पसायदान जगताना...

    दिनांक  23-Sep-2019 22:15:23   'आता विश्वात्मके' म्हणताना जगभरातील वंचित अत्यंजांचे कल्याण पाहणारे आणि चिंतणारे डॉ. भरत केळकर. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील अशा या एका सर्वमान्य आदरणीय व्यक्तिमत्त्वाविषयी...

 

''जगभरात माणसाच्या जगण्याच्या पद्धती आणि सवयी वेगळ्या असतात, पण माणूस माणूसच असतो आणि माणसामध्ये चांगुलपणा असतोच असतो. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा," असे रामकृष्ण केळकरांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉ. भरत यांना सांगितले. या संस्कारांचा वारसा जपणारे डॉ. भरत केळकर हे 'वनवासी कल्याण आश्रमा'चे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. पंढरपूरला वारी जाते तशीच त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचीही वारी असते. जवळ जवळ पाच-सहा लाख वारकरी यात सहभागी होतात. या वारीत वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेत गेली २० वर्षे 'निर्मल वारी' ही संकल्पना यशस्वी करणारे डॉ. भरत केळकर. वनवासी क्षेत्रात आरोग्य रक्षणासाठी काम करणार्‍या शेकडो आरोग्य रक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलेले. नुकतीच डॉ. भरत यांची नाशिक शिक्षण प्रसारक मंडळावर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.

 

मूळ जमखिंडी विजापूरचे केळकर कुटुंब. पण, रामकृष्ण केळकर यांची 'स्काऊट कमिशनर' म्हणून नियुक्ती झाली आणि ते नाशिकमध्ये आले. केळकरांच्या घरी त्यावेळी रामकृष्ण यांचे चार भाऊ, एक बहीण असे संयुक्त कुटुंब. या सगळ्यांना रामकृष्ण आणि त्यांची पत्नी शांताबाई यांनी अपत्यासारखे जपले. इतकेच नव्हे, तर केळकर कुटुंबाकडे नेहमी एखादा गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी असे.याच काळात नाशिकचे रा. स्व. संघाचे ज्येष्ठ नाव असलेले राजाभाऊ मोगल यांनी लहानग्या भरत यांना विचारले, "चल खेळायला जाऊ." त्यांनी छोट्या भरतला कडेवर उचलले आणि गोदाकाठेवरच्या समर्थ सायंशाखेमध्ये घेऊन गेले. तो रा.स्व.संघाशी डॉ. भरत केळकरांचा झालेला पहिला संपर्क म्हणावा लागेल. त्याकाळी गोळवलकर गुरुजी गोळे कॉलनीत एक-दोनदा येऊन गेले होते. त्यावेळी बाल स्वयंसेवक म्हणून भरत गुरुजींना भेटले होते. गुरुजींचे वागणे-बोलणे भरत यांच्या मनावर आजही ठसले आहे. भरत म्हणतात, "आम्ही लहानअसल्यामुळे त्यांना नमस्कार केला. त्यांनीही नमस्कार केला. मात्र, त्यांचे इतरांशी सलोख्याने वागणे, समजून घेणे समजत होते."

 

भरत यांचे सांगोल्याला राहणारे काका व्यंकटेश हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी 'रेडक्रॉस'मध्ये काम केलेले. त्यांचा प्रभाव की काय, पण भरत यांनी लहानपणापासूनच ठरवले की, आपण डॉक्टर व्हायचे, सर्जन व्हायचे. इंटरला असताना कामानिमित्त रामकृष्ण यांची बदली गोव्याला झाली. नुकतेच वयात आलेल्या भरत यांच्यासाठी नाशिक ते गोवा हा बदल तसा महत्त्वाचाच ठरला. दररोज संध्याकाळी देवासमोर 'शुभं करोति कल्याणम्' प्रार्थना म्हणणार्‍या भरत यांना गोव्याचे जीवन वेगळे वाटले. पण, यावेळीही आई-वडिलांनी इतकेच सांगितले की, 'माणसं इथून-तिथून एकच असतात. ती चांगलीच असतात. फक्त सवयी वेगळ्या असतात. आपण माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.' पुढे एमबीबीएस आणि एमएस शिक्षणासाठी भरत नऊ वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात होते.

 

मुंबईची धकाधकीची, पण कर्तव्यानुसार अहोरात्र कष्ट करणारी संस्कृती भरत केळकर यांना प्रचंड भावली. एमएस शिकत असतानाच त्यांनी ठरवले की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिथे वैद्यकीय सुविधेची वानवा आहे, गरज आहे तिथे जाऊन रुग्णालय सुरू करायचे. त्यादृष्टीने त्यांनी कोकणातील दुर्गम खेड्यात जायचेही ठरवले. मात्र, त्याचवेळी नाशिकमध्ये एक मोठा अपघात झाला. त्यानुसार एसटी महामंडळाने केईएमकडे डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यानुसार अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी ते नाशिकला गेले. तिथे अपघातग्रस्तांवर उपचार करत असताना भरत यांना नव्याने नाशिकचे आरोग्यजीवन कळले. भरत यांना वाटले की, आपण नाशिकमध्येच आरोग्य क्षेत्रात काम करावे. इथे रुग्णालयामध्ये काम करताना अभाविपचे कार्यकर्ते त्यांना नियमित भेटायचे. पुढे भरत यांना वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जव्हार येथे एका आरोग्य शिबिरामध्ये जाण्याचा योग आला. वनवासी बांधवांचे जगणे पाहून त्यांचे मन व्याकुळ झाले. डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. संजय कुलकर्णी यांच्यासोबत काम करताना वनवासी क्षेत्रातील अनेक आव्हाने डॉ. भरत केळकर यांनी सहजगत्या पेलली. डॉ. भरत सांगतात, "वनवासी कल्याण आश्रमाची प्रार्थना म्हणजे ज्ञानेश्वरांचे पसायदान आहे. त्या पसायदानामधील अतिशय भावणारी ओळ म्हणजे-

जे खळांची व्यकंटी सांडो,

तया सत्कर्मे रती वाढो

भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे

मी आणि माझी पत्नी मृणाल आम्ही विचार केला की, 'आता विश्वात्मके' प्रार्थना म्हणतो तशी ती जगलीही पाहिजे. देश आणि देशाबाहेरच्याही अत्यंज व्यक्तीपर्यंत आपली सेवा पोहोचायला हवी. वनवासी कल्याण आश्रमाचेही हेच ध्येय आहे." त्यानुसार डॉ. भरत केळकर यांनी 'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून सीरिया, येमेन आणि इराकच्या मोसूलमध्येही कर्तव्य बजावले. तेथील गरजू रुग्णांवर त्यांनी सेवाभावाने उपचार केले. तिथे 'इसिस'ने थैमान घातलेले. डॉ. भरत सांगतात की, "तेथील रुग्णांना जेव्हा कळले की, मी भारतातून आलो आहे, त्यावेळी ते 'नमस्ते' करत. भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. माझ्यासारख्या रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांसाठी यापेक्षा मोठे असे काय हवे?" अशा धोकादायक ठिकाणी सेवा करण्याचे बळ कुठून आले, विचारताच डॉ. भरत म्हणतात, 'चलो जलाये दीप जहाँ' या संघ विचार प्रेरणेने बळ आलेच. तसेच या ठिकाणी जाताना माझी ८५ वर्षांची आई म्हणाली, "चांगल्या कामासाठी जायचे आहे जा, माणसं सगळी सारखीच." जातपात धर्म आणि असंख्य चौकटी भेदून केवळ माणूसपणाचे बंध जपणारे असे हे डॉ. भरत केळकर...