'गोलकीपर्स डेटा रिपोर्ट'चे तथ्य

    दिनांक  21-Sep-2019 11:22:49   असे म्हटले जाते की, प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांसाठी राजकुमारीच असते. पण, वडिलांसाठी राजकुमारी असली तरी समाजासाठी जेव्हा ती राजकन्या, राजमाता गेला बाजार मन, भावना, इच्छा असणारी स्त्रीदेहधारी माणूस ठरेल तेव्हाच तिचे जगणे सुकर होते, हा सामाजिक दृष्टिकोन...


"जगाच्या पाठीवर कुठेही मुलगी म्हणून जन्मला आलात, तर आयुष्य खडतरच आहे. त्यातही गरीब देशात किंवा कोणत्याही गरीब प्रदेशात जन्मलेल्या मुलींचे आयुष्य तर त्याहून कठीण असते." 'बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन'ने प्रकाशित केलेल्या तिसऱ्या 'गोलकीपर्स डेटा रिपोर्ट'मधील वरील निष्कर्ष आहे. संयुक्त राष्ट्राने २०१५ मध्ये शाश्वत विकासाची जी नीती आखली, त्यामध्ये गरिबी आणि त्याद्वारे येणाऱ्या समस्यांपासून जगाला मुक्ती देण्याचा प्रयत्न आहे. याच नीतीनुसार 'बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन'ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. असो, निष्कर्ष धक्कादायक नाहीच. कारण, जगाने या सत्याला 'जगण्याची सहजता' म्हणूनच स्वीकारले आहे की काय, असे वाटते. जन्म घेताना कुठे जन्माला यावे हे कुणाच्याही हातात नसते. मात्र, लिंगसापेक्ष जगात कोणते लिंग घेऊन जन्माला यावे, ही गोष्टसुद्धा सन्मानीय अपवाद सोडून जगभरचे लोक आपल्या हातात ठेवू इच्छितात. गर्भलिंग तपासणी हा त्याचाच परिपाक. म्हणूनच 'मुलगी नको गं बाई' अधिकारवाणीने म्हणण्याचे दिवस गेले असे समजणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. आजही लग्न जमवताना असेही काही वरपक्ष पाहिले आहेत, जे भावी वधूची सखोल चौकशी करतात. त्यामध्ये तिला किती भाऊ-बहिणी आहेत हे महत्त्वाचे. पण, यातही एक माहिती आवर्जून काढली जाते, ती म्हणजे वधूच्या आई, बहीण, मावशी आणि आत्याला मुलगा आहे की नाही? का त्यांना नुसत्याच मुली आहेत? जर या चौघींपैकी दोघींना जरी फक्त मुली असतील, तर या भावी वधूला पण मुलगीच होण्याचे 'चान्सेस' जास्त आहेत, असा निष्कर्ष काढून भावी वधूला नाकारणारे महाभाग आजही आहेत. कुणाला वाटेल की ही कोणत्या दुनियेची गोष्ट आहे? मात्र, ही गोष्ट इथलीच आहे. प्रमाण कमी असेल, पण परिणाम कायम आहेत? आपल्या समाजातच असे काही आहे का, तर तसेही नाही. जगभरात मुलगी म्हणून जन्माला येण्याचे कल्पनातीत 'साईड् इफेक्ट्स' आहेत. असे म्हटले जाते की, प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांसाठी राजकुमारीच असते. पण, वडिलांसाठी राजकुमारी असली तरी समाजासाठी जेव्हा ती राजकन्या, राजमाता गेला बाजार मन, भावना, इच्छा असणारी स्त्रीदेहधारी माणूस ठरेल तेव्हाच तिचे जगणे सुकर होते, हा सामाजिक दृष्टिकोन...

 

'बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन'च्या अहवालातील निष्कर्षाला जगाच्या पाठीवर कुणीही आवाहन देऊच शकत नाही. इतके हे उघडेनागडे क्रूर सत्य आहे. याच अहवालात असाही निष्कर्ष आहे की, आरोग्य आणि शिक्षणाच्या सोई उपलब्ध करताना सगळेच निकष पूर्ण केले तरी त्यांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळण्यास अनेक अडचणी आहेत. त्यापैकी सर्वात मोठी आणि भयंकर अडचण आहे लिंगभेद. लिंगभेदामुळे येणारी असमानता मुलींच्या आयुष्यात कायमच वंचिततेचा अंधार पसरवत असते. गरिबा घरी तर सोडाच, पण आर्थिक सधनता असलेल्यांना प्रश्न केला की, तुमच्या घरी शिक्षणासाठी आर्थिक संधी उपलब्ध झाली तर कुणाला प्रदान करावी? तर बहुमताने उत्तर असेल 'मुलाला.' हे उत्तर केवळ भारतात किंवा आशियाई देशातच येईल असे नाही, तर पाश्चात्त्य, आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन, कोणत्याही खंडात, कोणत्याही संस्कृतीमध्ये बहुसंख्य स्तरावर हेच उत्तर मिळेल. तीच गोष्ट आरोग्याच्या सुविधांबाबतही आहे. या अहवालानुसार, जगभरात दर १५ व्यक्तींपैकी एक व्यक्ती मूलभूत गरजांपासून वंचित आहे. तिच्यापर्यंत कोणत्याही सोईसुविधा पोहोचत नाहीत. आरोग्य, शिक्षण वगैरे तर दूरच्याच गोष्टी, पण अन्न, पाणी वगैरेंचीही वानवाच आहे. 'भुकेपासून मुक्ती' हा तर केवळ 'बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन'चाच अजेंडा नाही, तर जगातल्या प्रत्येकाचाच हा अजेंडा आहे. केवळ त्या अजेंड्याचे प्रकटीकरण वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. याच परिप्रेक्ष्यात जगभरात भुकेसोबतच भयापासून मुक्ती हासुद्धा मानवी शाश्वत मूल्यांचा एक गाभा आहे. कुठच्या ना कुठच्या पातळीवरचे भय हे जगभरात माणसाला भयक्रांत करत आहे. त्यातही स्त्रीचे जगणे हे विविध नकारात्मक समजुती, रूढी, परंपरा या चक्रात अडकून पडले आहे. हे मानवाच्या उत्क्रांतीतील सर्वात मोठे भय आहे. कारण, जन्म देणारी आणि जगण्यासाठी कारण ठरणारी स्त्री! तिलाच जर जगण्याची शाश्वत मूल्ये प्राप्त होत नसतील, तर उद्याचे मानवी भविष्यही फारसे आशादायक नसेलच. ही भीती 'बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशन'ने व्यक्त केली आहे. जगभरात या भीतीचा विचार करण्याची वेळ आली आहे.