सरकारचा मोठा निर्णय : आता ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी

18 Sep 2019 17:04:40



नवी दिल्ली : केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. "केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवर बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे. ई-सिगारेटचे निर्मिती-उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे." अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

 

धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातली आहे, असेही स्पष्ट केले. पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला पकडले तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Powered By Sangraha 9.0