युद्धाविना गमावले सर्वस्व...

    दिनांक  17-Sep-2019 21:02:26   ही खाजगी आणि संवेदनशील माहितीही एकप्रकारे आजच्या काळात देशाची संपत्तीच म्हणावी लागेल. पण, जर एका संपूर्ण देशाचीच माहिती लीक झाली असेल तर? तिची चोरी होऊन तिचा गैरवापरही केल्यास मग पुढे काय?आजच्या डिजिटल युगात बहुतांश माहिती ही
‘डेटा’ स्वरूपात संगणकावर, इंटरनेटवर उपलब्ध असते. ‘ई-गर्व्हनन्स’च्या माध्यमातून सरकारी सेवासुविधा, योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही सर्व माहिती एका क्लिकवर संबंधितांना सहजगत्या उपलब्ध होते. त्यामुळे ही खाजगी आणि संवेदनशील माहितीही एकप्रकारे आजच्या काळात देशाची संपत्तीच म्हणावी लागेल. पण, जर एका संपूर्ण देशाचीच माहिती लीक झाली असेल तर? तिची चोरी होऊन तिचा गैरवापरही केल्यास मग पुढे काय? तुम्ही विचार कराल, डेटा लीक होणे, माहितीची चोरी होणे हे आजच्या सायबर युगात काही नवीन नाही. पण, धक्कादायक प्रकार म्हणजे एका दक्षिण अमेरिकेतील छोट्याशा देशाचा संपूर्ण डेटाच लीक झाल्यामुळे जागतिक स्तरावर एकच खळबळ उडालेली दिसते. या देशाचं नाव आहे इक्वेडोर. फारसा कधी चर्चेतही नसणारा हा देश. द. अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरील देश. कोलंबिया आणि पेरु या देशांचा इक्वेडोरला शेजार लाभलेला. मात्र, जो प्रकार जगाच्या पाठीवर आजवर कधीही घडला नाही, तो प्रकार या इक्वेडोरमध्ये समोर आला. कोणी कल्पनाही केली नसेल की, थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल २० दशलक्ष इक्वेडोरवासीयांची संपूर्ण माहिती या डेटा लीकमुळे चव्हाट्यावर आली. सोमवारी ही बाब लक्षात येताच तातडीने इक्वेडोर सरकारने या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्धार करत तपासयंत्रणेला कामाला जुंपले आणि त्यांच्या तपासांतूनही देशांतर्गतच कोणी तरी ही आजवरची सर्वात मोठी डेटा चोरी केल्याचे उघडकीस आले.डेटाला आजच्या काळात सोने आणि तेलाइतकेच महत्त्व
. कारण, एकदा का हा डेटा बड्या कंपन्यांच्या हाती आला की, त्याचा वापर आपल्याला हव्या त्या पद्धतीने विपणनासाठी त्या सहज करू शकतात. इतर छोट्या-मोठ्या कंपन्यांना ग्राहकांच्या नाव, पत्त्यासह, त्यांच्या आवडी-निवडी, सवयींची माहितीही विकून अब्जाधीश होऊ शकतात. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका आणि फेसबुकच्या प्रकरणानंतर राजकीय फायद्यासाठी हा सर्व जगाच्या पाठीवर चाललेला छुपा प्रकार उघडकीस आल्यानंतर गदारोळ उडाल्याचे आपल्याला लक्षात असेलच. पण, सध्या जो प्रकार इक्वेडोरमध्ये उघडकीस आला आहे, त्याचे भीषण परिणाम तेथील सरकारसह नागरिकांनाही सहन करावे लागणार आहेत. उण्यापुर्‍या १७ दशलक्ष इतक्या लोकसंख्येच्या या देशाचा मात्र २० दशलक्ष लोकांचा डेटा लीक झाला. याचाच अर्थ, यामध्ये काही मृत नागरिक तसेच दोनदा नोंद असलेल्या नागरिकांच्या डेटाचाही समावेश आहे. खेदजनक बाब म्हणजे, यापैकी सहा दशलक्ष नागरिक हे १८ वर्षांखालील आहेत.

 
 
नागरिकांच्या नाव-पत्त्याबरोबरच त्यांचे शिक्षण, संपर्क क्रमांक, ई-मेल, राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांक, त्यांचे बँक खात्याचे तपशील, त्यांच्यावरील कर्ज, वाहनांची संख्या इत्यादी सगळा बारीकसारीक तपशील लीक झाल्यामुळे इक्वेडोरमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण, एकदा डेटा लीक झाला की, ती माहिती सार्वजनिक होते व त्याचा गैरवापर होण्याचीच शक्यता अधिक असते आणि इथे तर सरकारी माहितीबरोबरच खाजगी डेटाही मोठ्या प्रमाणात लीक झाल्याने इक्वेडोरच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून नागरिकांच्या या प्राथमिक माहितीच्या आधारे त्यांना ऑनलाईन गंडा घालणे, हा डेटा इतर बड्या कंपन्यांना विकून आपले खिसे भरणे, चोर्‍यामार्‍या-लुटमार करणे इत्यादी समाजविघातक प्रकार इक्वेडोरमध्ये डोके वर काढू शकतात. इतकेच नाही, तर इक्वेडोरचे राष्ट्रपती आणि विकिलिक्सच्या ज्युलियन असांजशी संबंधित डेटाही लीक झाल्याचे समजते. याचाच अर्थ, देशाचे गोपनीय दस्तावेज, संवदेनशील माहितीही आजच्या युगात पूर्णत: सुरक्षित नाही. इक्वेडोरच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सर्व्हरवरून हा सर्व डेटा लीक करण्यात आला असून ते सर्व्हर अमेरिकेत स्थित आहे. पण, त्यांच्या म्हणण्यानुसार हा कोणा देशाकडून किंवा दहशतवादी संघटनेकडून झालेला सायबर हल्ला मात्र नाही. पण, तरीही इक्वेडोरच्या सुरक्षा यंत्रणेने एका कंपनीवर छापेमारी करून त्यांचे संगणक व इतर साहित्यही जप्त केले आहे. या प्रकरणातून सर्वच देशांनी योग्य तो धडा घेत, आपआपली सायबर सुरक्षा अधिक बळकट करणे हे म्हणूनच क्रमप्राप्त ठरेल, अन्यथा रक्ताचा एक थेंबही न सांडता एक अख्खा देश देशोधडीला लागू शकतो, याचेच हे उदाहरण.