टॉलिवूडने विनोद सम्राट गमावला...सिनेक्षेत्रातून हळहळ

25 Sep 2019 17:38:38


प्रसिद्ध टॉलिवूड विनोदसम्राट वेणू माधव यांचे आज मूत्रपिंड आणि यकृत संबंधित विकारामुळे निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. गेल्या २ आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यानंतर आज दुपारी १२:२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलगू चित्रपट सृष्टीतील एका विनोद सम्राटाला आज गमावल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाच्या दुःखद वार्तेमुळे तेलगू चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेणू माधव यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्यांनी आत्तापर्यंत २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सशक्त अभिनयाचा अविष्कार प्रेक्षकांना दाखवला. १९९६ साली 'संप्रदायाम' या चित्रपटामधून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९९७ साली आलेल्या 'मास्टर' या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला विशेष नावलौकिक मिळाला आणि प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी एक छाप सोडली. हंगामा, भूकैलास आणि प्रेमाभिषेकम या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. डॉ. परमानंदैया स्टुडन्ट या चित्रपटात त्यांनी अखेरचे काम केले. आज त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीतील अनेकांनी दुःख आणि सहानुभूती व्यक्त केली आहे.

Powered By Sangraha 9.0