मेट्रो-३ च्या भूमिगत स्थानकांचे ४० टक्के काम पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019   
Total Views |



दोन ते तीन मजल्यांची २६ भूमिगत स्थानके


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ’कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ’मेट्रो-३’ भुयारी मार्गिकेवरील भूमिगत स्थानकांचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीची कोणत्याही प्रकारे कोंडी न करता मुंबईच्या पोटात स्थानकांच्या खोदकामाची कामगिरी ७६ टक्के फत्ते झाली आहे. सध्या २६ स्थानकांच्या अंतर्गत भागातील स्थापत्त्य उभारणीचे काम प्रगतिपथावर असून 'कुलाबा ते वांद्रे' हा पहिला टप्पा डिसेंबर २०१२१ पर्यंत सुरू करण्यासाठी ’मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ (एमएमआरसीएल) प्रयत्नशील आहे.

 

 
 

मुंबईच्या भूगर्भातून जाणारी ’मेट्रो-३’ ही मार्गिका देशातील पहिली पूर्णत: भुयारी मार्गिका आहे. सध्या या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाबरोबरच भूमिगत स्थानकांचे निर्माणकार्य वेगाने सुरू आहे. ’टनल बोअरिंग मशीन’च्या आधारे सुरू असलेल्या भुयारीकरणाचे काम ६२ टक्के पूर्ण झाले आहे. तर १५ हजार कुशल कामगार आणि अभियंतांच्या मदतीने स्थानक उभारणीचे काम करण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या स्थानकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. पश्चिम मुंबईला दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या या मार्गिकेत एकूण २६ स्थानके असणार आहेत. ही स्थानके पूर्णत: भूमिगत असल्याने ती बांधण्यासाठी ’कट अ‍ॅण्ड कव्हर’ या बांधकाम पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या पद्धतीत नियोजित जागी खड्डा खणून अंतर्गत भागात मूळ बांधकाम पूर्ण करण्यात येते. त्यानंतर तो खड्डा भरण्यात येतो. अशा पद्धतीने ’मेट्रो-३’च्या भूमिगत स्थानकांचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे.

 
 
 
 

भुयारीकरणाप्रमाणेच स्थानकांचे निर्माणकार्यही नियोजनाच्या दृष्टीने पॅकेजनुसार करण्यात येत आहे. सात पॅकजमधील २६ स्थानकांच्या पायलिंगचे ९९ टक्के काम पूर्ण करण्यात ’एमएमआरसीएल’ला यश मिळाले आहे. पायलिंगनंतर स्थानकाचा मूळ खड्डा खणण्याचे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. या खड्ड्यामध्ये स्थानकाचे मूळ स्थापत्त्य असेल. ही भूमिगत स्थानके दोन ते तीन मजल्यांची असणार आहेत. त्यामुळे हे मजले बांधण्याच्या दृष्टीनेदेखील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानकाच्या सर्वात खालच्या म्हणजेच ज्या ठिकाणी फलाट असतील, अशा ’बेस स्लॅब’चे काम ४१ टक्के पूर्ण झाले आहे. त्यावरील भागाचे म्हणजेच ’कॉनकोर्से स्लॅब’चे काम १३ टक्के झाले आहे. छताकडील ’रुफ स्लॅब’चे काम तीन टक्के झाले असून भर पावसाळ्यातही कोणताही खंड न पडता या सर्व स्तरांचे काम पूर्ण करण्यात येत आहेयाशिवाय या बांधकामामुळे वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मजबूत लोखंडी पूल तयार करुन त्यावरुन वाहतूक वळविण्यात आली आहे. या लोखंडी पूलाखाली स्थानक उभारणीचे काम सुरक्षितरित्या सुरू आहे.

 

‘मेट्रो-३’ च्या भूमिगत स्थानकांचे काम जलद गतीने सुरू आहे. यामध्ये खोदकाम, पायलिंग, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब व रुफ स्लॅबचे बांधकाम इत्यादींचा समावेश आहे. ’मेट्रो-३’च्या एकूण २६ भूमिगत स्थानकांपैकी १९ स्थानके रस्त्याच्या मधोमध आहेत. मात्र, वाहतुकीला कुठलाही अडथळ न निर्माण करता हे काम आम्ही करतो आहे. आतापर्यंत स्थानकाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. - अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, एमएमआरसीएल

@@AUTHORINFO_V1@@