धार्मिक नगरी नाशिक राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू

    दिनांक  21-Sep-2019 20:41:48   एरवी निवडणुका जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये राजकीय वातावरणात गरमागरमी आजवर दिसून येत असे. तसेच, याच काळात एखाद्या बड्या राजकीय नेत्याची सभा नाशिकमध्ये पार पडली की, या वातावरणातील राजकीय वादविवाद अगदी शिगेला पोहोचत. असे आजवर सर्वसामान्यपणे दिसणारे चित्र मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिसत नाही. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक नेते या दरम्यान नाशिकमध्ये आले. संवाद झाले, सभा झाल्या, आगामी प्रचाराची दिशा काय असणार याचाही अंदाज आला. मात्र, सगळ्याची फलनिष्पती काय, मतदारराजाचा कौल काय असणार, यांचा अंदाज या संवाद आणि सभांना मिळणार्‍या प्रतिसादावरून घेता येणे शक्य आहे.१८ आणि १९ सप्टेंबर हे दिवस भाजपसाठी खर्‍या अर्थाने मंतरलेले होते
. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली, तेव्हा आयोजित करण्यात आलेल्या रोड शोला आणि बाईक रॅलीला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. ‘जनतेत मिसळण्यासाठी थेट रस्त्यावर उतरलेला आम्ही तरी पहिलाच मुख्यमंत्री पाहिला; नाहीतर यापूर्वी कायम बुलेटप्रुफ गाडीतून बंद काचांच्या आडून हात हलविणारेच मुख्यमंत्री पाहिले,’ अशी प्रतिक्रिया नाशिकमधील तरुण, नवमतदार व्यक्त करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने राज्याचे आगामी धोरण काय असणार? काश्मीर प्रश्नावर देशवासीयांनी आता आपली काय भूमिका घेणे आवश्यक आहे? राष्ट्रीय पातळीवर आगामी काळात कोणते कार्य हाती घेण्यात येणार आहे? याची दिशा नाशिकच्या भूमीतून स्पष्ट झाली. या सभेला लोटलेला अफाट जनसागर, त्यांची उत्स्फूर्त मिळणारी प्रतिक्रिया, सभास्थळी जनमानसाच्या भावनांचा येणारा अंदाज, जाणविणारी ऊर्जा या आगामी विधानसभेचे चित्र स्पष्ट करण्यासाठी बोलके आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाशिकनगरीत आगमन झाले होते
. पवार यांच्या या दौर्‍यात त्यांनी नाशिकच्या भूमीला स्पर्श करताच बातमी बनली ती छगन भुजबळ हे त्यांच्या स्वागताला उपस्थित नसण्याची. छगन भुजबळ यांनी तत्पूर्वी आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेलाही दांडी मारत तेल गरम केले होते. आता पवारांच्या स्वागताला अनुपस्थित राहत त्यांनी आपल्या निर्णयास नवीन फोडणी दिली आहे का, अशी चर्चा गोदाकाठावर रंगल्याचे दिसून आले. यावेळी शरद पवारांच्या स्वागताला जेमतेम १०० कार्यकर्ते उपस्थित होते. पवारांनी आपल्या दौर्‍यात काँग्रेसच्या नगरसेवकांशी चर्चा केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना ‘बुस्टर डोस’ देत त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, असे असले तरी, एकीकडे जल्लोष, जोश आणि आत्मविश्वास यांचा संगम भाजपमध्ये दिसून आला, तर दुसरीकडे मरगळ झटका, उठा जागे व्हा, असा द्यावा लागणारा संदेश, निरुत्साह यांचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने नाशिकनगरीत दिसून आले.छगन भुजबळांच्या संभ्रमात टाकणार्‍या भूमिकेमुळे सैरभर झालेल्या नाशिकच्या राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निव्वळ चैतन्यच नाही
, तर अक्षरश: दमछाक होईपर्यंत उभारी देण्याची धडपड ८३ वर्ष वय असलेल्या शरद पवारांना नाशिकनगरीत करावी लागली. हे मात्र खरे की, भुजबळांच्या अनुपस्थितीत झाडून सार्‍या पदाधिकार्‍यांना पाचारण करून पवारांनी नाशिकवरील आपली पकड आजही कायम असल्याचा संदेश यावेळी भुजबळांना आपल्या कृतीतून दिला. ‘पुलोद’च्या प्रयोगात प्रतिकूल परिस्थितीत पवारांच्या पाठीशी नाशिक जिल्हा उभा राहिला होता. या प्रेमाचे रूपांतर मतात करण्याची पवारांची खेळी या दौर्‍यात लपली नाही. भाजप आणि शिवसेना यातील ‘मेगाभरती’चा मोठा फटका राष्ट्रवादी काँगे्रसला बसला आहे. पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू किंबहुना नातेवाईकही भाजप व शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे या दौर्‍यात दिसून आले. काही प्रसंगांमध्ये तर पवारांचा चिवट असा संयमही ढळल्याचे बघायला मिळाले. वयाच्या ८३व्या वर्षी हा आघात ते पेलवू शकणार नाही, असे चित्र दिसत असताना अचानक त्यांनी मुसंडी मारण्याची धडपड सुरू केल्याचे नाशिक दौर्‍यातून अधोरेखित झाले. जवळपास १५ वर्षांपासून छगन भुजबळ यांच्या शब्दावर चालणारी राष्ट्रवादीची नौका एकाएकी त्यांच्याच ‘घरवापसी’च्या चर्चेने डगमगल्यानंतर पवारांनी सावरण्यासाठी तब्बल ११ तास नाशिकमध्ये तळ ठोकला.
या सर्व धामधुमीत नाशिकमध्ये यापूर्वी सत्तेत असलेल्या मनसेचे काय
, असा प्रश्नदेखील नाशिककरांना सध्या सतावत आहे. नाशिकनगरीत राजकीय हालचालींना वेग आलेला असताना मनसेची साधी चुळबूळसुद्धा नाशिकनगरीत दिसून येत नाही हे विशेष! आपण निवडणूक लढणार आहोत काय, लढणार असल्यास आता पुढे काय करायचे, लढणार नसल्यास कोणता झेंडा हाती घ्यायचा वा बहिष्कारास्त्र काढून शांतच बसायचे. यापैकी कोणत्यातरी एका ‘राज’आदेशाची प्रतीक्षा मनसैनिकांना नाशिकनगरीत असल्याचे दिसून येते. नाशिक म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला यापूर्वी समजला जात असे. मात्र, या पक्षाने आयोजित केलेल्या मुलाखतींनादेखील अल्प प्रतिसाद यावेळी मिळाला. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकसाठी विविध घोषणा करणे, निवडणुकांव्यतिरिक्त एखाद्या मोठ्या धार्मिक सोहळ्यास हजेरी लावणे यापुरतेच नाशिकशी असणारे राजकीय नेत्यांचे नाते यावेळी वृद्धिंगत होताना दिसले. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमधून निघालेल्या राजकीय हुंकारांनी सध्या नाशिक राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू झाल्याचे दिसून येत आहे. आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाजनादेश यात्रा समारोपानिमित्त जाहीर सभा यांमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. नाशिक हे राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदूच झाले आहे.