नेते येती शहरा...

    दिनांक  20-Sep-2019 21:53:36   


 


'साधुसंत येती घर तोचि दिवाळी-दसरा' याप्रमाणे 'नेती येती शहरा...' असे म्हणण्याची वेळ सध्या नाशिककर नागरिकांवर आली आहे. राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा दौरा नाशिकमध्ये नुकताच पार पडला. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे ब्रीद असलेले 'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक' याचे खऱ्या अर्थाने दर्शन नाशिककर जनतेला झाले. महत्त्वाचे नेते येणार असल्याने आणि ते रस्त्याने मार्गक्रमण करणार असल्याने शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने ठेकेदार कर्तव्यावर रुजू झाले. ठेकेदाराचा शब्द प्रमाण मानणारा मजूर वर्गदेखील तैनात झाला आणि बघता बघता मंत्रिमहोदय ज्या ज्या रस्त्यांवरून जाणार तेथील खड्डे चक्क नाहीसे झाले. हा चमत्कार घडला तो अवघ्या दोन दिवसांमध्ये. प्रशासनाने मनावर घेतले, तर बदल कसा घडविता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकची खड्डेमुक्ती. एरवी नाशिककर नागरिकांना खड्ड्यांचा जाच होतो हे सांगूनदेखील निविदा, निविदा पूर्व बैठका, निधी, कार्यालयीन आदेश वगैरे महत्तम कारणांमुळे नाशिक शहरातील रस्ते चकाचक झाले नव्हते. रस्त्यातील दुभाजक हे घाणीचे आणि शहर स्वच्छ की अस्वच्छ याचे दर्शन घडविणारे बोलके उदाहरण असते. या दुभाजकांची नेते येणार म्हणून घासून स्वच्छता करण्यात आली. रस्त्यावरील झाडांना कधी नव्हे तो आकर्षक आकार देत त्यांचे 'कटिंग' करण्यात आले. शहरातील वीजपुरवठा टप्प्याटप्याने तपासण्यात आला. जेणेकरून नाशिकनगरीत नेते असतानाच बत्तीगुल व्हायला नको. सर्वोत्तम प्रशासकीय कार्याचा आणि समन्वयात्मक कार्याच्या फलनिष्पत्तीचे उदाहरण या दरम्यान नाशिकमध्ये दिसून आले. त्यामुळे शहराने कात टाकण्यासाठी शहरात नेते येणे आवश्यक असते का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. नाशिककर वारंवार विविध समस्या मांडत असताना त्याकडे लक्ष न देणे किंवा त्यांना गृहीत धरणे हे योग्य आहे का, नेते घडविणारा मतदार हा व्यवस्थेत दुय्यम गणला जातो का, असे अनेक प्रश्न यामुळे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

कौतुक सुरक्षेचे, जाच नागरिकांना

 

नाशिकनगरीत देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी नाशिक शहर पोलिसांनी उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेचे उदाहरण सादर केले. नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या सुरक्षा नियोजनाचे कौतुक खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीदेखील करत शहर पोलिसांची पाठ कौतुकाने थोपटली. यावेळी १० अतिरिक्त निरीक्षक, २५ पोलीस उपायुक्त, ३०० पोलीस निरीक्षक आणि तीन हजार कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पंतप्रधान यांची सभा निर्विघ्नपणे पार पडली. असे असले तरी, काही नाशिककर नागरिकांना पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेचा जाच सहन करावा लागल्याचीदेखील उदाहरणे आहेत. नाशिकनगरीत महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरभर बॅरिकेट्स होते. त्यामुळे शहराचा जणू काही तुरुंग झाला आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावरील खानपानाच्या गाड्या आणि काही हॉटेल्स बंद करण्यात आल्याने शहरात खाण्यासाठीदेखील नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. त्यातच व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गर्दी होऊ नये, रस्त्यात वाहने उभी राहू नयेत, यासाठी आपले व्यवसाय बंद करण्याच्या किंवा स्वजबाबदारीवर व्यवसाय सुरू ठेवण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शहरात यात्रेच्या दरम्यान 'कर्फ्यू'सारखी स्थिती असल्याचे दिसून आले. नाशिक हे पर्यटनस्थळदेखील आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना या काळात कमालीची सजाच सहन करावी लागते, असे दिसून येते. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी आणि शहराच्या आर्थिक संरचनेत महत्त्वाची भूमिका बजावणारी मिसळ सकाळच्या वेळीदेखील उपलब्ध नसल्याचे यावेळी दिसून आले. शहरातील बसस्थानकेच बंद करण्यात आल्याने प्रवाशांनादेखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, रस्त्यावर होणारी गर्दी, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि बंद करण्यात आलेले रस्ते यामुळे शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसान झाले ते वेगळे. शहराची आणि शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या अतिथींची सुरक्षा ही महत्त्वाची आहेच. मात्र, त्याचा जाच सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही याकडेदेखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे.