महाराष्ट्राच्या 'टाचणी'चे केरळात दर्शन

    दिनांक  22-Sep-2019 17:37:43   

 

 'सिटीझन सायन्स' मोहिमेचे फलित


मुंबई (अक्षय मांडवकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मे महिन्यात नव्याने शोधण्यात आलेली 'टाचणी'ची 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' ही प्रजात आता केरळ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आढळून आली आहे. याशिवाय रत्नागिरी आणि गोव्यातील काही भागातही या 'टाचणी'ला छायाचित्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सापडलेली 'टाचणी'ची ही नवी प्रजात इतर राज्यामध्येही आढळत असल्याचे 'सिटीझन सायन्स' या मोहिमेच्या माध्यमातून उघड झाले आहे.

 

 
 
 

चतुरांचा एक प्रकार मात्र 'टाचणी' या स्वतंत्र गटात मोडणाऱ्या नव्या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मे महिन्यात शोध लावण्यात आला होता. देवगड तालुक्यामधील विमलेश्वर गावातून या प्रजातीचा शोध लावण्यात डाॅ. दत्तप्रसाद सावंत आणि शंतनू जोशी यांना यश मिळाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्याने तिचे नामकरण 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' असे करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ही नवी प्रजात ज्या 'सेरीग्रिआॅॅन' या पोटजातीत मोडते. त्यामधील भारतात आढळणाऱ्या १० प्रजातींचा शोध ब्रिटिश संशोधकांनी लावला होता. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनी या पोटजातीमधील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात भारतीय त्यातही महाराष्ट्रातील संशोधकांना यश मिळाले आहे. आता 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' ही टाचणीची नवी प्रजात रत्नागिरी जिल्ह्यासह केरळ व गोवा या राज्यांमध्ये आढळून आली आहे. निसर्गप्रेमी नागरिकांच्या माध्यमातून समाज माध्यमांवर सुरू असलेल्या 'सिटीझन सायन्स' या मोहिमेद्वारे ही माहिती समोर आली आहे.

 

 
 
 

केरळमधील कण्णूर जिल्ह्यातील वरदूर, चवनप्पुषा व पेरवूर या भागात 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' आढळून आल्याची माहिती संशोधक डाॅ. दत्तप्रसाद सावंत यांनी दिली. तसेच राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे निसर्ग छायाचित्रकार संदीप रानडे आणि उत्तर गोव्यातील 'नेचर्स नेस्ट रिसाॅर्ट' येथे संशोधक शौनक पाल यांनी या नव्या 'टाचणी'ला छायाचित्रीत केल्याचे सावंत यांनी सांगितले. केरळमध्ये 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' आढळून आल्यावर तेथील संशोधक विनयन नायर यांनी या प्रजातीच्या नर व मादीची छायाचित्रे फेसबुकवरील 'ड्रॅगनफ्लाईज ऑफ केरळ' या ग्रुपवर आणि 'ओडोनेटस ऑफ इंडिया' या संकेतस्थळावर टाकली. त्यामुळे केरळमध्येदेखील ही प्रजात आढळून आल्याचे उघड झाले. अशा पद्धतीने सामान्य लोकांनी विविध वन्यजीव प्रजातींची छायाचित्रे, निरीक्षणे, नोंदी त्या विषयातील तज्ज्ञांच्या पुनरावलोकनानंतर समाज माध्यामांवर टाकून त्याविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या मोहिमेला 'सिटीझन सायन्स' म्हटले जाते.


'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' विषयी

गोड्या पाण्यात आढळणारी प्रजात. गोड्या पाण्याचा स्रोत प्रदूषित झाल्यास ही 'टाचणी' त्या ठिकाणी अधिवास करत नाही. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिसून येते. यामधील नर हा हळदीसारखा पिवळसर रंगाचा साधारण ३.९ सेंमी आकाराचा असतो. तर मादी त्यापेक्षा किंचित लहान ३.७ सेंमीची असून हिरवट पिवळ्या रंगाची असते. ही 'टाचणी' अंडी, अळी, कोश आणि कीटक अशा अवस्थेमधून विकसित होते. डासांच्या अळ्या, डास, छोटे कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.