हाऊडी आणि भारत

    दिनांक  22-Sep-2019 17:01:27   


 

भारताने कलम ३७० रद्द करणे, त्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकने कोल्हेकुई करणे, विनाकारण काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य करत आणि नंतर त्यावर घूमजाव करत महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिछेमूड करणे असे अनेक कंगोरे मोदी यांच्या या दौर्‍यास लाभले आहेत. त्यामुळे मोदी यांच्या या दौर्‍याची चर्चा जागतिक स्तरावर होणे स्वाभाविक आहे.


'अ' 'ब' 'क' नावाचे तीन इसम असतात
. त्यातील ‘अ’ हा पूर्वीपासून सधन, समृद्ध या वर्गवारीत बसणारा असतो तर, ‘ब’ आणि ‘क’ यांची सुरुवातीची स्थिती सारखी असते. मात्र, ‘अ’चा ‘ब’वर जास्त भरवसा असल्याने ‘अ’चे ‘ब’बद्दल कायमच ममत्व असल्याचे दिसून येत असे. दरम्यान, ‘क’ हा कष्ट करत आणि समोर उद्दिष्ट ठरवत आपले काम करत असतो. या प्रवासात ‘क’ हा ‘अ’शी संबंध ठेऊन असतो. पण ‘ब’सारखा ‘क’ हा ‘अ’वर पूर्ण अवलंबून राहण्याची चूक करत नाही. कालपरत्वे स्थिती बदलते आणि ‘क’ समृद्ध होत असल्याचे ‘अ’ ला जाणवते आणि ‘ब’ची बेगडी वृत्तीदेखील ‘अ’ला समजू लागते आणि मग ‘ब’ला ‘अ’ हळूहळू दूर करू लागतो. त्यानंतर ‘अ’ आणि ‘क’ची घनिष्ठता वाढू लागते.

 

या कथेतील अ, ब, क म्हणजे अनुक्रमे अमेरिका, पाकिस्तान आणि भारत होय. या कथेला साजेसाच प्रवास आजवर या तिन्ही राष्ट्रांच्या संबंधांच्या अनुषंगाने झाल्याचे आपल्याला दिसून येते. जगात भारताचे वधारणारे स्थान आणि पाकिस्तानचे घटणारे स्थान यांच्या केंद्रस्थानी अमेरिकेशी असणारे भारत आणि पाकचे संबंध कायमच राहिल्याचे आजवर दिसून आले आहे.

 

नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले. मोदी आजवर अनेकदा अमेरिकेला गेले आहेत. मात्र, तरीदेखील मोदी यांच्या या वेळच्या दौर्‍याला मात्र विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, १) मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा पहिला अमेरिका दौरा आहे. २) यावेळी अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३) मोदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेच्या वार्षिक परिषदेला संबोधित करणार आहेत.

 

भारताने कलम ३७० रद्द करणे, त्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकने कोल्हेकुई करणे, विनाकारण काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य करत आणि नंतर त्यावर घूमजाव करत महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिछेमूड करणे असे अनेक कंगोरे मोदी यांच्या या दौर्‍यास लाभले आहेत. त्यामुळे मोदी यांच्या या दौर्‍याची चर्चा जागतिक स्तरावर होणे स्वाभाविक आहे.

 

यावेळी मोदीं अमेरिकेमधील ह्यूस्टन या शहरात सुमारे ५० हजार अनिवासी भारतीयांना संबोधित केले. विशेष म्हणजे यावेळी आजवरची परंपरा मोडीत काढत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः उपस्थित राहून मोदी यांचे विचार ऐकले. त्यामुळे वर नमूद केलेल्या कथेप्रमाणे ‘अ’चा आज ‘क’ हा जवळचा मित्र म्हणून पुढे येत आहे. यामागे ‘ब’ची रेषा कमी करण्याकडे आपला कल न ठेवता ‘क’ने आपली रेषा ‘अ’च्या तोडीची कशी होईल, या दिशेने केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणजे मोदी यांचा हा दौरा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मोदी यांच्याप्रमाणे ट्रम्प यांना दुसर्‍या टर्मची अभिलाषा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच अमेरिकेत सुमारे १७ लाख संख्येच्या आसपास असणारे भारतीय हे अमेरिकेचे नागरिक असून ते तेथील मतदार आहेत. त्यामुळे मोदी पर्यायाने भारताच्या ताकदीची जाणीव असल्याने ट्रम्प यंदा हाऊडीच्या रूपाने आजवरचा पायंडा मोडत मोदी यांच्या सभेला उपस्थित राहिले.

 

अमेरिकेत हॉटेल, माहिती-तंत्रज्ञान उद्योग यात भारतीयांचा दबदबा आहे. अमेरिकेत काही हजार डॉलर्सची दरडोई उलाढाल करण्यात भारतीयांचे मोठे योगदान आहे. हे व्यापारी असलेले ट्रम्प चांगलेच जाणून आहेत. त्यामुळेच भारताला आता कमी लेखून किंवा नाकारून चालणार नाही, याची जाणीव महासत्तेला एव्हाना झाली आहे. तसेच, भारतीय पंतप्रधानांचा हा दौरा संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे ‘हाऊ डू यु डू’ असे भारत भविष्यात जगाला विचारू शकेल, अशी स्थिती आज भारताची जागतिक पातळीवर निर्माण झाली आहे. निष्ठेने आणि राष्ट्रहित जोपासत सातत्याने कार्य केले तर, त्याची पावती कशी प्राप्त होते, हे वरील कथेतील ‘क’ ने दाखवून दिले आहे तर, दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला हे ‘ब’ वरून सिद्ध होते.