मातीतला शिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |



खेड्यापाड्यातील, वेश्यावस्तीतील मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि इतरही समाजशील उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या प्रा. जयेंद्र लेकुरवाळे या मातीतील शिक्षकाविषयी...


सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करण्याचे गावातील बऱ्याचशा तरुणांचे स्वप्न असते. मात्र, गावातील बहुतांश तरुणांचे योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाअभावी हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. पण, याच मुलांसाठी आशेचा किरण ठरले प्रा. जयेंद्र लेकुरवाळे. जयेंद्र लेकुरवाळे यांचे बालपण भुसावळच्या रेल्वे कॉलनीत गेले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाहाटा महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. या काळात स्काऊटमध्येही सक्रीय सहभाग घेतला. त्याची परिणती म्हणजे, १९९४ साली 'बेस्ट स्काऊट' या राष्ट्रपती पदकाने शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते जयेंद्र यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आपणही सरकारी सेवेत रुजू व्हावे, असे त्यांना वाटले. त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेण्यासाठीचे त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपेक्षित यश काही मिळाले नाही. ते पुणे विद्यापीठातूनच 'डीफेन्स' विषयात एम. एस्सी. पदवी घेऊन 'नेट' आणि 'सेट' परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी 'डीफेन्स' हा विषय नाशिकच्या भोंसला मिलिटरी महाविद्यालयामध्ये शिकविण्यास सुरूवात केली. तेव्हाच त्यांनी तरुणांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. भुसावळमध्ये जयेंद्र यांनी वेश्यावस्तीतील मुलांना शिक्षण देण्याच्या कामातही पुढाकार घेतला. पण, सुरुवातीला या कामात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

 

देहविक्री करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन, समाजात त्यांना मानाचे स्थान मिळवावे, असे वाटत असल्याने जयेंद्रना सहकार्य केले. मात्र, या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठीही जयेंद्रनी खूप मेहनत घेतली. या मुलांना 'खेल-खेल में शिक्षण' या संकल्पनेनुसार शिक्षण देण्यास मग त्यांनी सुरुवात केली. यात त्यांना चांगले यश मिळाले. याचवेळी त्यांनी भुसावळमध्ये 'लक्ष्य' हे 'गाव तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र' सुरू केले. यात त्यांच्या पत्नी शीतल यांची त्यांना साथ लाभली. शीतल या स्वतः स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आता उप अधीक्षक भूमी अभिलेख या विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यासुद्धा ग्रामीण भागातीलच असल्याने त्यांना गावातील मुलांच्या समस्यांची जाण होती. त्यानंतर जयेंद्र आणि शीतल यांनी भुसावळमधील एक गावही दत्तक घेतले. त्यांनी गावात जाऊन तेथील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन आणि साहित्य पुरविण्यास सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला गावकऱ्यांचा या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, लेकुरवाळे दाम्पत्याने आपले काम सुरूच ठेवले. या गावातून चार आयपीएस अधिकारी जयेंद्र यांनी घडविल्यावर गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या पाल्यांना या केंद्रात पाठविण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या या कार्यामुळे ३५० मुले विविध सरकारी क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. शिक्षणोपयोगी साहित्यही जयेंद्र यांच्याकडूनच पुरविले जाते आणि तेही अगदी नि:शुल्क. यामुळे अनेक गरीब मुलांच्या सरकारी सेवेत रुजू होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले. त्याचबरोबर भेंडोळे महिला विद्यालयात 'लक्ष्य' या संस्थेकडून अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले असून भुसावळमधील अनेक महाविद्यालयांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. भुसावळ महापालिकेकडून लेकुरवाळे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला असून ते 'स्वीकृत नगरसेवक'ही आहेत.

 

त्यांनी गावागावांत स्वच्छता मोहीम राबविली, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयही सुरू केले. नुकतेच प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयात पीएच.डी पूर्ण केली असून त्यांनी हा विषयसुद्धा आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये ते या विषयावर मार्गदर्शन करतात. प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी एका नवीन संकल्पनेनुसार इयत्ता पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांच्या 'लक्ष्य' संस्थेत अनेक लहान मुले या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात. मग या मुलांचा स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत झाल्याने त्यांना पुढील अभ्यास फारसा अवघड वाटत नाही. या केंद्रात मुलांचे समुपदेशनही केले जाते. कारण, या स्पर्धा परीक्षांना वाहून घेतलेल्या मुलांना बरेचदा ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपयशाला कसे सामोरे जावे, तणावमुक्त होऊन अभ्यासाकडे लक्ष कसे केंद्रीत करावे, याविषयी मार्गदर्शन केले जाते. यात अगदी वेश्यावस्तीतील मुलांपासून सर्वजण सहभागी होतात. लेकुरवाळे दाम्पत्याच्या सहकार्याने आज अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला आहे. भविष्यात सर्व गावांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रे आणि ग्रंथालये निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. शहरातील मुलांसारख्या सुखसोयी हाताशी उपलब्ध नसणाऱ्या, पैशांअभावी आपले ध्येय अपूर्ण सोडणाऱ्या तरुणांसाठी प्रा. जयेंद्र लेकुरवाळे आणि त्यांच्या पत्नी शीतल आज सर्वार्थाने आधारवड ठरल्या आहेत. या तरुणांची स्वप्न अगदी नि:स्वार्थ भावनेने पूर्ण करणाऱ्या लेकुरवाळे दाम्पत्याला त्यांच्या पुढील प्रवासाबद्दल अनेकानेक शुभेच्छा...!

 

- कविता भोसले

@@AUTHORINFO_V1@@