ठेवा ध्यानी चार गोष्टी!

    दिनांक  21-Sep-2019 11:46:30ही सारी सृष्टी व त्यातील सर्व पदार्थांना उपभोगण्याचे सामर्थ्य केवळ मानवाला मिळाले आहे. ज्ञानपूर्वक त्या-त्या वस्तूंना प्राप्त करून आपली जीवनयात्रा अतिशय आनंदाने संपन्न करणे, ही मानवाचीच जबबादारी पण आहे. याकरिता ज्या काही बाबींची गरज असते, त्यात प्रामुख्याने वरील मंत्रोक्त चार तत्त्वांचा समावेश होतो. अनुक्रमे 'परिश्रम,' 'श्रद्धा,' 'दीक्षा' आणि 'यज्ञ' या तत्त्वांचे वर्णन इथे करण्यात आले आहे.


जीवन घडते ते सद्विचारांनी! ज्ञानपूर्वक कर्म केल्यानेच खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता सिद्ध होते. अगदी सहजपणे, कष्ट न करता काहीही मिळणे शक्यच नाही. श्रीमद्भगवद्गीतेत योगेश्वरांनी आपली जीवनयात्रा ही कर्म केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन केले ते याचकरिता! वेदांनीही नेहमी कर्म करीत जीवन १०० वर्षे जगण्याचा मौलिक उपदेश केला आहे. याचकरिता विविध मंत्रांच्या माध्यमाने ज्ञानयोग व कर्मयोग जगासमोर मांडला. 'चरैवेति चरैवेति' या वचनानुसार माणसाने नेहमी गतिमान राहावे. आळस व प्रमाद न करता सत्यज्ञान आणि शुभकर्म याद्वारे आपल्या समग्र जीवनाचा विकास साधावा. खालील मंत्रामध्ये जीवनाच्या सफलतेकरिता चार तत्त्वांचे विवेचन केले आहे-

 

स्वधया परिहिता श्रद्धया पर्यूढा

दीक्षया गुप्ता यज्ञे प्रतिष्ठिता:।

लोको निधनम्॥

(अथर्ववेद-१२/५/३)

 

अन्वयार्थ

 

जे सुजन (स्वधया) स्वत: कष्ट करून परिश्रमपूर्वक धनाचा स्वीकार करतात आणि (परिहिता:) आपले व साऱ्या जगाचे हित साधतात, (श्रद्धया) सत्याला धारण केल्याने, श्रद्धापूर्ण भावनेने (पर्यूढा:) चोहीकडून जे आरुढ होतात, (दीक्षया) सत्य-भाषण, व्यवहार आदींची दीक्षा घेऊन (गुप्ता:) जे सुरक्षित होतात आणि (यज्ञे) विविध पवित्र कार्यात जे (प्रतिष्ठिता:) सर्व प्रकारे स्थानापन्न (प्रतिष्ठित) होतात, अशा प्रकारचे लोक(निधनम्) मृत्यूपर्यंत, जीवनभर(लोक:) या जगात आनंदाने राहतात.

 

विवेचन

 

ही सारी सृष्टी व त्यातील सर्व पदार्थांना उपभोगण्याचे सामर्थ्य केवळ मानवाला मिळाले आहे. ज्ञानपूर्वक त्या-त्या वस्तूंना प्राप्त करून आपली जीवनयात्रा अतिशय आनंदाने संपन्न करणे, ही मानवाचीच जबबादारी पण आहे. याकरिता ज्या काही बाबींची गरज असते, त्यात प्रामुख्याने वरील मंत्रोक्त चार तत्त्वांचा समावेश होतो. अनुक्रमे 'परिश्रम,' 'श्रद्धा,' 'दीक्षा' आणि 'यज्ञ' या तत्त्वांचे वर्णन इथे करण्यात आले आहे. यातील प्रथम तत्त्व म्हणजे 'स्वधया परिहिता:।' 'स्वधा' या शब्दाचे अन्न, पाणी, सेवा, परिश्रम किंवा कष्ट असेही अर्थ होतात. आपल्या यजुर्वेदभाष्यात थोर वेदज्ञ महर्षी दयानंद 'स्वधा'चा अर्थ करताना म्हणतात, 'स्वधा-स्वान् दधाति या, सा क्रिया, स्वेन धारिता सेवा वा।' म्हणजेच स्वत:करिता प्रस्थापित केली जाणारी पवित्र क्रिया किंवा स्वत:द्वारे कष्टपूर्वक धारण केलेली सेवा होय. तात्पर्य असे की, जे मोठ्या परिश्रमाने व कष्टाने मिळविले जाते, ते म्हणजे 'स्वधा' होय. जे काही परिश्रमाने उपार्जित केले जाते, त्याच्याच साहाय्याने आपण स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे, समाजाचे व राष्ट्राचे भरणपोषण करावे आणि सर्वांचे हित साधावे. थोडक्यात सांगावयाचे झाले, तर सत्यमार्गाने व आपल्याच मेहनतीने मिळविलेले जे धन किंवा जी साधने असतील, त्याद्वारेच आपण आपली व राष्ट्राची प्रगती साधावी. असत्य मार्गाने, इतरांना त्रास देऊन, चोरीच्या किंवा हीन मार्गाने धन संपादित करू नये. अशा अनिष्ट मार्गाने मिळविललेली संपत्ती (लक्ष्मी) चिरकाल टिकणारी नसते आणि समजा, अविवेकाने ती प्राप्त जरी केली तरी ती संपदा आपणाकरिता अनर्थकारी ठरते. धनोपार्जन निंदनीय कर्म नव्हे, ते तर स्तुत्यच. पण, ते मिळविण्याचा त्यांचा मार्ग सत्य व प्रामाणिकपणाचा असावा. रात्रंदिवस कष्ट व परिश्रम करून प्रामाणिकपणे मिळविलेले धन सर्वांकरिता व समाजाकरिता लाभप्रद ठरते. शाहीर अनंत फंदी आपल्या 'फटका' या लोकगीतात म्हणतात-

 

'कष्टाची बरि भाजी-भाकरी तुप-साखरेची चोरि नको।'

 

उत्तम मार्गानेच धन जोडण्याचा व ते इतरांना वितरीत करण्याचा मौलिक उपदेश संत तुकाराम आपल्या अभंगाद्वारे करतात-

 

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।

उदास विचारें वेंच करी॥

उत्तमचि गती तो एक पावेल।

उत्तम भोगील जीव-खाणी।

 

अनीतिपूर्वक, अनिष्टमार्गाने, लबाडीने मिळवलेल्या लाखोंच्या धनराशीचा काय उपयोग? कारण, त्याचा शेवटी नाश ठरलेलाच असतो. शास्त्रकारांनी या संदर्भात केलेले विवेचन अतिशय मार्मिक स्वरूपाचे आहे-

 

अन्यायेन आगता लक्ष्मी:

खद्योत इव दीप्यते।

क्षणं प्रकाश्य वस्तुनि

निर्वाणे केवलं तम:।

 

म्हणजेच अन्यायाने मिळवलेली संपत्ती काजव्याप्रमाणे चमकते. काही क्षणाकरिता ती प्रकाशित होते, पण नंतर मात्र अंधारच अंधार! याकरिता माणसाने परिश्रम करून धर्मपूर्वकच धन कमवावे. जीवन यशस्वी करण्याकरिता दुसरी बाब म्हणजे 'श्रद्धा' होय. 'श्रद्धा' ही शब्द 'श्रत् आणि धा' असा तयार होतो. 'श्रत्' म्हणजे धारण करून जगणे. श्रद्धेच्या माध्यमाने सर्व बाजूने झाकला जातो. आरुढ होतो. तेव्हा निश्चितच त्याची प्रगती होते व जीवनभर तो आनंदाने जगत राहतो. वेदांमध्ये श्रद्धेविषयी अनेक मंत्र आले आहेत. 'श्रद्धासूक्त' हे सत्यधारणेचे महत्त्व प्रतिपादित करते.

 

सत्यधारण करण्याची (श्रद्धा) वृत्ती मानवाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. श्रद्धा असेल तर त्या-त्या कार्यात त्याचा उत्साह वाढतो व ते ते कार्य तो चांगल्या प्रकारे करू शकतो, पण श्रद्धाच नसेल, तर तो काहीच करू शकणार नाही. असत्याला, अविद्येला, काल्पनिकतेला, धार्मिक अंधश्रद्धेला किंवा थोतांडाला धारण करणे म्हणजे 'श्रद्धा' नव्हे. कारण, तिथे 'सत्'(श्रत्)चा लवलेशही नसतो. ती तर 'असत्(अश्रत्)+ धा' म्हणजेच 'अश्रद्धा' होते. आज लाखो अंधजन अश्रद्धेला बळी पडून आपला वेळ, पैसा, मन प्रतिष्ठा खर्च करीत आहेत. मंत्रात तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे 'दीक्षा.' सत्यसंकल्पनांना व व्रतांना धारण करणे म्हणजेच 'दीक्षा' होय. सत्यव्रतांची दीक्षा मानवाला सतत सन्मार्गाने पुढे-पुढे प्रगतिपथावर नेते. त्यामुळे मानव यशस्वी ठरतो. वेदांमध्ये एकेठिकाणी म्हटले आहे- 'दीक्षया आप्नोति दक्षिणाम्।' म्हणजेच व्रत आणि संकल्पांना धारण केल्याने माणसाला दक्षिणा म्हणजेच धनाचा लाभ होतो. शेवटचा भाग म्हणजे 'यज्ञे प्रतिष्ठिता:।' यज्ञकार्यात सदैव प्रतिष्ठित राहणे. 'यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम्।' या शतपथ ब्राह्मणातील वचनानुसार प्रत्येक शुभ (श्रेष्ठ) कार्य हा यज्ञ होय. मानवाने पवित्र कार्यात नेहमीच प्रतिष्ठित राहावयास हवे. चांगली कामे ही यज्ञकर्मात मोडतात. याकरिता नेहमी सत्कर्माची सवय लावून त्यात व्यग्र राहणे, हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. वरील या चार गोष्टींमुळे इहलोकाबरोबरच परलोकाचीदेखील यात्रा निश्चितच सुगम, सफल व यशस्वी ठरते.

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य