पर्यावरण संवर्धनासाठी पर्यायी वाहतूक आवश्यक : आयुक्त प्रवीण परदेशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |

 

 

मुंबई : "शहराचा विकास आराखडा बनण्यासाठी जवळपास वीस वर्षांचा कालावधी लागतो. वीस वर्षांपासून प्रयत्न करुन आरेमध्ये कारशेडसाठी जागा आरक्षित करण्यात आली. सर्व बाबी विचारांत घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असून मुंबईत पर्यावरण संवर्धनासाठी पर्यायी वाहतूक असणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी शुक्रवारी केले.

 

शहरातील 'माय ग्रीन संस्थे'च्यावतीने आयोजित मालाड पश्चिम येथील खेतान शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रवीणसिंह परदेशी यांनी 'मेट्रोची गरज आणि शाश्वत विकास' या विषयावर बोलताना अनेक विषयांना हात घातला. दै. 'मुंबई तरुण भारत' या कार्यक्रमाचे माध्यम प्रयोजक होते. आयुक्त प्रवीण परदेशी यांचे भाषण ऐकण्यासाठी यावेळी नागरिकांनी सभागृह तुडूंब भरले होते. यावेळी आयुक्तांनी बोलताना अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. प्रवीण परदेशींनी मुंबई शहराचे संपूर्ण प्रशासन आणि व्यवस्था उलगडून सांगत व्याख्यानाची सुरुवात केली.

 

ते म्हणाले, "मुंबईतील ७०-८० लाख नागरिक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेतील गर्दीमुळे खाजगी वाहनांचा वापर जास्त होतो. शहराचा विकास आराखडा बनण्यासाठी जवळपास २० वर्षांचा कालावधी लागतो. २० वर्षांपासून प्रयत्न करून आरेमध्ये कारशेडसाठी जागा आरक्षित करण्यात आली. मुंबईत पर्यावरण संवर्धनासाठी पर्यायी वाहतूक असणे आवश्यक आहे. कार्बन संप्रेरके शोषून घेण्यात आणि पर्यावरणाचे समतोल राखण्यात वृक्षांची मोठी भूमिका असते. मुंबईतील कार्बनच्या तुलनेत ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर द्यायला हवा. त्या दृष्टिकोनातून मेट्रोचा विचार व्हायला हवा. कारशेडशिवाय मेट्रो धावणे अशक्य आहे. कारशेडसाठी शहरात जागा शोधायची तर अनेक खाजगी बिल्डिंग, मालमत्ता हलवावे लागतील जे जवळपास अशक्य आहे," असे ते म्हणाले.

 

आयुक्त परदेशी यांनी यावेळी जगभरातील अनेक मोठ्या शहरांचे नकाशे दाखवले. त्यातील रस्त्यांची, वाहतूक व्यवस्थेचे आराखड्यांवर चर्चा केली. यावेळी प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण संदर्भासह केले गेले. ते म्हणाले, "जपान हा 'क्यूटो प्रोटोकॉल'ला बांधील आहे. जपान कधीही पर्यावरणविरोधी प्रकल्पांना पाठिंबा देत नाही. जपानने 'मेट्रो-३' प्रकल्पाला मदत केली. ते २ लाख, ६८ हजार मेट्रिक टन कार्बनडायॉक्साईड वाचवतात, हे ऑडिट जपानने मेट्रोला पाठिंबा देण्यापूर्वी केले आहे," असे अनेक मुद्दे प्रवीण परदेशींनी नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'माय ग्रीन सोसायटी'चे विशाल टीबरेवाल यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती दिली. तसेच नागरिकांना प्रत्यक्ष वनसंवर्धनाच्या कामात 'माय ग्रीन सोसायटी'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप सुशील जाजू यांनी केला. कार्यक्रमाला सुरेश बगेरिया, सुशील राजगडीया, महापालिकेचे साहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर उपस्थित होते.

  
 

आयुक्तांचा चक्क लोकलने प्रवास

 

 
 

वरिष्ठ पातळीवरील सरकारी अधिकारी आणि मुंबईच्या लोकल रेल्वेचा प्रवास असे चित्र पाहायला मिळणे दुर्मिळच. मात्र, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी मेट्रो प्रकल्पाचे महत्त्व पटवून देण्यासाठी चक्क मुंबर्ईच्या लोकल रेल्वेने प्रवास करत अनेकांची मने जिंकून घेतली. आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेतही मालाडला जाण्यासाठी उत्तर मुंबईच्या दिशेने लोकल रेल्वेने प्रवास केला. कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्ये दररोज गर्दी होते. मात्र, सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळीसुद्धा आयुक्तांनी चक्क लोकलने प्रवास करत अनेकांची मने जिंकली.

 
@@AUTHORINFO_V1@@