पाकिस्तानात हिंदू तरुणीचा संशयास्पद मृत्यू

17 Sep 2019 17:57:23



इस्लामाबाद
: पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकावरील हल्ले वाढले असून तेथील शीख, हिंदू तसेच अल्पसंख्यांक सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सोमवारी पाकिस्तानातील लारकाना शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या नम्रिता चंदानी या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वसतिगृहातील खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. नम्रिताचा मृत्यू सुड भावनेतून झाला असल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.

 

मृतदेह मिळाला त्यावेळी तिची खोली आतून बंद होती. तिचे सहकारी तिला बोलावण्यासाठी गेले असता बराच वेळ नम्रिताने काहीही प्रतिसाद न दिल्याने तिच्या खोलीचे दार तोडण्यात आले. दार तोडले तेव्हा तिचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होताअसे स्थानिक पोलिसांनी सांगितले. परंतु आम्ही अप्लसंख्यांक असल्याने आमच्या मुलीची हत्या झाली असल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.

 

नम्रिताच्या भावाने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले कि, "माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही. तिच्या शरीरावर अनेक व्रण आहेत ज्यावरून लक्षात येते कि तिला ओढत नेऊन तिची हत्या केली. तिच्या गळ्यावरदेखील केबलच्या वायरने गळा घोटला गेल्याचे निशाण आहेत. आम्ही अप्लसंख्यांक असल्याने तिची हत्या करण्यात आली आहे." तरी नम्रिताला न्याय मिळावा याकरिता आमच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन ही त्याने यावेळी केले.
Powered By Sangraha 9.0