प्राचीन विमानविद्या अभ्यासक आणि संशोधक : पंडित तळपदे

    दिनांक  21-Sep-2019 20:52:00

दि
. १७ सप्टेंबर रोजी प्राचीन विमानविद्या अभ्यासक आणि संशोधक शिवकर बापुजी तळपदे यांची १०२ वी पुण्यतिथी होती. तळपदेंचे योगदान विमानविद्याशास्त्राबरोबरच वैदिक आणि दार्शनिक साहित्यातही आहे. त्यांच्या या कार्याची माहिती देणारा हा लेख...गे माय भू तुझे

मी फेडीन पांग सारे,

आणिन आरतीला

हे चंद्रसूर्यतारे।

कवी सुरेश भट यांच्या या पंक्तींची आठवण होण्याचे कारण आहे, पंडित शिवकर बापुजी तळपदे यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या १०२व्या पुण्यतिथीचे. वैदिक विमानविद्येचे संशोधक, इंग्रजांच्या शासनकालात प्राचीन भारतीय विमानविद्येचे पुनरुद्धारक आणि त्या ज्ञानाला समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र झटणारे अभ्यासक म्हणून आज जगाला पंडित तळपदे ज्ञात आहेत. परंतु, त्यांच्या या कार्याची अमूल्यता आणि गौरव त्यांच्या अथक अभ्यास आणि परिश्रमाला जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून हा एक छोटासा प्रयत्न...

 

 
बालपण आणि अध्ययनाविषयी थोडेसे...

महाराष्ट्रातील अत्यंत प्रगतिशील समुदाय पाठारे-प्रभू समाजामध्ये इ. स. १८६४ साली मुंबई येथे जन्म झालेल्या शिवकरजींच्या मनात बालपणापासूनच ध्येयासक्ती आणि राष्ट्रप्रेम यांचे बीज रूजलेले दिसते. पुढे राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या तळपदेंनी आपल्या गृहस्थाश्रमी जीवनाची बाजू सांभाळत आपली अध्ययनसाधना आजन्म चालू ठेवलेली आपल्याला दिसते. इ. स. १८८० साली त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. त्यांचे कलाशिक्षक होते पंडित चिरञ्जीलाल वर्मा. पंडित वर्मा हे कलेबरोबरच वेदविद्येचेही चांगले जाणकार होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेल्या वेदभाष्याच्या पद्धतीला अनुसरत वेदमंत्रांचा वैज्ञानिक अर्थ ते करत असत आणि वेदांमध्ये विद्यमान असलेल्या विविध विद्यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असत. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या तळपदेंच्या मनात वैदिक काल आणि तत्समयी असणारे विज्ञानविषयक दृष्टिकोन हे पूर्णांशाने बिंबले गेले आणि अधिक अध्ययनासाठी ते प्रवृत्त झाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये अध्यापनाचे कार्य करत असताना तळपदे त्यांच्या सात्त्विक स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती यामुळे सर्वांना मोहवित असत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राचार्य जॉन ग्रिफिथ हेदेखील तळपदेंच्या स्वभावामुळे प्रभावित झाले होते. म्हणूनच बीजापूरच्या सर्वेक्षणासाठी आणि अजंठा येथील गुंफांमधील चित्रांच्या अध्ययन आणि जतन कार्यासाठीच्या आपल्या मोहिमांमध्ये ग्रिफिथ हे तळपदेंना आपल्यासोबत घेऊन गेलेले दिसतातअध्यापनाचे कार्य करत असतानाच पं. चिरञ्जीलाल वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय शास्त्रांचे अध्ययन करावयास सुरुवात केली. स्वामी दयानंद सरस्वतींच्या नैकविध ग्रंथसंपदेतून विमानविद्याविषयक मूलभूत सिद्धांत त्यांनी सखोल अभ्यासले. चारही वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे, सहा वेदांगे यांचे उपवेदांसह अध्ययन त्यांनी केले. या सगळ्या काळात विमानविद्याविषयक प्रयोग करण्याचा त्यांचा संकल्प अधिकाधिक दृढ होत गेला. प्राचीन संस्कृत साहित्यातून या विद्येचा अभ्यास करत असताना त्यांनी पश्चिमेकडील देशांमध्ये विमानविद्येविषयक होणारे प्रयोगही सविस्तर अभ्यासले. या सर्वांचाच परिपाक म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून इ. स. १८९२ साली उभी राहिलेली प्रयोगशाळा होय.विमानविद्येवर संशोधन


वेदमंत्रांवर सखोल चिंतन करून त्यांचा वैज्ञानिक अर्थ स्पष्ट करत प्रायोगिक तत्त्वावर त्याची सिद्धता पडताळत अशा पद्धतीने ते आपले संशोधन कार्य पुढे नेत होते
. या पद्धतीने अहर्निश प्रयत्नशील राहत त्यांनी विमानाचे एक प्रतिमान (model) तयार केले. आपला अभ्यास आणि संशोधन सगळ्यांसमोर ठेवून अभ्यासकांच्या सूचना प्राप्त करण्याच्या हेतूने, आपल्या म्हात्रेनामक मित्रद्वयांमार्फत, त्या प्रतिमानाचे एक चित्र ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ येथील प्रदर्शनात त्यांनी ठेवले होते. त्यांची ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ या विषयावरील तीन व्याख्याने खूप गाजली. त्यांच्या विद्वत्तेचा गौरव ‘विद्याप्रकाशवारिधि’ ही उपाधी त्यांना देऊन करवीरपीठाच्या श्रीशंकराचार्यांनी केलेला दिसतो. विमानाचे प्रतिमान तयार करण्याचे महत योगदान तळपदेंनी दिले होते. परंतु, त्यांना पुढील कार्यासाठी साहाय्य हवे होते आणि त्यांना ते प्राप्त होऊ शकले नाही हे वास्तव आहे. परंतु, इ. स. १९१५ साली त्यांच्या या कार्याच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाची घटना घडली. बंगळुरू येथील प्राचीन शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचे चांगले जाणकार पंडित सुब्रायशास्त्रीनामक स्वामी शंकराचार्यांच्या परंपरेतील एक महात्मा तळपदेंच्या संपर्कात आले. त्यांनी तळपदेंना महर्षि भारद्वाजकृत ‘यन्त्रसर्वस्व,’ ‘अंशुबोधिनी,’ ‘आकाशतन्त्र’ आदी प्राचीन ऋषि-महर्षिंच्या विमानविद्या संबंधित भौतिकशास्त्रे शिकविली. त्यांच्या प्रयासानंतर पं. सुब्रायशास्त्रींबरोबर तळपदेंनी इ. स. १९१५ ते १९१७ या दरम्यान ‘मरुत्सखा’नामक विमानाचे प्रायोगिक दृष्टीने उड्डाण घडविले.साहित्यसृजन आणि कार्य

विमानविद्याविषयात संशोधन करत असताना तळपदेंच्या अध्ययनाला सखोल आणि गंभीर अशा चिंतनाची जोड मिळालेली आहे. चिंतनाला अथक अशा साधनेची जोड असलेली त्यांची परिपक्व आणि सूक्ष्ममति विविधांगी विषयांत लेखन करताना दिसते. वेदांचे पठन-पाठन आणि अध्ययन या हेतूने पं. वर्मा यांनी स्थापित केलेल्या वेद-धर्म प्रचारिणी सभेच्या स्थापनेपासूनच तळपदे तिच्याशी जोडले गेले आणि पं. वर्मांच्या मृत्युपश्चात त्यांनी या सभेची धुरा समर्थपणे वाहिली. या सभेद्वारा वेदविद्याप्रचारिणी पाठशाळा चालविली जाई आणि तिचे मंत्री म्हणून ते कार्यरत होते. शामराव कृष्ण आणि मंडळी यांनी प्रकाशित केलेल्या आर्य-धर्मपत्रिकेचे संपादक म्हणून तळपदे यांनी काम पाहिलेले दिसते. ‘ऋग्वेद-प्रथमसूक्त व त्याचा अर्थ’ या आपल्या पुस्तकात स्वामी दयानंद सरस्वतींच्या भाष्यशैलीला अनुसरत ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तातील नऊ ऋचांचे, आध्यात्मिक आणि भौतिक असे दोन अर्थ, ते अतिशय सुबोध भाषेत करतात. वर उल्लेखिलेली त्यांची दोन्ही पुस्तके ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ आणि ‘ऋग्वेद-प्रथमसूक्त व त्याचा अर्थ’ मराठी भाषेत आहेत. हिंदी भाषेत लिहिलेले त्यांचे पहिले पुस्तक म्हणजेयोगदर्शनान्तर्गत शब्दों का भूतार्थ दर्शन’ हे होय. या पुस्तकात महर्षि पतंजलींच्या योगदर्शनातील ४४५ शब्दांपैकी अनुक्रमणिकेनुसार ४१ शब्दांचे आर्ष (वैदिक) ग्रंथांच्या आधारे व्याख्या करताना ते दिसतात. मन म्हणजे काय आणि त्याची शक्ती कशी विलक्षण आहे, याविषयीचे हिंदी भाषेतील त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे ‘मन और उसका बल’ हे होय. याबरोबरच, गायत्री मंत्राचे रहस्य उलगडवून दाखविणारे त्यांचे ‘गुरुमन्त्रमहिमा’ नावाचे पुस्तक गुजराती भाषेत आहे. एका अर्थाने, संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांचा त्यांचा अभ्यास चांगला होता, हे आपल्या सहज लक्षात येते. पं. तळपदेंच्या शब्दांतच सांगायचे झाले तर “सृष्टितत्त्वाच्या ज्ञानापासून आपणाला व्यवहारामध्ये जी काही लाभदायक साधने प्राप्त करून घ्यावयाची असतात, त्यासंबंधी सर्व विचार आपल्या प्राचीन ग्रंथांत ओतप्रोत भरलेले आहेत.” आपल्या प्राचीन ग्रंथांवर श्रद्धा ठेवून त्यांचे व्यावहारिक उपयोजन स्पष्ट करणार्‍या पंडित तळपदेंचे जीवन आणि कार्य हे निश्चितच प्रेरणादायी आहे.


- बिजयप्रसाद उपाध्याय

- लीना हुन्नरगीकर

(लेखक विमानविद्या संशोधक असून श्री तळपदेंच्या ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ या पुस्तकाच्या हिंदी भाषेतील पुस्तकाचे संपादक आहेत, तर लेखिका संस्कृत भाषेच्या अभ्यासिका आहेत. पं. तळपदेंची ‘ऋग्वेद-प्रथमसूक्त व त्याचा अर्थ’ आणि ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ ही दोन्ही पुस्तके वैदिक शिल्पशोध प्रतिष्ठान पुनर्प्रकाशित करत आहे.)