'दुतोंडी' सापावर हाफकिनमध्ये संशोधन

21 Sep 2019 21:28:47


 
दुतोंडी सापाचे रहस्य उलगडणार !

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - कल्याणमध्ये नुकत्याच दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या दुर्मीळ दुतोंडी घोणस सापाला परळच्या हाफकिन संशोधन संस्थेत दाखल करण्यात आले आहे. संशोधनाच्या उद्देशाने वन विभागाने हा साप हाफकिन संस्थेच्या हवाली केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हाफकिन संस्था प्रथमच दोन तोंडी सापावर संशोधनकार्य करणार असल्याने अशा पद्धतीने जन्मास येणाऱ्या सापांविषयी नव्या माहितीचा उलगडा यामाध्यमातून होण्याची चिन्हे आहेत.
 
 

 
 
 

भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांच्या यादीत ’रसल व्हायपर’ म्हणजेच ’घोणस’ या सापाचा समावेश होतो. कल्याणमधील रौनक सिटी परिसरात स्थानिकांना गुरुवारी घोणस सापाचे पिल्लू आढळून आले होते. प्रथमदर्शनी हे पिल्लू सर्वसामान्य नसून ते दुतोंडी असल्याचे दिसले. त्यामुळे स्थानिकांनी सर्पमित्र योगेश कांबळी व दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला. या दोन्ही सर्पमित्रांनी दुतोंडी सापाला पकडून कल्याणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांच्या ताब्यात दिले. स्थानिक पशुवैद्यकांच्या मदतीने सापाची तपासणी करुन त्याला ’वॉर’ या प्राणिप्रेमी संस्थेकडे देखरेखीकरिता ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्याची रवानगी परळच्या हाफकिन संशोधन संस्थेत करण्यात आली. सर्पदंशावर लस बनवून त्याविषयी संशोधन करणार्‍या देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये हाफकिन संशोधन संस्थेचा समावेश होतो.

 

 
 
 

मुंबई महानगर प्रदेशात घोणस हा साप सामान्यत: आढळतो. त्यामुळे ही प्रजात दुर्मीळ नाही. परंतु, दुतोंडी साप हा क्वचितच आढळून येतो. त्यामुळे दुतोंडी सापाच्या या दुर्मीळ नमुन्यावर संशोधनाच्या अनुषंगाने काम करण्यासाठी त्याला देशात सर्पसंशोधनासाठी नावलौकिक असलेल्या हाफकिन संशोधन संस्थेकडे पाठविल्याची माहिती ठाण्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. वन विभाग आणि हाफकिन या दोघांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीचे दुतोंडी साप जीवंत राहण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे वन विभागाकडून आमच्या ताब्यात आलेला दुतोंडी घोणस जीवंत ठेवण्याचे प्राथमिक आव्हान आमच्यासमोर असल्याची माहिती हाफकिन संशोधन संस्थेतील एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्याने दिली. तसेच हाफकिनच्या माध्यमातून प्रथमच दुतोंडी सर्पावर संशोधनाकार्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 
 
 'घोणस' विषयी

या सापाच्या शरीरावर साखळीसारख्या रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतो. तो आपले विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला 'कोरडा चावा' असे म्हणतात. भारतामध्ये दरवर्षी सर्पदंशाने होणाऱ्या जीविताहानीमध्ये घोणस सापच्या दंशाचा वाटा मोठा असल्याची माहिती उभयसृपशास्त्रज्ञ केदार भिडे यांनी दिली. इतर सापांच्या तुलनेत या सापाच्या विषामुळे मानवी अवयवांचा नाश मोठ्या प्रमाणत होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा साप पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर शरीराबाहेर काढतो.

 
Powered By Sangraha 9.0