एकविसाव्या शतकात लोकशाहीचं भवितव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आज अमेरिकेत ट्रम्प यांची धोरणं पाहता लोकशाहीवादी विचारवंत या निष्कर्षावर आलेत की, ट्रम्प आणि पुतिन ही एकमेकांची प्रतिबिंबे आहेत. अर्थात, अमेरिकन राज्यघटनेला हात लावणं तितकं सोपं नाही. पण, जगभरचे राजकीय प्रवाह पाहता एकंदर लोकशाही मूल्यांनाच मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे, असं या विचारवंतांना वाटतंय.


पश्चिम युरोप आणि अमेरिकन राजकीय विचारवंतांना आपल्या लोकशाही परंपरेचा फार अभिमान आहे. या परंपरेची सुरुवात त्यांच्या मते प्राचीन ग्रीक गणराज्यांपासून होते. मग क्रम लागतो रोमन साम्राज्याचा. रोमन सम्राट म्हणजे 'सीझर' हा राज्यप्रमुख असला, तरी तो अनियंत्रित हुकूमशाह नव्हता. 'सेनेटर्स' म्हणजे सामान्य जनतेचेप्रतिनिधी हे त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असत, असं त्याचं म्हणणं आहे. ज्युलियस या 'सीझर'ने या सेनेटर मंडळींचे नियंत्रण झुगारून अनिर्बंध सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सेनेटर लोकांनी त्याला सरळ ठार केलं आणि त्याच्या जागी ऑगस्टस या माणसाला 'सीझर' बनवलं. म्हणजेच पराक्रमी आणि कर्तबगार राज्यकर्ता अनियंत्रित बनू पाहताच लोकप्रतिनिधींनी त्याला बाजूला सारण्यात हयगय केली नाही, याचं हे पश्चिमी विचारवंत कौतुक करतात. इ. स. १२१५ साली म्हणजे ८०० वर्षांपूर्वी इंग्लंडमधल्या सरदार मंडळींनी रनीमीड या ठिकाणी राजा जॉनला 'मॅग्ना कार्टा' या करारावर सही करायला लावून त्याची सत्ता नियंत्रित केली. ही आधुनिक लोकशाहीची सुरुवात होय, असं मानलं जातं. मग क्रम लागतो अमेरिकन राज्यक्रांतीचा. १५व्या शतकापासून युरोप खंडातल्या विविध देशांमधले लोक अमेरिका खंडात स्थलांतरित होऊ लागते. १००-१५० वर्षांतच त्यांच्या मनात स्वतंत्र अस्मिता अंकुरली. एके काळचा आपला मायदेश म्हणजे मुख्यत: ब्रिटन आज आपलं शोषण करतोय, असं त्यांना वाटू लागलं. याविरुद्ध त्यांनी सशस्त्र युद्धच पुकारलं आणि अमेरिका हे नवं राष्ट्र निर्माण झालं. सुरुवातीचेस्वातंत्र्ययोद्धे हातात सत्ता आली की, हळूहळू हुकूमशहा होऊ लागतात. हा मनुष्यस्वभाव लक्षात घेऊन नव्या अमेरिकन राष्ट्राच्या घटनाकारांनी राज्यघटनाच अशी काही चिरेबंद बनवली की तेथे कुणी हुकूमशहा बनूच शकणार नाही. त्यानंतर युरोपमध्ये म्हणजे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. राजाच्या अनियंत्रित आणि विलासी कारभाराला विटलेल्या जनतेनं बंड केलं. राजा, राणी आणि अनेक सरदारांची मुंडकी उडाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महान लोकशाही तत्त्वाचा उद्घोष करणाऱ्या या फ्रेंच राज्यक्रांतीच्या घुसळणीतून एक अत्यंत सामान्य माणूस पुढे आला. तो फ्रान्सच्या मुख्य भूमीचा रहिवासी नव्हता.त्याचे आईबाप सामान्य होते. पेशाने तो लष्करातल्या तोफखान्याचा कनिष्ठ अधिकारी होता. नेपोलियन बोनापार्ट. सर्व दृष्टींनी सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी, पण आपल्या अंगच्या लोकविलक्षण गुणांनी नेपोलियन लोकांच्या कंठातला ताईत बनला. तो जितकाप्रतिभाशाली सेनापती होता, तितकाच कुशल आणि लोकांच्या हिताची काळजी घेणारा प्रशासक होता. पण, अल्पावधीत त्याने स्वतःचा फ्रान्सच्या राजसिंहासनावर पोपकडून राज्याभिषेक करवून घेतला. नेपोलियन ज्युलियस 'सीझर'च्या मार्गावर गेला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रींवर आधारित लोकशाही बोंबलली!

 

पण, या सगळ्या झाल्या जुन्या गोष्टी. आधुनिकतेचे अगदी परमोच्च शिखर म्हणजे विसावं शतक. आज एकविसाव्या शतकाचं दुसरं शतक शेवटाकडे निघालं असताना आपण मागे वळून पाहिलं, तर असं दिसेल की विसावं शतक व्यापून टाकणारा देश ना अमेरिका आहे, ना ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आहेत, तर तो देश आहे रशिया. प्रथम तो रोमानोव्ह राजघराण्याचा रशिया होता. मग तो लेनिन-स्टॅलिनचा सोव्हिएत रशिया होता आणि आता तो येल्त्सिन-पुतिनचा रशियन फेडरेशन आहे. सन १५९८ साली रुरिक राजघराण्याचा सम्राट झार फिओदोर हा मरण पावला आणि राजधानी पेट्रोग्राडसह संपूर्ण रशियात अंदाधुंदी माजली. सन १६९३ साली मॉस्कोचा सरदारमायकेल रोमानोव्ह याने पेट्रोग्राड हस्तगत केलं. तेव्हापासून रशियावर रोमानोव्ह घराण्याचा अंमल सुरू झाला. १९१३ साली झार निकोलस दुसरा याने आपल्या घराण्याच्या सत्तेचा तीनशेवा वाढदिवस थाटामाटात साजरा केला, पण पुढच्या वर्षी महायुद्ध सुरू झालं. झारने आपल्या देशाला ब्रिटन-फ्रान्सच्या बाजूने जर्मनी-तुर्कस्थानविरुद्ध महायुद्धात उतरवलं. अत्याधुनिक जर्मन सेनेनेविद्युत वेगाने हालचाली करून अवाढव्य पण मागास रशियन सेनेची वाताहत केली. यातून रशियन जनतेत संतापाचा उद्रेक झाला. कमगारांनी बंड केलं. शेतकऱ्यांनी बंड केलं. सैनिकांनी बंड केलं. झारची अनियंत्रित राजेशाही बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींची सोव्हिएट्स राज्यकारभार पाहू लागली. रशियामध्ये प्रथमच लोकशाही आली. पण ती स्थिर होण्यापूर्वीच लेनिनच्या बोल्झेविक पक्षानेराज्यक्रांती केली. “अलेक्झांडर केरेन्स्की याचं लोकनियुक्त सरकार हे खरंखुरं जनतेचं सरकार नाहीच. ते समाजातल्या 'आहे रे' वर्गाचेच फक्त प्रतिनिधी आहेत. आमचा साम्यवादी पक्ष हा शोषित, वंचित, पददलित, कष्टकरी, श्रमिक अशा सर्वसामान्य जनतेचं खरंखुरं प्रतिनिधित्व करतो,” असं म्हणत लेनिन ट्रॉटस्की यांनी ऑक्टोबर १९१७ मध्ये सत्ता हडपली. अल्पावधीतच त्यांनी जर्मनीशी तह करून रशियाला महायुद्धातून बाजूला काढलं. रशियापुरतं सरहद्दीवरचं युद्ध थांबलं.

 

पण, कदाचित त्यापेक्षाही भीषण असं अंतर्गत युद्ध पेटलं. त्यात राजघराण्याशी निष्ठावंत असे सरंजामदार वर्गातले लोक होते. देशात संसदीय घटनात्मक लोकशाही आली पाहिजे, असं म्हणणारे लोक होते आणि साम्यवादीही होते. साम्यवाद्यांच्या क्रांतिविषयक कल्पना तर फारच मोठ्या होत्या. रशियात साम्यवादी क्रांती यशस्वी झालेली पाहून संपूर्ण जगभरात, म्हणजे किमान युरोप-अमेरिकेत तरी कामगार वर्ग बंड करून उठेल आणि आंतरराष्ट्रीय कामगार राज्य निर्माण होईल, अशी त्यांना आशा वाटत होती. तसं काही घडलं नाही. पण, खुद्द रशियात मात्र यादवी युद्ध वणव्यासारखं भडकलं. एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष, एका वर्गाविरुद्ध दुसरा वर्ग, एका जमातीविरुद्ध दुसरीजमात, एका प्रांताविरुद्ध दुसरा प्रांत अशा या भीषण युद्धात नुसतेच दंगेधोपे नि जाळपोळ झाली नाही, तर सरळ समोरासमोर लढाया नि कत्तली झाल्या. खुद्द झार आणि त्यांची बायकामुलं यांना कुत्र्याप्रमाणे गोळ्या घातल्या, तिथे बाकीच्यांचा काय पाड! रशियाच्या पश्चिमेकडे 'पेल ऑफ सेटलमेंट' नावाचा एक मोठा भूभाग होता. रशियन लोक स्वत:ला 'स्लाव्ह' वंशाचे मानतात आणि ज्यू वंशीय लोकांचा ते मन:पूर्वक द्वेेष करतात. 'पेल ऑफ सेटलमेंट' म्हणजे 'गावकुसाबाहेरची वसाहत.'ज्यू लोकांनी त्या भागात राहून काय ते करावं. त्या भागाबाहेर रशियन प्रदेशात यायला त्यांना बंदी होती. या यादवी युद्धात सर्वच पक्षांच्या लोकांनी 'पेल ऑफ सेटलमेंट' मधल्या हजारो ज्यू लोकांना सरळ ठार मारलं. का? तर सहज गंमत म्हणून! लहान मुलं कशी सहज गंमत म्हणून किडे-मुंग्या मारतात, तसंच! कॉकेशस प्रदेश हा काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्या दरम्यानचा कॉकेशस पर्वतरांगांचा प्रदेश. तिथे ख्रिश्चन आणि मुसलमान अशा दोन्ही धर्मीय लोकांची दाट लोकवस्ती आहे आणि परंपरागत हाडवैरही आहे. झारची केंद्रीय सत्ता नाहीशी झालेली पाहताच ते हाडवैर उफाळून आलं आणि दोनही धर्माच्या लोकांनी आपापसात बेसुमार कत्तलींचा कहर उसळून दिला. संपूर्ण रशियाभर हेच चाललं होतं. प्रत्येक गट स्वत:ला देशभक्त नि दुसऱ्याला देशद्रोही ठरवून त्याचा समूळ उच्छेद करायला धडपडत होता. १९१७ ते १९२१ या कालखंडात अशा प्रकारे लाखो लोक मरून अखेर लेनिनची सत्ता स्थिरावली.

 

पण, स्वत:ला 'श्रमिकांची लोकशाही' - 'प्रोलेटरिएट ऑफ वर्कर्स' म्हणवणारी ही राजवट झारपेक्षाही रानटी आणि कत्तलबाज आहे, हे लवकरच स्पष्ट झालं. १९२१ ते १९९१ अशी ७० वर्षं म्हणजेच 'अत्याधुनिक' वगैरे म्हटल्या जाणाऱ्या विसाव्या शतकाचा पाऊण हिस्सा या पाशवीराजवटीने खाऊन टाकला. स्वत:च्या देशात कधीच लोकशाही आणली नाही आणि 'लाल क्रांतीची निर्यात' या गोंडस नावाखाली जगभरच्या लोकशाही राजवटी गिळून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि मग १९९१ साली चमत्कार घडला. अजिंक्य, अभेद्य, अप्रतिहत भासणारी ही राजवट टाचणी लावलेल्या फुग्यासारखी पाहता-पाहता फुस्स झाली. टाचेखाली दाबून ठेवलेले सरहद्दीवरचे १४ प्रांत स्वतंत्र देश बनले. खुद्द रशियात निवडणुका झाल्या. सर्वसामान्यांनी उत्साहाने मतदान केलं. साम्यवादी पक्ष पराभूत झाला आणि लोकशाहीवादी पक्ष सत्तेवर आला. मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार, मुक्त मतस्वातंत्र्य असं युरोप-अमेरिकेसारखं मोकळं वातावरण आलं. पण, लोकशाही टिकवणं सोपं नसतं. सर्व क्षेत्रामध्ये हितसंबंधी लोकांचा नवा वर्ग पाहता-पाहता निर्माण झाला आणि जुन्या व्यवस्थेतला पुतिनसारख्या लोकांनी पाहता-पाहता राज्य ताब्यात घेतलं. आज अमेरिकेत ट्रम्प यांची धोरणं पाहता लोकशाहीवादी विचारवंत या निष्कर्षावर आलेत की, ट्रम्प आणि पुतिन ही एकमेकांची प्रतिबिंबे आहेत. अर्थात, अमेरिकन राज्यघटनेला हात लावणं तितकं सोपं नाही. पण, जगभरचे राजकीय प्रवाह पाहता एकंदर लोकशाही मूल्यांनाच मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे, असं या विचारवंतांना वाटतंय. जगभरचा हा घटनाक्रम पाहताना आपल्या असं लक्षात येतं की, आपली लोकशाही व्यवस्था हीच खरी निकोप आणि सर्वसामान्यांची प्रातिनिधिक राज्यव्यवस्था आहे.

@@AUTHORINFO_V1@@