घालण्यात आलेली बंधने असतात.
लोकशाही आणि निवडणुका यांचे अतूट नाते असते. निवडणुका म्हणजे नागरिकांना मिळालेला मतदानाचा राजकीय अधिकार असतो. या अधिकाराचा वापर करून आपल्याला हितकारक असे शासन सत्तेवर आणण्याची जबाबदारी मतदारांवर असते. निवडणुकांचा दुसरा अर्थ असाही असतो की, लोकशाहीत जनता सार्वभौम असते. राजेशाहीत राजा सार्वभौम असतो. मतदानाच्या माध्यमातून मतदार त्याच्याकडे असलेल्या सार्वभौम शक्तीचा वापर करत असतो. सार्वभौम शक्ती अमर्याद असते. सामान्य मतदाराला सामान्यपणे याची जाणीव नसते. आपल्या एका मताने तो फार मोठे परिवर्तन घडवून आणू शकतो. लोकशाहीत सत्तेचा एकाधिकार कुणालाही दिलेला नसतो. लोकशाहीत घराणेशाही बसत नाही. लोकशाहीत एकाच पक्षाचे सरकार, निरंतर काळासाठी हेदेखील बसत नाही. आपण संसदीय पद्धतीच्या लोकशाहीचा अंगीकार केलेला आहे. या पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य हे असते की, अधिकारावर असलेले शासन त्याच्या राज्यकारभारासाठी प्रथम विधिमंडळाला जबाबदार असेल. तसेच ते जनतेला जबाबदार असेल. हे केवळ बोलण्यासाठी नसते. प्रत्यक्ष त्याची कृतीची व्यवस्था संविधानात केलेली असते. दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्याच लागतात. या निवडणुका म्हणजे राज्यकारभार करणार्‍या लोकांनी राज्य नीट चालविले की नाही, हे सार्वभौम जनतेने ठरवायचे असते. या निवडणुका एक संदेश देतात की, आज जे सत्तेवर आहेत, ते मरेपर्यंत सत्तेवर राहणारे नाहीत, त्यांचे सत्तेवर राहणे किंवा न राहणे याचा निर्णय त्यांनी करायचा नसून, किंवा त्यांच्या पक्षाने करायचा नसून तो जनतेने करायचा आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आता होणार आहेत. २१ ऑक्टोबरला आपल्याला मतदानाला जायचे आहे. मतदान करणे हा जसा राजकीय अधिकार आहे, तशी ती फार मोठी नैतिक जबाबदारी आहे. लोकशाहीमध्ये राजकीय अधिकार आणि नैतिकता याच्यातील सीमारेषा फार धूसर असते. राजकीय अधिकाराच्या संदर्भात एखादा म्हणू शकतो की, मला मतदान करायचे नाही. नैतिक जबाबदारीच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. ती पार पाडावी लागते. नैतिक मूल्यांचे पालन केले नाही, तर पाप-पुण्याच्या भाषेत सांगायचे तर, पाप लागते. मतदानाचा अधिकार हा नैतिक कशा आधाराने आहे? समाजजीवन नीट चालण्यासाठी, चांगली राज्यसत्ता अधिकारावर असावी लागते. राज्य करणारे प्रामाणिक, निःस्वार्थी, भ्रष्टाचार न करणारे, सत्तेचा गैरवापर न करणारे असावे लागतात. आपल्याकडे एक म्हण अशी आहे की, जसा राजा तशी प्रजा. सत्तेवर बसलेले अप्रामाणिक असतील आणि भ्रष्टाचारी असतील तर समाजात प्रचंड भ्रष्टाचार निर्माण होतो. भ्रष्टाचार अनाचाराची जननी आहे. यामुळे समाजाचे नैतिक अधःपतन होते. या धोक्यापासून वाचायचे असेल, तर मतदानाच्या आपल्या नैतिक अधिकाराचा वापर आपण केलाच पाहिजे. त्यामुळे आपल्याला सुखकारक शासन मिळण्याची शक्यता असते.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अनेक पक्ष उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती झाली आहे. वंचित बहुजन आघाडी हीदेखील छोट्या-मोठ्या पक्षांची युती आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्षदेखील निवडणुकांच्या रिंगणात आहेत. यापैकी कुणाला तरी निवडायचे आहे. अशी निवड करीत असताना, लोकशाही मूल्यांचा विचार करता काही गोष्टींचा विचार प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. लोकशाहीतील निवडणुका पक्षाधारित निवडणुका असतात. प्रत्येक पक्षाची कार्यक्रमपत्रिका वेगळी असते. विचारसरणी वेगळी असते, त्याची पारख मतदारांनी केली पाहिजे. एक काळ असा होता की, देशात समाजवादाचा नारा होता. या समाजवादामुळे भारत अधिक गरीब झाला. गरीबांची संख्या वाढली. सरकारीकरण झाले. सरकारी नोकरदारांचे कल्याण झाले. सामान्य माणसाचे हाल झाले. नंतरचा नारा आला, सेक्युलॅरिझमचा. या सेक्युलॅरिझमने लालू प्रसाद यादवसारखा भ्रष्ट माणूस जन्मास घातला. आज याच आरोपावरून देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरम तुरुंगात गेले आहेत. सेक्युलॅरिझमने राज्यघटनेत ३७० कलम ठेवले. काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवले. या सेक्युलॅरिझमने ‘हिंदू दहशतवाद’ हा नवीन शब्दप्रयोग शोधून काढला. कुणी त्याला ‘भगवा दहशतवाद’ म्हणू लागले. समाजवाद असो किंवा सेक्युलरवाद असो, याने आपले काही कल्याण झाले नाही.आजचा विषय आहे, देशवादाचा. त्याला दुसरा शब्द आहे ‘राष्ट्रवाद’ आणि त्याहून सोपा शब्द आहे, ‘भारतमाता की जय.’ जागतिक परिस्थितीचा विचार केला तर आज आपल्याला धार्मिक विभाजन, जाती विभाजन, भाषिक विभाजन न परवडणारे आहे. या विभाजनांमुळे आपण दुर्बळ होतो. दुर्बळ माणूस जसा आजाराला बळी पडतो, तसा दुर्बळ देश जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाही. आपल्याला सबळ होण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यासाठी ज्या पक्षाचा पहिला विचार आपल्या देशाचा असतो, दुसरा विचार स्वपक्षाचा असतो, आणि तिसरा विचार स्वतःविषयी असतो, अशा पक्षाच्या मागे उभे राहिले पाहिजे. देशाचा विकास, आणि रोजगारांची उपलब्धता ही केवळ सरकारी धोरणातून निर्माण करता येत नाही. त्यासाठी सामान्य माणसालादेखील विकासाचा ध्यास लागला पाहिजे. अमेरिकेचा प्रचंड विकास गेल्या दोन शतकांत झाला. तो केवळ सरकारी धोरणांमुळे झालेला नाही. अमेरिकेतील माणसाने तंत्रज्ञानाच्या विकासाचा ध्यास घेतला. वेगवेगळे शोध लावले. वेगवेगळी उपकरणे तयार केली आणि प्रचंड आर्थिक विकास केला. सामान्य माणसाने ठरविले की, त्याला गरिबीत राहायचे नाही. सन्मानाने जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करायची. सामान्य अमेरिकन माणसाने हे करून दाखविले. हीच गोष्ट जर्मनी, जपान, फ्रान्स, इंग्लंड या देशांना लागू होते. याला देशभाव असेही म्हणतात.आज आपल्याला सर्वाधिक गरज या देशभावाची आहे. यासाठी हा भाव जगणारे, राजकारणात त्याप्रमाणे व्यवहार करणारे, जनतेला आपल्यापेक्षा मोठे मानणारे, मी राज्यकर्ता नसून मी जनसेवक आहे, ही भावना मनात ठेवणारे लोकच निवडून आले पाहिजेत आणि त्यांचे शासन निर्माण झाले पाहिजे. समाजात अनेकवेळा असे होते की, चांगला विचार करणारे लोक खूप असतात, ते फक्त विचार करत बसतात. वाईट विचार करणारे लोक कमी असतात, पण ते कृतिशील असतात. या निवडणुकीत विचार करणार्‍यांनी कृतिशील झाले पाहिजे आणि नैतिक जबाबदारी समजून स्वतः मतदान केले पाहिजे, अन्यांना करायला लावले पाहिजे.