१४ व्या मराठी चित्रपट रसास्वाद शिबिराला अभिनेत्री तनुजा यांची उपस्थिती

23 Sep 2019 14:49:05


पुण्यातल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुरु असलेल्या १४ व्या चित्रपट रसास्वाद प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा उपस्थित राहणार आहेत. उद्या संध्याकाळी संग्रहालयाच्या सभागृहात हा समारोप होणार आहे.

यावेळी तनुजा यांच्याकडून त्यांच्या खाजगी संग्रहातली काही जुनी छायाचित्रं या संग्रहालयाला भेट दिली जातील. तनुजा यांच्या चित्रपट कारकिर्दी दरम्यान काढलेली ही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. विशेषत: जुन्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्री आणि तनुजा तसेच नुतन यांच्या आई शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केलेल्या छबिली’ (१९६०) या चित्रपटाचे मूळ पोस्टरही तनुजा भेट देणार आहेत. नुतन आणि तनुजा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

एनएफएआयमध्ये १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी हे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना तनुजा यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान केली जातील. तनुजा यांच्या कन्या आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी देखील यावेळी उपस्थित असतील.

२३ सप्टेंबर हा तनुजा यांचा जन्मदिवस. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पितृऋणया मराठी सिनेमाचा विशेष शो या समारंभात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीश भारद्वाज देखील यावेळी उपस्थित राहतील. पितृऋणया चित्रपटाचा शो संध्याकाळी साडे चार वाजता सुरु होणार असून सर्वांसाठी खुला आहे.

Powered By Sangraha 9.0