पीएमसी बॅंक प्रकरण : ग्राहकांना आता १० हजार काढता येणार

    दिनांक  26-Sep-2019 17:53:33


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बॅंकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासा दिला आहे. नव्या निर्देशांनुसार, खातेधारकांना आता १० हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. या सवलतीमुळे ६० टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील पूर्ण रक्कम काढून घेता येणार आहे.

 

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, खातेधारकांना आता दहा हजारापर्यंतची रोकड काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा हजार रुपयांपर्यंतच होती. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. मात्र, ग्राहकांना झालेला मनस्ताप पाहता, रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. बचत आणि चालु अशा दोन्ही प्रकारातील खात्यांसाठी हीच मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, आता बॅंकेतून नव्याने कर्ज मंजूर केली जाणार नाहीत.

 

दरम्यान, मंगळवारी सकाळी बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर संदेश पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यासह बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या सहा महिन्यात त्यावर उपाय योजण्यात येतील असेही आश्वासन बँकेचे एम.डी. जॉय थॉमस यांनी दिले आहे.