उद्योगपती आणि दानपती

    दिनांक  17-Sep-2019 20:33:04आपल्या उद्योगाचा विस्तार करून अब्जाधीश झालेले बरेच उद्योगपती जगात आहेत
. मात्र, दानशूर उद्योगपती म्हणून नाव घ्यायचे झाल्यास अझीम प्रेमजी यांचे नाव अग्रस्थानी येते. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...पैसे कमावून मोठे होण्याचे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते
. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्नशीलही असते. या श्रीमंतीला गवसणी घालण्यासाठी मग अनेकजण उद्योग-व्यवसायात स्वत:ला झोकून देतात. असे विविध क्षेत्रांमध्ये उद्योगविस्तार करून अब्जाधीश झालेले बरेच उद्योगपती आज या जगात आहेत. मात्र, दानशूर उद्योगपती म्हणून नाव घ्यायचे झाल्यास ‘विप्रो’ उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी या भारतीय उद्योजकाचे नावही अग्रस्थानी येते. त्यांच्या नावाशी आपण बर्‍यापैकी परिचित आहोत, पण त्यांचा जीवनप्रवास सगळ्यांनाच ठावूक नाही. म्हणून हा लेखप्रपंच... ‘विप्रो’ उद्योग समूहाचे नाव आजघडीला विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंपासून ते तंत्रज्ञान क्षेत्रांतही ‘विप्रो’ने आपला विस्तार केला आहे. जवळपास 53 वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी या कंपनीची स्थापना केली. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षणही अर्धवट सोडावे लागले. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या प्रेमजी कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय अशा प्रकारे सांभाळला की, आज जगभरात त्यांची ख्याती आहे. महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झालेले नसताना त्यांनी आपल्या उद्योगाची व्याप्ती जगभरात कशी वाढवली हे जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.अझीम प्रेमजी हे मूळचे गुजरातमधील कच्छचे
. त्यांचे वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी हेदेखील एक व्यापारी होते. गुजराती मुसलमान असणार्‍या या प्रेमजी कुटुंबीयांचा तांदूळ विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायानिमित्त मोहम्मद प्रेमजी यांनी 1945 साली मुंबई येथे स्थलांतर केले. याच वर्षी 24 जुलै रोजी अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. मुंबईतच त्यांचे बालपण गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशी गेले. परदेशात जाऊन अभियांत्रिकीत पदवी मिळविण्याचे त्यांचे ध्येय होते. कौटुंबिक परिस्थिती फारशी बरी नसतानाही त्यांच्या वडिलांनी अझीम यांना परदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला. अझीम यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी मोहम्मद प्रेमजी यांनी पारंपरिक तांदूळ विक्रीच्या व्यवसायासोबतच परदेशांतून आवक होणार्‍या भाज्या, फळे आणि खाद्यतेल विक्री आदींचाही जोडधंदा सुरू केला. मात्र, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते, 1966 साली मोहम्मद प्रेमजी यांचे अचानक निधन झाले आणि सर्व जबाबदारी अझीम यांच्या खांद्यावर येऊन पडली. अझीम यांनी आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडत आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. पारंपरिक व्यवसायासोबतच आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या जोडधंद्यांचाही विस्तार करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले. परदेशातून आयात होणार्‍या विविध खाद्यतेलांच्या तोडीस तोड अशी स्वदेशी खाद्यतेलांची उत्पादने तयार करत त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. परदेशी खाद्यतेलांच्या बरोबरीचे स्वदेशी खाद्यतेल स्वस्त दरात बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले आणि अझीम यांचा उद्योग वाढू लागला. खाद्यतेलासोबतच साबण, वनस्पती तूप (डालडा), बेकरीतील खाद्यपदार्थ आदींची विक्री करण्यास त्यांनी सुरुवात केली. पारंपरिक तांदूळ विक्रीच्या व्यवसायासोबतच त्यांचे इतर जोडधंदेही तेजीत सुरू असल्याने प्रेमजी यांची भरभराट होऊ लागली. व्यवसायाची आणखी व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘विप्रो’ कंपनीची स्थापना केली. जगात नवीन कोणते उद्योगधंदे पुढे येत आहेत, कोणते तंत्रज्ञान पुढे येत आहे, यावर प्रेमजींचे लक्ष असे.म्हणूनच एकीकडे साबण
, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसे हेरून त्यांना आपल्या उद्योगसमूहात सामील करून उद्योग चौफेर विस्तारला. ‘विप्रो प्लुइडपॉवर,’ ‘विप्रो टेक्नॉलॉजिस,’‘इन्फ्रास्ट्रक्चर,’ ‘लायटिंग,’ ‘इकोएनर्जी,’ ‘मॉड्युलर फर्निचर’ अशा अनेक कंपन्यांची सुरुवात करुन उद्योगविस्तार केला. माहिती-तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात ‘विप्रो इन्फोटेक,’ ‘माइंडट्री,’ ‘नेटक्रॅकर’ अशा कंपन्यांद्वारा कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली. ‘विप्रो’ उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. ‘फोर्ब्स’च्या सर्वेक्षणानुसार ते भारतातील आणि जगातील आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीत मोडतात. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 मध्ये त्यांना अमेरिकेतील ‘वेस्लेयन विद्यापीठा’ने मानद डॉक्टरेट प्रदान केली. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता हे सगळे लक्षात घेऊन 2005 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2011 मध्ये ‘पद्मविभूषण’ या नागरी सन्मानांनी गौरविले. दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. आपल्या मालकीचे 18 टक्के शेअर्स समाजकार्यासाठी दान करण्याचे त्यांनी ठरविले. ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा उपयोग विविध समाजोपयोगी कार्यासाठी केला जातो. असे हे दानशूर उद्योगपती नुकतेच निवृत्त झाले असून आता त्यांची मुले कंपनीचा कारभार सांभाळत आहेत.

- रामचंद्र नाईक