भारत आणि स्वीडन नव्या गटाचे नेतृत्व करणार: केंद्रीय पर्यावरण मंत्री

24 Sep 2019 15:02:17


 

जगभरातल्या सर्वाधिक हरित वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना कमी कार्बन अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रयत्नांना मार्गदर्शन आणि मदत करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र हवामान कृती परिषदेने काल एक नवा उपक्रम सुरु केला. या नुसार या प्रयत्नांना गती देण्यासाठी नव्या नेतृत्व गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाचे नेतृत्व भारत आणि स्वीडन संयुक्तरित्या करणार असून त्यात या दोघांशिवाय इतर नऊ देशांचा समावेश आहे. त्याशिवाय विविध कंपन्यांचाही या गटात समावेश करण्यात आला आहे.

जागतिक वित्तीय मंच, ऊर्जा रुपांतरण आयोग, संशोधन अभियान, स्टॉकहोम पर्यावरण संस्था आणि युरोपीय हवामान बदल संस्था अशा जागतिक दर्जाच्या संस्थांचा या गटाला सक्रीय पाठिंबा असेल. या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत,
सार्वजनिक खाजगी भागीदारीतून अवजड उद्योग आणि वाहन कंपन्या पॅरिस करारानुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतील. कार्बन उत्सर्जन कमी करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून परिस्थिती आणि क्षमतेनुसार ही जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार हा समूह गट स्थापन करण्यात आला आहे. या परिषदेत गेल्या दोन दिवसात महत्वाचे निर्णय घेण्यात आले अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे अवजड उद्योगांनी स्वत:च कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्णय घेणे हे स्वागतार्ह पाऊल आहे असे जावडेकर म्हणाले.


Powered By Sangraha 9.0