
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव 'खारी बिस्कीट' हा त्यांचा ५० वा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. मात्र तत्पूर्वी आज या चित्रपटातील बहीण भावाचे नाते अधोरेखित करणारे 'खारी' या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडीओ नुकताच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. एखादी भूमिका साकारण्यासाठी हे चिमुकले किती मेहेनत घेतात, दिग्दर्शकाचे आणि संपूर्ण टीमचे कष्ट किती महत्वाचे असतात हे आपल्याला हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल.
'खारी बिस्कीट' या चित्रपटातील 'खारी' हे कुणाल गांजावाला यांनी गायलेले भावनापूर्ण गाणे पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य तर येईल मात्र बहीण भावाचे हे नाते बघून डोळ्यात हलकेच पाणी येईल असे हे मिश्र भावना असलेले गाणे आहे. सुरज-धीरज या जोडगोळीने या गाण्याला अतिशय सुंदर असे संगीत दिले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
'खारी बिस्कीट' चित्रपटातील ही भावंडं मुंबईत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली आहे. वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम यांच्यातील एक मायचा ओलावा असलेले भावा-बहिणीचे नाते प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येईल.