‘भारतीय वायुसेनेचा नवा सारथी’

22 Sep 2019 20:22:38



लहानपणापासूनच आकाशात उडणारी विमाने पाहून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्‍या आणि भारतीय हवाई संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या नव्या वायुसेनाप्रमुख राकेशसिंह भदोरिया यांच्याविषयी
...


जैतापूर ब्लॉक
’मधील एक छोटेसे गाव ’कोरथ’ देशसेवेसाठी लढणार्‍या ‘नायकां’साठी ओळखले जाते. येथील बरीच कुटुंबे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. लढाई चीनशी असो की पाकिस्तानशी, येथील नायकांनी लढाईत शत्रूंना चारी मुंड्या चित केले. २० वर्षांपूर्वी कारगिलच्या युद्धात याच गावात राहणारे लाल लायकसिंह भदोरिया हुतात्मा झाले. गावात लायकसिंह भदोरिया यांचे स्मारकदेखील आहे. गावातील तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. हाच देशसेवेचा वारसा पुढे नेणारे गावातील तरुण आज मोठ्या संख्येने सैन्यात दाखल होण्याची तयारी करत आहेत. याच गावात राहून अवकाशात उडणार्‍या विमानांकडे पाहत बालपण गेलेली व्यक्ती म्हणजे एअर चीफ मार्शल राकेशकुमारसिंह भदोरिया. नुकतीच त्यांची भारतीय वायुसेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि देशातील विमानांच्या पंखात बळ आणणार्‍या गावच्या सुपुत्राकडे पाहून गावकर्‍यांचा उर अभिमानाने भरून आला.


भदोरिया यांचे वडील सूरजपालसिंह हे भारतीय वायुसेनेमध्ये मास्टर वॉरंट अधिकारी होते
. त्यामुळे राकेशसिंह यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. याचदरम्यान घरात देशभक्तीचे वातावरण असल्याकारणाने त्यांनाही लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची जिद्द होती. लहानपणी भदोरिया आकाशात उडणार्‍या विमानांकडे पाहून म्हणत की, आपणही एक दिवस विमान उडवणार आणि सैन्यात भरती होणार. काका संतोषसिंह (वायुसेना), अरविंदसिंह (लष्कर-सुभेदार) आणि देशपतीसिंह (रेल्वे) नोकरीला होते. जेव्हा जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र असत तेव्हा घरात फक्त देशभक्तीची चर्चा असायची. परंतु, त्यांचे खरे लष्करी व्यक्तिमत्त्व घडले ते पुण्यातील ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’मध्ये (एनडीए). तेथून त्यांनी ’संरक्षण’ विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. पुण्यातील शिक्षण पूर्ण करून त्यांनी बांगलादेशच्या ’कमांड अ‍ॅण्ड स्टाफ’ महाविद्यालयामधून संरक्षण क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतले. जून १९८० मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. प्रभावी शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्यांना ’तलवार ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या एकूणच कारकिर्दीत भदोरियांना ४ हजार २५० तासांपेक्षा जास्त विमान चालविण्याचा अनुभव आहे. ‘मिग-२१’ सह २६ पेक्षा जास्त प्रकारची लढाऊ आणि वाहतूक विमानांची उड्डाणे त्यांनी केली आहेत. फ्रेंच बनावटीच्या ‘राफेल’या विमानाचे सर्वात पहिले उड्डाण करण्याचा मान त्यांना मिळाला.



स्क्वॉड्रन लीडर
(सेवानिवृत्त) ए. के. सिंह म्हणतात, “आर. के. एस. भदोरिया हे भारतीय वायुसेनेतील एक शूर पायलट आहेत. त्यांनी अनेक आघाड्यांवर भारताचा सन्मान वाढविला असून ते भारतीय सैन्याचा अभिमान आहे. आग्र्याचा रहिवासी असल्याच्या नात्याने मला भदोरिया हे वायुसेना प्रमुख झाल्याचा अभिमान वाटतो.” आतापर्यंतच्या कारकिर्दीत राकेशसिंह यांना अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. एअर मार्शल भदोरिया यांना २०१८ मध्ये ’परमविशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम)’, जानेवारी २०१३ मध्ये ’अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम)’, जानेवारी २००२ मध्ये ’एअर सर्व्हिस मेडल (व्हीएम)’ आणि ’एडीसी’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याआधी त्यांनी ’जग्वार स्क्वॉड्रन कमांड’, ’प्रीमियर एअरफोर्स स्टेशन’, ’फाईट टेस्ट स्क्वॉड्रन’चे कमांडिंग ऑफिसर यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या हाताळल्या आहेत. एअर मार्शल राकेशसिंह भदोरिया हे अधिकारी प्रशिक्षण कमांडचेकमांडिंग इन चीफ’ही होते. यावर्षीच १ मे रोजी आर. के. एस. भदोरिया यांनी भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. राफेलच्या खरेदीसाठी वाटाघाटी करण्यासाठी भारतातून एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले होते. भदोरिया या भारतीय वाटाघाटी संघाचे ‘आयएनटी’चे अध्यक्ष होते. भदोरिया यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.



नुकतेच भारताला फ्रान्सकडून पहिले राफेल विमान मिळाले
. शत्रूला धडकी भरविणार्‍या ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या भारतीय ताफ्यात सहभागी होण्याने भारतीय वायुदल आणखी मजबूत झाले. पहिल्या राफेल विमानाचा टेल नंबर ‘आरबी -०१’ आहे. भदोरिया यांच्या नावावरून पहिल्या राफेल विमानाला ‘आरबी-०१’ हा क्रमांक देण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ या लढाऊ विमानातून भरारी घेतल्याची छायाचित्रे आली. ‘तेजस’ हे एक हलके लढाऊ विमान (एलसीए) आहे. ते भारतातच तयार करण्यात आले गेले आहे. यामागे भदोरियांची मोठी भूमिका असल्याचे म्हटले जाते. ‘एलसीए’च्या चाचणी उड्डाणांशी संबंधित कार्य आणि त्याचे इन्स्ट्रुन्मेंटेशनशी संबंधित सर्व कामराष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात’ (एनएफटीसी) केले गेले. भदोरिया हे त्याचे मुख्य चाचणी वैमानिक होते. ते ‘एलसीए’ प्रकल्पातील ‘एनएफटीसी’चे प्रकल्प संचालकदेखील होते. ते ‘तेजस’च्या सुरुवातीच्या कसोटी उड्डाणांचाही एक महत्त्वपूर्ण भाग होते. अशाप्रकारे त्यांनी अनुभवाच्या आधारे भारतीय वायुसेनेला बळ देण्यात महत्त्वपूर्ण कार्य बजावले. दरम्यान, भदोरिया यांच्या पत्नीचे नाव आशा भदोरिया असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. भदोरिया यांची मुलगी सोनाली हीदेखील वैमानिक आहे. आता राकेशसिंह भदोरिया यांच्या वायुसेना प्रमुख होण्याने भारतीय वायुसेनेच्या पंखात आणखी बळ आले हे नक्की. अशा या असामान्य व्यक्तिमत्त्व असणार्‍या आणि भारतीय संरक्षण क्षेत्रात जीवाची बाजी लावणार्‍या लढवय्याचा देशाला अभिमान आहे!

- गायत्री श्रीगोंदेकर 
Powered By Sangraha 9.0