कोयनेच्या खोऱ्यातून सापाच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019   
Total Views |


 सापाचे नामकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या नावे


मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटामधील कोयनेच्या खोऱ्यामधून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि उभयसृपशास्त्रज्ञ तेजस ठाकरे यांच्या नावे 'बोईगा ठाकरेइ' असे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम घाटामधून १२५ वर्षांनंतर 'कॅट स्नेक' जातीच्या सापामधील नव्या प्रजातीचा उलगडा करण्यात महाराष्ट्रातील उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

'द रेप्टाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर असल्याचे नुकतेच समोर आले आहे. भारतात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ असल्याचा अंदाज आहे. यामध्ये गेल्या दोन महिन्यात कासवाची एक आणि पालीच्या आठ प्रजातींची भर पडली आहे. आता या संख्येत सापाच्या नव्या प्रजातीचा समावेश झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 'कोयना वन्यजीव अभयारण्या'च्या परिसरामधून सापाच्या 'कॅट स्नेक' जातीमधील नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ही नवी प्रजात कॅट स्नेकच्या 'बोईगा' या पोटजातीमधील असून १८९४ मध्ये या पोटजातीमधील शेवटच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला होता. त्यामुळे तब्बल सव्वाशे वर्षांनी भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातील उभयसृपशास्त्रज्ञांनी 'बोईगा' पोटजातीमधील ही नवी प्रजात जगासमोर आणली आहे. हे संशोधनकार्य ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी, स्वप्नील पवार, अशोक कॅप्टन आणि डाॅ. व्ही दीपक यांनी पार पाडले. गुरुवारी प्रकाशित झालेल्या 'जर्नल आॅफ बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये या संशोधनाचे वृत्त प्रकाशित झाले.

 

 
 
 

उभयसृपशास्त्रासारख्या दुर्लक्षित क्षेत्रामध्ये तरुण संशोधक तेजस ठाकरे याने दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे नाव सापाच्या नव्या प्रजातीला दिल्याची माहिती डाॅ. वरद गिरी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. यापूर्वी ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्याच्या काही नव्या प्रजाती शोधल्या असून पालीच्या एका नव्या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. २०१५ साली कोयनेच्या खोऱ्यात 'बोईगा ठाकरेइ' ही सापाची नवी प्रजात आढळून आल्याची माहिती संशोधक स्वप्नील पवार यांनी दिली. गेल्या चार वर्षांपासून या नव्या प्रजातीच्या निश्चितीबाबत काम सुरू होते. त्यासाठी गुणसूत्र आणि आकारशास्त्राच्या आधारे तिची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

'बोईगा ठाकरेइ'ची वैशिष्ट्ये

'बोईगा ठाकरेइ' ही सापाची नवी प्रजात झाडांवर अधिवास करते. या सापाचा वावर बहुतांश करून रात्रीच्या वेळी आढळतो. हा साप बिनविषारी असून तो साधारण तीन फुटांपर्यंत वाढतो. बेडकाची अंडी त्याचे प्रमुख खाद्य आहे. मात्र, 'कॅट स्नेक' जातीमधील कोणतीही प्रजात बेडकांच्या अंड्यावर आपले उदरभरण करत नसल्याने पश्चिम घाटामधून प्रथमच बेडकाची अंडी खाणाऱ्या 'कॅट स्नेक'चा शोध लावण्यात आला आहे. शिवाय हा बेडूक केवळ झाडांवर राहणाऱ्या बेडकांचीच शिकार करत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. तसेच 'बोईगा ठाकरेइ' हा साप अजून तरी केवळ कोयनेच्या खोऱ्यामध्येच आढळून आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@