नीलिमा दाते...

    दिनांक  21-Sep-2019 20:37:07

तिचा आयुष्यातला सकारात्मक दृष्टिकोन तर कारणीभूत नसेल याला
? की भरभरून उपभोगणार्‍याला भरभरून देण्याचा आयुष्याचा हा नियम म्हणावा. दाते काकांची ‘हीना’ अचानक आठवली. चटकन हात वास घ्यायला नाकापाशी गेला. उपयोग नव्हता. नीलिमाच्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्पाने वातावरणच नव्हे, तर मनही व्यापून राहिलं होतं. पोरगी बापाची गादी चालवत होती एवढं नक्की!


“भैय्या कसा आहेस?” मागून हे शब्द कानावर पडले आणि गुळचुनाच्या करंजीत एखादा बेदाणा दाताखाली यावा तसं वाटून गेलं. मला ‘भैय्या’ अशी हाक मारणारीया जगात एकच व्यक्ती होती. नीलिमा...नीलिमा दाते. वास्तविक आम्हा मुंबईकरांना ’भैय्या’ हा शब्द ‘वेगळ्या’ अर्थाने ज्ञात असतो. पण, इथे कुठल्या प्रांतीय अस्मितेचा प्रश्न वगैरे दुरान्वयानेही नव्हता. या ‘भैय्या’ शब्दात आपुलकी होती, निखळ प्रेम होतं. वीस वर्षांपूर्वी दाते कुटुंब इंदूरवरुन मुंबईत आलं आणि नीलिमा दाते या चिमुकल्या चिमुरडीमुळे ’भैय्या’ हा शब्द माझ्या आयुष्यात आला. दाते काका रेल्वेत होते. बदली झाली अन् सगळा संसार पाठीवर घेऊन ते मुंबईत दाखल झाले. बायको आणि दोन मुलं. माणूस बडा ‘रंगेल’ होता. अर्थात, चांगल्या अर्थाने. सभ्यतेच्या अख्त्यारित मोडणारे सर्व शौक त्याने केले. छान कपडे, चमचमीत खानपान, निरनिराळी अत्तरं, अधूनमधून गाण्याच्या मैफिली. एखाद वेळेस छोटंसं का होईना, पण नाटकात केलेलं काम. सर्वच कसं आयुष्य भरभरून उपभोगण्याची प्रेरणा देणारं. ते भेटले की, एक ऊर्जा मिळायची जगण्याची. त्यांचं खास शैलीतलं वाक्य ठरलेलं- ’‘बेटा जिंदगीमध्ये तक्रार करत जगण्यात कसली आलाय मजा? अरे जगावं तर या अत्तरासारखं.आपण नसतानाही आपल्या आठवणींच्या दरवळीत लोकांचा दिल खूश झाला पाहिजे
!’ आणि मग खिशातून अत्तराची छोटेखानी बाटली काढली अन् त्यातली ‘हीना’ माझ्या हातावर लावीत. त्या माणसाला निराश म्हणून कधी मी पाहिला नाही. सदा आनंदी. गेले तेव्हासुद्धा चेहरा प्रसन्न. बघणार्‍याला वाटावं आत्ता झोपेतून उठून बसतील. हेच सारे गुण नीलिमात उतरले. अगदी तंतोतंत उतरले. एक अत्तर वगळता. पण ती कविता करत. आपल्याच विश्वात तिचा स्वच्छंदी वावर सुरू असे. कधी भेटली तर निरागसपणे विचारी ‘’भैय्या नवीन कविता केली आहे. ऐकणार?” मग कितीही घाई असली तरी हा ‘भैय्या’ विरघळून पडत आणि आयुष्य कसं उपभोगावं, याची क्षणभर का होईना, पण शिकवणी घेत. ती काय बोलते याहून अधिक भिडायचा तो तिचा प्रसन्नभाव. नीलिमाने तिच्या वयाच्या इतर मुली ज्यात रमतात त्यात क्वचितच कधी रस घेतला. जणू काही छान जगायचा पूर्वनिग्रह करून आल्यासारखीच सदा जगत. गंगोत्रीतल्या गंगेला पाहून नळातून वाहणार्‍या पाण्याची जी अवस्था होईल, तीच तिच्या भोवतालच्या लोकांची होई. नीलिमा या सगळ्या पलीकडे होती. या सगळ्यामुळेच की काय तिच्या ‘भैय्या’ या पुकारण्यात निखळता अगदी भरभरून जाणवायची. आजही तसंच झालं. मी “काय गं काय म्हणतेस? आई कशी आहे?” असं विचारता... “भैय्या, माझं लग्न ठरलं म्हणजे आईनेच ठरवलं. पण खरं सांगू का? पाहता क्षणी मला मुलगा खूप आवडला. अगदी माझ्या मनात होता ना तसाच! तू यायचं हं लग्नाला. कुठलंही कारण चालणार नाही! चल येते...” कसं इतकं टेलर-मेड आयुष्य या मुलीचं? तिचा आयुष्यातला सकारात्मक दृष्टिकोन तर कारणीभूत नसेल याला? की भरभरून उपभोगणार्‍याला भरभरून देण्याचा आयुष्याचा हा नियम म्हणावा. दाते काकांची ‘हीना’ अचानक आठवली. चटकन हात वास घ्यायला नाकापाशी गेला. उपयोग नव्हता. नीलिमाच्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्पाने वातावरणच नव्हे, तर मनही व्यापून राहिलं होतं. पोरगी बापाची गादी चालवत होती एवढं नक्की!


- डॉ. अमेय देसाई