भगव्या कपड्याआडचे क्रूसेड

    दिनांक  15-Sep-2019 18:44:01   
बेळगावच्या डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांनी धारण केलेली हिंदू संतसादृश्य वेशभूषा. हिंदू वेशभूषा, राहणीमान धारण करून डेरेक यांना काय साध्य करायचे होते? अर्थात, त्यांच्या बचावाला नेहमीप्रमाणे त्यांचा गोतावळा आलाच. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनुसार डेरेक यांनी वेशभूषा केली. त्यात काय झाले? उलट, स्थानिक लोकांच्या धर्मभावनेचा आदरच केला. आता यातले सत्य आणि तथ्य काय असेल हे उघड गुपित आहे.


माझ्या आकाशातल्या बापा,

तूच राम, तूच कृष्ण, तूच येशू रे बा

तूच हनुमंत, तूच खंडोबा, तूच रे बा

ये माझ्या आकाशातल्या बापा

ती गोरेगावच्या झोपडपट्टीतली वय वर्षे ९२ असलेली आजी कपाळाच्या मध्यभागी जवळजवळ २० मिनिटे दोन बोटांचा दाब देत जोरजोरात हेच म्हणत होती. कपाळाच्या मध्यभागाचा दाब आणि समोर आकाशातल्या बापाचा जप. डोके जड झालं. तिचं म्हणणं, येशूच्या जवळ गेल्यावरच असं डोकं सुन्न होतं. आता त्या आजीबाई हयात नाहीत. पण तिच्या लहानपणी तिच्या घरी कुणीतरी झगा घातलेला गृहस्थ आला होता. गावाच्या वेशीवरचे घर. तिथे कुणीच गावातले स्वेच्छेने यायचे नाही. त्या झगेवाल्याने त्यांना हे भजन शिकवले. वर सांगितले होते, “मंदिरामध्ये राम-कृष्ण, हनुमंत, खंडोबाला भजता येत नाही तर काय? आकाशातला बाप तर आहे ना?” त्यानंतर ते पूर्ण कुटुंब धर्मांतरित झाले, आज त्या कुटुंबाची तिसरी पिढी आहे. तीही अशी वागते, जसे काही रोमन चर्चचे पहिले ख्रिस्ती तेच असावेत. असो, हे सगळे आठवण्याचे कारण बेळगावच्या डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांनी धारण केलेली हिंदू संतसादृश्य वेशभूषा. हिंदू वेशभूषा, राहणीमान धारण करून डेरेक यांना काय साध्य करायचे होते? अर्थात, त्यांच्या बचावाला नेहमीप्रमाणे त्यांचा गोतावळा आलाच. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनुसार डेरेक यांनी वेशभूषा केली. त्यात काय झाले? उलट, स्थानिक लोकांच्या धर्मभावनेचा आदरच केला. आता यातले सत्य आणि तथ्य काय असेल हे उघड गुपित आहे. जर डेरेक यांना केवळ स्थानिकांसारखे वागायचे होते, तर मग ते स्थानिकांसारखे हिंदू धर्म स्वीकारणार काय? भगवे कपडे घालणारे योगी-संत हे ज्या देव-देवतांचे ज्या धर्माचा अंगिकार करतात, ते देव, ती संस्कृती डेरेक स्वीकारणार काय? लोकभावनेचा इतका कळवळा आहे तर मग बहुसंख्याकांचा धर्म ते स्वीकारणार काय? नक्कीच नाही. कारण, डेरेक यांनी केवळ भगवे कपडे घातले. भगवे कपडे घालून मोहमाया त्यागणारी वृत्ती येत नसते. डेरेक यांना आणि त्यांच्या आकाशातल्या बापाला माहिती आहे की, भगव्या कपड्याआड क्रूसेड होते की नाही ते...


डेरेक सगळीकडेच..


डेरेक यांच्या वागण्याने अचंबित बिचंबित बिलकुल झाले नाही
. जरा डोळे उघडे ठेवले तर दिसेल की, ठिकठिकाणी गल्लीबोळात काँग्रेसी गवतांसारखी चर्च उभी राहिली आहेत. मुंबईमध्ये जागेला सोन्याचा भाव आहे. मात्र, याच मुंबईमध्ये प्रत्येक वस्तीत ऐसपैस चर्च आहेतच. नसेल तर नव्याने सुरू होणार आहेत. अर्थात, यासाठी पैसा कुठून येतो वगैरे या गोष्टी मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या आहेत. तसेच सोईने देवाधर्मासाठी वेळ काढणार्‍या हिंदूंसाठी तर अगदीच आकलनापलीकडचा आहे. असो, तर डेरेक यांचा हिंदू वेश दिसला म्हणून त्यावर चर्चा झाली. पण गल्लीबोळातल्या चर्चमध्ये डेरेक इमानेइतबारे आपले ख्रिस्ती धर्मसंवर्धनाचे काम करीत आहेतच. वर उल्लेख केल्याप्रमाणे गल्लोगल्ली किमान तीन चर्च तरी असतात. एक पूर्वापार ख्रिस्त्यांसाठीचे चर्च, एक दक्षिण भारतीय त्यातही मल्याळी भाषकांचे चर्च आणि एक मराठी भाषकांसाठीचे चर्च. दर रविवारी या चर्चमध्ये प्रार्थना होतात. त्या प्रार्थना स्थानिक भाषेतूनच होतात. त्यामध्ये अर्थातच येशू देवामुळे अमुक एक बरा झाला, तमक्याची आर्थिक परिस्थिती सुधारली वगैरे वगैरे गोष्टींची यथासांग चर्चा होतच असते. या चर्चमध्ये जाणारे असतात कोण? बहुतेक सर्वच स्तरातले असतात. तीन-चार महिन्यांनी जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक प्रार्थना आयोजित केली जाते. त्यावेळी काय दिसते तर चकाचक रोषणाई. तितकेच चकाचक व्यासपीठ, त्या व्यासपीठावर अद्ययावत संगीतवाद्ये घेऊन बसलेले तितकेच चकाचक नीटनेटके तरुण-तरुणी. सुप्रसिद्ध गीतांवर ते येशूची भजन म्हणतात. त्यानंतर मग त्यांचा प्रमुख प्रार्थना म्हणायला येतो. दुःखबिख्ख काय असेल तर सांगायचा गजर करतो. कुणी कुणी तरी असते, जिच्या अंगात बिंगात येते. ती स्टेजवर अंग घुमवत येते आणि स्टेजवर येताच काही मिनिटांतच ती शुद्धीवर येते. असाध्य रोगीही येतात आणि स्टेजवर अंग धाडकन आपटून बरे होतात. हा चमत्कार म्हणायचा का? हिंदू धर्मातील काही सकारात्मक बाबींवरही अंधश्रद्धा म्हणून कुत्सित टीका करणारे काही लोक स्वतःला पुरोगामी समजतात. पण या असल्या चमत्काराबाबत ते मूग गिळून बसतात. का? असो, तर डेरेक काही बेळगावमध्येच आहेत, असे नाही तर तुमच्या-आमच्या गावात डोकावा, तिथेही भेटतील.