सत्यमेव जयते !

    दिनांक  15-Sep-2019 18:51:29   विश्वस्तरावर भारताने आपली मजबूत स्थिती स्वतः निर्माण केली आणि विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे आपला प्रवास जाणीवपूर्वक केला. उलटपक्षी पाकचा प्रवास हा मागास राष्ट्राकडे होताना जगाला दिसत आहे. त्यामुळे ज्या देशाने कायम अशांतता, हेच आपले धोरण मानले, त्या देशाच्या भूमिकेवर जग तरी कसा विश्वास ठेवेल...आपलेच म्हणणे खरे वा तथ्यांवर आधारलेले असल्याचे एखाद्या व्यक्तीने वारंवार समजून सांगितले तरी, त्यावर विश्वास ठेवायचा नाही, असे बर्‍याचदा होते. मात्र, कालांतराने संबंधित व्यक्ती योग्य असल्याचे मान्य केले जाते. कारण त्यातील सत्यता ही समोर येत असते, असा अनुभव व्यक्तीला किंवा व्यक्तीसमूहाला कधीतरी प्राप्त होत असतोच. मनुष्याच्या एकत्रित समूहाने साकारलेले जगदेखील या अनुभवापासून पारखे कसे असेल? नुकतीच याची प्रचिती भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या माध्यमातून आली आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, काश्मीरमधील पाकपुरस्कृत दहशतवाद आमच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे, हे भारत अनेकदा जगाला सप्रमाण सिद्ध करत सांगत होता. मात्र, दहशतवाद नावाची संकल्पना नसून ते केवळ एक वाईट स्वप्न आहे, अशा धाटणीची उत्तरे जगातील काही देश भारताला देत असत. मात्र, ९/११ च्या घटनेनंतर महासत्तेला दहशतवादाचा चटका लागल्याने त्याची तीव्रता लक्षात आली आणि दहशतवाद हे वाईट स्वप्न नसून एक जळजळीत वास्तव आहे, याची अनुभूती जगाला झाली. त्यानंतर दहशतवादबाधित देश आणि पुरस्कृत देश या चर्चांवर जगातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.नुकतीच
, “आम्ही काश्मीर प्रश्नावरून जगातील इतर देशांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र आम्हाला पाठिंबा मिळत नसून जग आमच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी भारताचेच ऐकत आहे,” अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री ब्रिगेडिअर (निवृत्त) इजाज अहमद शाह यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिली. शाह यांची ही प्रतिक्रिया पाकिस्तानची जागतिक पातळीवरील प्रतिमा सिद्ध करण्याकरिता बोलकी आहे, असे वाटते. आता मुळात प्रश्न हा आहे की, भारताचे जग का ऐकत आहे आणि पाकिस्तानवर जगाचा भरवसा का नाही? जगाने भारताचे ऐकावे याला अनेक कारणे असल्याचे दिसून येते. त्यात १) सन १९४७ पासून २ युद्धे आणि १ कारगिलची घुसखोरी, दुष्काळ आणि विविध इतर समस्या यांचा सामना करूनही भारताने आपली आगेकूच सुरूच ठेवली. विज्ञान, तंत्रज्ञान, मुक्त व्यवस्था, सामाजिक सलोखा अशा अनेक समाजाशी थेट निगडित असणार्‍या बाबींमध्ये भारताने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली. २) भारताने दुसर्‍यावर विसंबून न राहता आपला प्रगतीचा मार्ग स्वतः निवडला आणि त्यावर निश्चित दिशा निर्धारित करत, यशस्वी मार्गक्रमण केले. ३) वाढलेली लोकसंख्या हे आपले शक्तीस्थान बनवत तीच आपली संपत्ती असे समजून प्रगतीची दिशा आखली. ४) भारतीय मूल्य, विचार, संस्कृती यांचे जागतिक पटलावर स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने अहोरात्र मेहनत घेतली. ५) सत्ताधारी नेतृत्वाने सरकारी खर्चात पर्यटन म्हणून परदेशवारी न करता आपल्या दौर्‍यात जागतिक नेत्यांशी आणि तेथील भारतीयांशी संवाद साधत भारताची बाजू जागतिक पटलावर विशद केली. ६) भारताने जगाला बुद्ध दिले, हे केवळ बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता जागतिक शांततेचे आपले धोरण कधीही डळमळू दिले नाही. ७) जागतिक अर्थव्यवस्थेत असणार्‍या संस्थांकडून वेळप्रसंगी कर्ज घेतले. मात्र, आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याकडे देखील लक्ष देत कार्य केले. काळ्या यादीत सामाविष्ट होण्याची नामुष्की भारतावर आली नाही.तर
, तिकडे पाकिस्तानने १)१४ ऑगस्ट १९४७ पासून केवळ भारतद्वेष स्वीकारला २) लोकसंख्या आणि त्यांच्या गरजा कधी खिजगणतीत न घेता आपला कोणताही विकास करण्याकडे फारसे लक्षच दिले नाही. ३) जगासमोर हात पसरविताना दहशतवादाला पाठबळ देणे आणि केलेल्या मदतीचा दुरुपयोग करणे यातच धन्यता मानली. ४) विस्कळीत राजकीय व्यवस्थेचे जगाला वारंवार दर्शन घडविले. अशी कितीतरी न संपणारी यादी पाकच्या संदर्भात देता येईल. विश्वस्तरावर भारताने आपली मजबूत स्थिती स्वतः निर्माण केली आणि विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे आपला प्रवास जाणीवपूर्वक केला. उलटपक्षी पाकचा प्रवास हा मागास राष्ट्राकडे होताना जगाला दिसत आहे. त्यामुळे ज्या देशाने कायम अशांतता, हेच आपले धोरण मानले, त्या देशाच्या भूमिकेवर जग तरी कसा विश्वास ठेवेल, हे शाह यांना उमगणे आवश्यक आहे. आज जग भारताचे ऐकत असल्याने खर्‍या अर्थाने म्हणावेसे वाटते, सत्यमेव जयते !