प्लास्टिकच्या हद्दपारीची सुरुवात

18 Sep 2019 21:46:39


 

 

मोदींनी आणलेली 'स्वच्छ भारत मोहीम' असो वा एलपीजीवरील अनुदान सोडण्याचे आवाहन, त्याला जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देते, हिरीरीने भाग घेते. मोदींमुळे आपल्याला राष्ट्रसेवेच्या यज्ञात सहभागी होता आल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण होतो. प्लास्टिकबाबतही तसेच होईल, याची खात्री त्यामुळेच वाटते आणि हेच पंतप्रधान मोदींचे यशदेखील आहे!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशाची सत्ता हाती घेतली तेव्हा 'स्वच्छ भारत'ची हाक दिली होती. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकारात्मक विचार करणाऱ्या कोट्यवधी देशवासीयांनी लगोलग त्यावर कृतीही सुरू केली. मात्र, नकारात्मकतेलाच आपले जीवनध्येय मानलेल्यांनी पंतप्रधानांच्या घोषणेची खिल्ली उडवण्याचाही प्रकार केला. अर्थात, हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा, विचारसरणीचा आणि कार्यपद्धतीचाच भाग. दरम्यानच्या काळात देशातील बहुसंख्य ठिकाणचा बकालपणा, घाणेरडेपणा इतिहासजमा झाला. गाव-खेड्यांपासून शहरांनीही स्वच्छतेचा ध्यास घेतला. 'कोण सर्वाधिक स्वच्छ' यासाठी त्यांच्यात स्पर्धाही होऊ लागली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा साद घातली असून विषय प्लास्टिकचा आहे. येत्या गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपासून प्लास्टिकविरोधातील लढा तीव्र करण्यात येणार असून त्यासंदर्भातील आखणीही केंद्राने केली आहे. 'सिंगल युज प्लास्टिक' किंवा एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. म्हणजेच आगामी काळात एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकला हद्दपार करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्याचे यावरून दिसते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मंचावरही प्लास्टिकच्या वापराविरोधात मत मांडले होते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात, सप्टेंबरमध्ये झालेल्या 'सीओपी' संमेलनात तसेच 'जी-७' देशांच्या परिषदेतही मोदींनी 'सिंगल युज प्लास्टिक' वापरू नये, असे सर्वांसमोर सांगितले. जागतिक नेत्यांनीही मोदींच्या विचारांशी सहमती दर्शवली व त्यावर कार्यवाही करण्याचेही म्हटले. जशी जगाने एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकला नाहीसे करण्यात सक्रिय योगदान देण्याचे ठरवले, तसेच देशातल्या प्रत्येक नागरिकानेही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, तरच प्लास्टिकच्या भस्मासुरापासून नेहमीसाठी मुक्ती मिळू शकते.

 

प्लास्टिकला 'भस्मासूर' म्हणण्याचे कारण म्हणजे हा पदार्थ माणसानेच शोधला, त्याचा विविधांगी वापर सुरू केला आणि नंतर तो मानवासाठीच अहितकारक ठरला. त्यातही 'सिंगल युज प्लास्टिक' हे माणसासाठी, पर्यावरणासाठी, प्राणी-पक्ष्यांसाठी, जैवसाखळीसाठी, सागरी जीवांसाठी अत्याधिक घातक असल्याचे लक्षात येते. एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकच्या नावातून हे समजते की, त्याचा दुसऱ्यांदा वापर करता येणार नाही. 'वापरा आणि फेकून द्या' असा हा सगळा प्रकार. असे एकदा वापरलेले प्लास्टिक आपल्याला पिशव्यांच्या, थाळी-चमचे, कप-ग्लास, छोट्या बाटल्या, विविध वस्तूची वेष्टने-पाऊच या रुपात कचऱ्याच्या डब्यात वा रस्त्यावर, चौकात, नदी-नाल्यांत कुठेही दिसते. पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होणारे हे प्लास्टिक अतिशय कमी खर्चात तयार होते व त्याचमुळे त्याची उपलब्धताही सार्वत्रिक होते. मात्र, त्याच्या साफ-सफाईवर, स्वच्छतेवर सर्वाधिक खर्च होतो. अशा प्लास्टिकचे पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. आकडेवारीचाच विचार केल्यास ९१ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत नाही, तर एका वर्षांत एका व्यक्तीच्या शरीरात तब्बल ५२ हजारांपेक्षा अधिक अतिसूक्ष्म (मायक्रो) प्लास्टिकचे अंश खाण्या-पिण्यातून, श्वासातून जातात. वायुप्रदूषणाची आकडेवारी यात मिळवली तर हे प्रमाण सुमारे १ लाख, २१ हजार अतिसूक्ष्म (मायक्रो) प्लास्टिकच्या अंशापर्यंत पोहोचते. घातक रासायनिक पदार्थ असलेल्या प्लास्टिकच्या या शारीरप्रवेशामुळे व्यक्तीची आजारांशी लढण्याच्या आणि जननक्षमतेवर दुष्प्रभाव पडतो. तसेच कर्करोगाला आमंत्रण देणारेही ठरते. हा झाला मानवी शरीरावरील परिणाम. पण मानवाव्यतिरिक्त इतर घटकांवरही प्लास्टिकचे भयावह परिणाम होत असल्याचे आढळते. आपल्या भारतीय संस्कृतीत पृथ्वीला 'माता' म्हटलेले आहे, तर संत तुकारामांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे म्हणत निसर्गाशी नाते जोडले. परंतु, या निसर्गाला सुरुंग लावण्यात प्लास्टिकने मोठाच हातभार लावला. एका अहवालानुसार, २०१६ साली जगभरच्या समुद्रातील प्लास्टिकच्या तुकड्यांची संख्या ७० खर्व इतकी होती व त्याचे वजन होते सुमारे ३ लाख टन! तर एका अंदाजानुसार, २०५० सालापर्यंत समुद्रात माशांपेक्षा अधिक संख्या प्लास्टिकची असेल! प्लास्टिकच्या ज्वलनातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण २०३० सालापर्यंत तिप्पट होईल. प्लास्टिकसंदर्भातील ही आकडेवारी पाहता त्याचा वापर थांबवणेच योग्य राहील, असे वाटते.

 

प्लास्टिकचा विषय चर्चेला आला की, त्याच्या नाशाचा मुद्दादेखील उपस्थित होतो. प्लास्टिक जमिनीत गाडले तरी ते नष्ट होत नाही तर त्याचे असंख्य तुकड्यांत रुपांतर होते. नंतर हे धोकादायक रसायन जमिनीचा पोत बिघडवते, तिच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम घडवते. मातीतून प्लास्टिक खाद्यपदार्थ आणि पाण्यातही मिसळते. अंतिमतः ते सजीवांच्या शरीरातही अन्नावाटे जाते. दुसरीकडे दरवर्षी ११ लाखांपेक्षा अधिक सागरी पक्ष्यांचा-प्राण्यांचा प्लास्टिकमुळे बळी जातो. सोबतच ९० टक्के पक्षी व माशांच्या पोटात आजही प्लास्टिक सापडतेच, तर ७०० सागरी जीव प्लास्टिकमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर उभे ठाकले आहेत. भारतातही हीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळते. 'सीपीसीबी'च्या आकडेवारीनुसार भारतात दरदिवशी सुमारे २६ हजार टन प्लास्टिक फेकले जाते. त्यापैकी १० हजार टन प्लास्टिक कुठेही जमा केले जात नाही. नंतर हेच प्लास्टिक नैसर्गिक स्रोतात सामावले जाते आणि त्याचे दुष्परिणाम भारतीयांना भोगावे लागतात. म्हणजे प्लास्टिकच्या दुष्परिणांपासून कुठेही अलिप्त नाही. रस्त्यावर फिरणाऱ्या गायी-गुरांच्या तोंडात जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. म्हणूच अशा सर्वच प्रकारच्या वाईटापासून वाचण्यासाठी प्लास्टिकला रामराम करणेच श्रेयस्कर. आपल्या महाराष्ट्र सरकारने काही काळापूर्वी केलेली प्लास्टिकबंदी त्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊलच होते. आता केंद्रानेही यासंदर्भात हालचाली सुरू केल्या, हे निश्चितच कौतुक करण्यासारखे. परंतु, प्लास्टिकवर बंदी घालून प्रश्न सुटेलच असे नाही, तर त्याला पर्याय देण्यातूनच तोडगा निघू शकतो, हेही लक्षात ठेवले पाहिजे. कागदी-कापडी पिशव्या, लाकडी-बांबूच्या ताट, वाटी, चमचे, पेले, स्ट्रॉ, काचेच्या-तांब्याच्या विविध वस्तू प्लास्टिकला नक्कीच पर्याय ठरू शकतात. म्हणजेच पर्याय तर आहे, पण त्यासाठी सवयी बदलल्या पाहिजेत. सोबतच या सगळ्यासाठी व्यापक जनजागृतीही करायला हवी. इथे नरेंद्र मोदींचे वैशिष्ट्य ठळकपणे अधोरेखित होते. मोदींनी आणलेली 'स्वच्छ भारत मोहीम' असो वा एलपीजीवरील अनुदान सोडण्याचे आवाहन, त्याला जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देते, हिरीरीने भाग घेते. मोदींमुळे आपल्याला राष्ट्रसेवेच्या यज्ञात सहभागी होता आल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण होतो. प्लास्टिकबाबतही तसेच होईल, याची खात्री त्यामुळेच वाटते आणि हेच पंतप्रधान मोदींचे यशदेखील आहे!

Powered By Sangraha 9.0