'मॉथ लेडी'

    दिनांक  18-Sep-2019 23:04:12   

 


'पतंग' या कीटकावर अभ्यास करणारी पहिली महिला कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. शुभालक्ष्मी. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचे चीज म्हणूनच की काय, त्यांना 'मॉथ लेडी' असे नावलौकिक मिळाले.


मुंबई (अक्षय मांडवकर) : 'मॉथ' म्हणजेच पतंगांवर अभ्यास करणारी 'ती' भारतातील पहिलीच महिला कीटकशास्त्रज्ञ. १५ वर्षे रात्रीचे अंध:कारमय विश्व पालथे घालून तिने पतंगांच्या गूढ साम्राज्याचा शोध घेतला. हा शोध सर्वसामान्यांसमोर मांडण्यासाठी त्यांनी लिहिलेले 'फिल्ड गाईड टू इंडियन मॉथ' हे पतंगांवरील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे पहिलेच पुस्तक ठरले. 'टेलिफोन ऑपरेटर ते पर्यावरण सल्लागार कंपनीची संचालिका' असा त्यांचा खडतर प्रवास. वन्यजीव संशोधनासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणार्या क्षेत्रात त्यांनी स्त्री संशोधक आणि त्यातही 'कीटकशास्त्रज्ञ' म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. बालपणापासून कीटकांप्रति मनात अकारण बसलेल्या भीतीवर मात करून त्यांनी कीटकांचे विश्व उलगडले. स्वच्छंदी तरीही ध्येयांचा वेध घेणारी ही 'मॉथ लेडी' म्हणजे डॉ. व्ही. शुभालक्ष्मी.

 

 
 
 

ॅन्टॉप हिल परिसरातील केंद्रीय कर्मचारी वसाहतीमधल्या एका सर्वसामान्य तेलुगू कुटुंबात शुभालक्ष्मी यांचा दि. २७ जानेवारी, १९७० रोजी जन्म झाला. लहानपणी त्यांना पावसाळ्यातली हिरवळ खुणवायची. पाण्याने भरलेल्या मैदानात साप, बेडूक, गोगलगायींना पाहणे, मुंग्यांना रस्ता तयार करून देणे, मैदानात उगवलेली जंगली वांगी, टोमॅटो तोडून भातुकलीचा खेळ खेळताना लक्ष्मीच्या मनात निसर्गप्रेमाचे बीज अंकुरले. विज्ञानाच्या पुस्तकात प्राण्यांविषयी वाचून निर्माण झालेली उत्कंठा त्या मैदानात प्रत्यक्ष अनुभवायच्या. मात्र, लक्ष्मी दहा वर्षांच्या असताना त्यांचे वडील निर्वतले. कुटुंबाला वसाहतीमधील घर सोडावे लागले. हे कुटुंब शीव कोळीवाड्यातील खाडीनजीकच्या एका चाळीत राहू लागले. आर्थिकदृष्ट्या प्रचंड हलाखीच्या परिस्थितीने त्यांच्या कुटुंबाला ग्रासले. अशात मोठ्या भावाने शुभालक्ष्मी यांना धीर देत पुढील शिक्षणाकरिता पाठिंबा दिला. या संपूर्ण कालावधीत शुभालक्ष्मींची निसर्गाशी जोडलेली नाळ कुठेतरी विरत गेली. त्यांचा कल वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याकडे होता. मात्र, बारावीत चांगले गुण न मिळाल्याने 'जीवशास्त्र' विषयामधून पदवीचे शिक्षण घेण्याचे त्यांनी निश्चित केले.

 

 
 
 
 
महाविद्यालयात असताना त्यांना पर्यावरण क्षेत्रात लौकिक असलेल्या 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेचे विद्यार्थी सभासदत्व मिळाले. अशातच पदवीच्या शेवटच्या वर्षात शुभालक्ष्मींच्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि घराचा डोलारा त्यांच्या खांद्यावर आला. बी.एस्सीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केलेल्या त्यांना हाती मिळेल ते काम करणे भाग पडले. टेलिफोन ऑपरेटर, रक्त तपासणीच्या प्रयोगशाळेत साहाय्यक, झवेरी बाजारात कॅशियर असे मिळेल ते काम त्यांनी केले. पण, या दरम्यान त्यांनी कटाक्षाने 'बीएनएचएस'शी संपर्क ठेवला. १९९२ साली त्यांना संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. निसर्ग भ्रमंतीच्या निमित्ताने त्यांची निसर्गाशी पुन्हा जवळीक निर्माण झाली. मात्र, भ्रमंतीच्या वेळी कीटकांविषयी असलेल्या भीतीपोटी त्या त्यांच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करीत. कालांतराने ही भीती आपसूक दूर झाली. झवेरी बाजारातील नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. तेवढ्यात 'बीएनएचएस'मध्ये नोकरीची संधी चालून आली. ते पद होते प्रशासकीय साहाय्यकाचे. त्यानिमित्ताने संशोधकांसोबत राहता येईल, या भावनेने शुभालक्ष्मी या पदावर रुजू झाल्या. १९९३ साली संस्थेमार्फत एम.एस्सी करण्याची संधी त्यांना मिळाली. नरेश चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'मॉथ' या विषयावर संशोधनाच्या कामाला सुरुवात केली.
 
 

 
 

साधारण तीन-साडे तीन वर्षांचा संशोधनाचा हा संपूर्ण प्रवास खडतर होता. कारण, ब्रिटिशांनंतर 'पतंग' या कीटकावर फारसा कोणीच अभ्यास केला नव्हता. त्याविषयीचे शैक्षणिक साहित्यदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीतही हार न मानता त्यांनी रात्र-रात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पालथे घालून पतंगांच्या माहितीचे संकलन केले. संशोधन पूर्ण झाल्यानंतर १९९७ साली त्यांना 'बीएनएचएस'च्या गोरेगाव येथील निसर्ग केंद्रात शिक्षण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु, 'डॉक्टर' या पदाचे वेड त्यांच्या मनात कायम होते. त्यासाठी १९९७ ते २००३ या कालावधीत त्यांनी 'पतंग' या कीटकावरच आपली पीएच.डी पूर्ण केली. या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी 'बीएनएचएस'च्या गोरेगाव केंद्राचा सर्वांगीण विकास केला. दुर्लक्षित राहिलेल्या कीटकांवरती अनेक कार्यक्रमांचे आणि भ्रमंत्यांचे आयोजन केले. त्यामुळे लोक त्यांना 'मॉथ लेडी' नावाने संबोधू लागले. २००९ साली त्यांनी अमेरिकेत जाऊन 'नॉन-प्रॉफिट मॅनेजमेंट'चे एक वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. तिथून परतल्यानंतर त्यांनी 'बीएनएचएस' सोडून स्वत:शी पर्यावरण सल्लागार कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 'बीएनएचएस'मध्ये २२ वर्षे केलेल्या स्थिर पगाराच्या नोकरीचा त्यांनी २०१४ साली राजीनामा दिला.

 

 
 
 
गेल्या पाच वर्षांपासून शुभालक्ष्मी 'लेडी बर्ड एन्व्हार्यन्मेंट कौन्सिलिटिंग' ही आपली पर्यावरण विषयासंबंधी सल्ला देणारी कंपनी चालवित आहेत. शिवाय निसर्ग संवर्धनाची आवड जोपण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी 'आयनेचरवॉच फाऊंडेशन'ची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून त्या विविध राज्यातील शासकीय यंत्रणा व कॉर्पोरेट कंपन्यांना पर्यावरणासंबंधी सल्ला देण्याचे काम करतात. फाऊंडेशनच्या माध्यमातून निसर्ग भ्रमंती आणि निसर्ग शिक्षण देण्याचे काम केले जाते.२०१८ साली त्यांचे 'फिल्ड गाईड टू इंडियन माॅथ' हे पुस्तक प्रकाशित झाले. महत्वाचे म्हणजे ब्रिटिश राजवटीनंतर स्वतंत्र भारतात 'माॅथ' या विषयावर प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक आहे. शुभालक्ष्मी यांचा हा संपूर्ण प्रवास एक स्त्री म्हणून कौतुकास्पद आहे. अशा ध्येयवेड्या 'मॉथ लेडी'ला दै.'मुंबई तरुण भारत'चा सलाम !
 
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat