पर्यावरणवाद्यांचा उत्साह मावळला?

18 Sep 2019 22:53:00



मुंबई : शहरातील बहुचर्चित मेट्रो-३ प्रकल्पाच्या प्रस्तावित आरे कारशेडचा वाद न्यायालयीन दरबारी पोहोचल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी याप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणवाद्यांचा उत्साह मावळल्याचे दिसून आले. 'आरे बचाव'च्या समर्थनार्थ न्यायालयात येणाऱ्या मंडळींची संख्याही मंगळवारच्या तुलनेत कमी झाली होती.

 

मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी बुधवारी सलग दुसऱ्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग व न्या. भारती यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. याचिकाकर्त्यांनी आरेशी संबंधित अनेक खटले वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केले होते. जैवविविधतेच्या मुद्द्यावर मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, “हा विषय राष्ट्रीय हरित प्राधिकरणासमोर चाललेल्या खटल्यात का मांडला नाही? पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आरे आहे की नाही, याविषयीचे प्रश्न तिथे उपस्थित करायला हवे होते. तुम्ही सर्वांनी आवश्यकतेपेक्षा जास्त खटले वेगवेगळ्या न्यायपीठांसमोर दाखल केले आहेत,” असेही मुख्य न्यायाधीश म्हणाले. पुरावे दाखल करण्यापूर्वी कागदपत्र काळजीपूर्वक तपासले गेले पाहिजेत, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना म्हटले आहे.

 

आरेसंबंधी सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित प्राधिकरण, उच्च न्यायालयात यापूर्वीही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अधिक-उणे सोडल्यास सर्व प्रकरणातील याचिकाकर्ते सारखेच आहेत. त्यापैकी एकही प्रकरण याचिकाकर्त्यांनी फलद्रूप शेवटाला नेलेले नाही. आरे कारशेडच्या प्रश्नावर गुरुवारी कामकाज सुरू राहणार असून कांजुरच्या जागेसंदर्भात याबाबत खलबते होण्याची शक्यता आहे.

Powered By Sangraha 9.0