काँग्रेसची 'पॉवर' डाऊन

    दिनांक  19-Sep-2019 19:10:28   विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. मात्र, असे असताना भाजप-शिवसेना महायुतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकीय पटलावर विरोधकांचे कुठेही अस्तित्व दिसत नसताना त्यांनी राजकीय आघाडी जाहीर करण्यात मात्र बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १२५, काँग्रेस १२५ व इतर छोटे मित्रपक्ष ३८ असे जागावाटप स्वतः जाणत्या नेत्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले. पण, हे करताना काँग्रेसने प्रथमच कमालीचा नमतेपणा घेतला असून आजवरच्या सर्वात कमी जागा आघाडीतून काँग्रेस लढवणार आहे. पण, या काँग्रेसी नमतेपणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. प्रत्यक्षात भाजपच्या झंझावातापुढे काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच जास्त घायाळ झाली असून राष्ट्रवादीतीलच जास्त नेत्यांनी हाती 'कमळ' धरले आहे. असे असताना नमते मात्र काँग्रेसने घेतल्याने राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर याआधी दोन वेळा २००४ व २००९ साली राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडीत निवडणूक लढवली, तर १९९९ व २०१४ ला राष्ट्रवादीने आघाडी न करता निवडणूक स्वबळावर लढवली. २००४ मध्ये काँग्रेसने १५७ व राष्ट्रवादीने १२४, तर २००९ मध्ये काँग्रेसने तब्बल १७० व राष्ट्रवादीने केवळ ११३ जागा लढवल्या होत्या. काँग्रेसची यावेळी स्थिती बिकट असली, तरी राष्ट्रवादीच्या स्थितीचे वर्णन सध्या 'भयंकर' असेच करावे लागेल. असे असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मंडळींनी थोरल्या पवारांसमोर सपशेल नांगी टाकल्याचे म्हटले जात आहे. थोरले पवार स्वतः राज्यभर फिरत असल्याने त्यांच्यासमोर काँग्रेसवाल्यांची ऊर्जा कमी पडत आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 'अपक्ष' निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय अहमदनगरच्या गडाखांनीही घेतला आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे, काँग्रेसच्या ताकदीवर त्यांच्याच नेत्यांना विश्वास वाटेनासा झाला आहे. काँग्रेसपेक्षा 'अपक्ष' लढू, असे काँग्रेसचा एकेकाळचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना वाटू लागले आहे.

 

मान ना 'स्वाभिमान'

 

'मान न मान, मैं तेरा मेहमान' ही म्हण आता आठवण्याचे कारण म्हणजे नारायण राणेंचे राजकारण. राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष', राजू शेट्टी यांनी 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' व बडनेराचे आमदार रवी राणा यांची 'युवा स्वाभिमान संघटना' या तिन्ही संघटनांच्या नावांमध्ये ठळकपणे 'स्वाभिमान' हा शब्द आहे. पण, योगायोगाने का असेना पण या तिन्ही पक्ष-संघटनांचे काम मात्र 'स्वाभिमाना'ला धरून नाही. मंगळवारी संध्याकाळी भाजपची महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात पोहोचली. त्यावेळी 'मस्वाप'चे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर "आपणास आमंत्रण असते, तर आपण आनंदाने यात्रेत सहभागी झालो असतो," असेही सांगितले. सध्या राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था त्रिशंकू आहे. राणेंना आपल्या पक्षाच्या विलीनीकरणाची तारीख याआधी वारंवार बदलावी लागली आहे. सध्या प्रचंड ताकद असलेल्या सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये येण्यास ते उतावीळ असले तरी या ना त्या कारणाने त्यांचा प्रवेश लांबला जात आहे. एकेकाळच्या या 'स्वाभिमानी' कोकणी नेत्याची होणारी ससेहोलपट बघणे नक्कीच क्लेशदायी आहे. पण, अशी स्थिती त्यांच्यावर का ओढवली, यावर राणे यांनीही आत्मचिंतन करणे नितांत गरजेचे आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे राजकारण करणाऱ्या राजू शेट्टी यांनीही बऱ्याच वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेत सवतासुभा करत आपली नवी संघटना काढली व त्यापुढे 'स्वाभिमानी' शब्द लावला. पण, त्यांचे प्रत्यक्ष राजकारण मात्र वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. काँग्रेसी धोरणांमुळे शेतकऱ्यांची धुळधाण उडाली असे सांगत राजकारण करणाऱ्या शेट्टी यांनी आता काँग्रेसशीच हातमिळवणी केली आहे. 'पवार'नीतीला टोकाचा विरोध करून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे शेट्टी आता पवारांच्याच कळपात दाखल झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या 'युवा स्वाभिमान संघटने'चीही अशीच काहीशी स्थिती आहे. त्यांनी त्यांची पत्नी नवनीत कौर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील अपक्ष जागा मिळवून खासदार केले. परंतु, आता त्यांचेही कधी राष्ट्रवादीच्या जवळ, तर कधी भाजपच्या छत्राखाली असे सुरू आहे. त्यामुळे 'स्वाभिमान' या संज्ञेला राजकारणात किती गांभीर्याने घ्यावे, असाच प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो.