रॉबर्ट वाड्रांचेही दिवस भरले?

    26-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली
: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा येत्या काही दिवसांत अडचणीत येण्याची शक्यता आहे. लंडनमधील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात चौकशीत सहकार्य करत नसल्याने सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी केली. ईडीच्या या मागणीमुळे रॉबर्ट वाड्रा अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.


लंडनमध्ये १२ ब्रायनस्टन स्क्वेअरस्थित १७ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदीमध्ये पैशांची अफरातफर
(मनी लाँड्रिंग) केल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. याप्रकरणी दिल्लीस्थित कनिष्ठ न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी वाड्रा यांना अंतरिम जामीन दिला होता. या निर्णयाला सक्तवसुली संचलनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी गुरुवारी सुनावणीदरम्यान ईडीच्या वकिलांनी “रॉबर्ट वाड्रा यांना कोठडी देण्यात यावी,” अशी मागणी केली. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, “वाड्रा यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक देवाणघेवाणीत ज्या बाबी समोर येत आहेत, त्यांच्याशी वाड्रा यांचे कथित संबंध आहेत. ते मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला सहकार्य करत नाहीत.”


यानंतर वाड्राच्या वकिलांनी ईडीने केलेल्या दाव्याचे खंडन करताना
, वाड्रा यांनी आत्तापर्यंत नेहमी चौकशीसाठी सहकार्य केल्याचा दावा केला. “तपास यंत्रणांनी जेव्हा कधी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावले आहे, त्या-त्या वेळी ते हजर झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी चौकशीला संपूर्ण सहकार्य केलेले आहे,” अशी बाजू त्यांच्या वकिलांनी न्यायालयापुढे मांडली. अखेरीस दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने ५सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.