भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणताही उतार नाही : अॅमेझोन इंडियाच्या उपाध्यक्षांचे मत

18 Sep 2019 11:13:55



नवी दिल्ली : वाहन उद्योगावर सध्या आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र दिसत असले तरीही अॅमेझोन ही बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आपली पाळेमुळे घट्ट रोवण्याची तयारी करत आहे. २९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टीवल दरम्यान विक्रीत सर्वाधिक वाढ होण्याची आशा कंपनीला आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या सुक्ष्म लघू व मध्यम उद्योगांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना एकाच मंचावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मत अॅमेझोन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी व्यक्त केले. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

ई कॉमर्स क्षेत्रात संधी

भारतात मोटार वाहन कंपन्या नांगी टाकत असल्याच्या काळातही ई-कॉमर्स क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सणासुदीच्या काळात या क्षेत्रात मोठी भरभराट होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या 'अॅमेझोन'च्या मंचावर पाच लाख ऑनलाईन विक्रेते आहेत. गेल्या दिवाळीत ही संख्या ३ लाख ५० हजार इतकी होती. त्यामुळे या किरकोळ व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वृद्धींगत होईल, याचा विश्वास असल्यानेच ते आमच्याशी सलग्न होत आहेत. येत्या काळात ही वाढ आणखी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन

येत्या काळात अॅमेझोन इंडिया भारतातील एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. अॅमेझोन बऱ्याच शिल्पकार, विणकाम कामगार आणि सहकार क्षेत्राशीही सलग्न होत आहे. त्यांना व्यापारासाठी एक वेगळा मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला.

दिवाळीत रोजगाराच्या संधी

सध्या अॅमेझोन भारतात पाच लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देत आहे. येत्या काळात वाढता पसारा पाहता, मोठया मनुष्यबळाची आवश्यकता आहे. येत्या दिवाळीत आणखी पदे भरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

अॅमेझोनवर वस्तू विक्री करण्यासाठी काय कराल

अॅमेझोनवर वस्तू विक्री करणे म्हणजेच 'सेलर' होण्यासाठी अॅमेझोन सेलरच्या वेबसाईटवर जाऊन संमत्ती दर्शवावी लागते, याबद्दल हिदी आणि इंग्रजीत माहीती देण्यात आली आहे. पुढील प्रक्रीयेसाठी तुम्हाला कंपनीतर्फे मार्गदर्शन केले जाते. 

Powered By Sangraha 9.0